रंग बरसे...! कतरिनाने विकीला लावला रंग, कौशल कुटुंबाने जल्लोषात साजरी केली होळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 16:43 IST2025-03-14T16:41:56+5:302025-03-14T16:43:05+5:30

कतरिनाच्या बहिणीचीही चर्चा, सनी कौशलला करतेय डेट?

katrina kaif and vicky kaushal celebrated holi with family shared photos | रंग बरसे...! कतरिनाने विकीला लावला रंग, कौशल कुटुंबाने जल्लोषात साजरी केली होळी

रंग बरसे...! कतरिनाने विकीला लावला रंग, कौशल कुटुंबाने जल्लोषात साजरी केली होळी

विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) बॉलिवूडमधली सुपरहिट जोडी. दोघांच्या लग्नाला ४ वर्ष झाली आहेत. कतरिना कौशल कुटुंबात एकदम मिसळून गेली आहे. दिवाळी, करवा चौथ, ख्रिसमस अशा प्रत्येक सणाला विकी आणि कतरिनाचे फोटो सोशल मीडियावर येतात. विकीने नुकतेच आजच्या होळीच्या सणाचे फोटो इनस्टाग्रामवर शेअर केले आहेत. कुटुंबासोबत त्याने धुलिवंदन साजरं केलं असून सर्वांच्या नजरा कतरिनावर खिळल्या आहेत. 

विकी कौशल-कतरिना कैफचे फोटो म्हटलं की त्यात रोमान्स असतोच. आज धुलिवंदनाच्या दिवशी विकीने कुटुंबासोबतचे फोटो शेअर केले आहेत. विशेष म्हणजे कतरिना मोठ्या उत्साहात विकीच्या गालावर रंग लावताना दिसत आहे. तिच्यात अगदी लहान मुलांसारखाच उत्साह पाहायला मिळतोय. विकी आणि कतरिना रंगात न्हाऊन निघाले आहेत. याशिवाय या फोटोंमध्ये विकीचे आई वडील, भाऊ सनी कौशल आणि कतरिनाची बहीण इजाबेलाही दिसत आहे. दरवर्षीप्रमाणेच यंदाही कौशल कुटुंबाने मोठ्या जल्लोषात होळी साजरी केली आहे.


सनी कौशल-इझाबेलाच्या चर्चा

पांढऱ्या वनपीसमध्ये कतरिना अगदी परीसारखी सुंदर दिसत आहे. तर विकी आणि सनीने पांढऱ्या टीशर्टमध्ये ट्विनींग केलं आहे. दोघांचा आईवडिलांसोबतचा फोटो मनाला भावणारा आहे. या फोटोंमध्ये कतरिनाची बहीण इझाबेलाही आहे. कौशल कुटुंबाच्या प्रत्येक फोटोत इझाबेला दिसतेच. यावरुन इझाबेला कौशल कुटुंबाची धाकटी सून तर होणार नाही ना अशा चर्चा रंगल्या आहेत. सनी कौशल इझाबेलाला डेट करतोय का? असा प्रश्न चाहते विचारत आहेत.

वर्कफ्रंट

विकी कौशलने नुकताच 'छावा' हा ब्लॉकबस्टर सिनेमा दिला. अजूनही सिनेमा बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालतोय. सिनेमाने ५०० कोटी पार बिझनेस केला आहे. आता त्याच्या आगामी सिनेमांची चाहत्यांना उत्सुकता आहे. तर कतरिना कैफ बऱ्याच काळापासून पडद्यावरुन गायब आहे. 'मेरी ख्रिसमस' हा तिचा शेवटचा सिनेमा होता. यानंतर ती आता 'जी ले जरा' मध्ये दिसणार आहे. मात्र अद्याप या सिनेमाबाबत कोणतंही अपडेट आलेलं नाही.

Web Title: katrina kaif and vicky kaushal celebrated holi with family shared photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.