अभी ना जाओ छोडकर...! धर्मेंद्र यांच्या निधनानंतर करण जोहरची भावुक पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 14:08 IST2025-11-24T14:06:54+5:302025-11-24T14:08:13+5:30
करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या २०२३ साली आलेल्या सिनेमात धर्मेंद्र यांनीही भूमिका साकारली होती.

अभी ना जाओ छोडकर...! धर्मेंद्र यांच्या निधनानंतर करण जोहरची भावुक पोस्ट
बॉलिवूडचे हीमॅन, शोलेचा 'वीरु', हँडसम हंक अभिनेते धर्मेंद्र यांचं वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर घरीच उपचार सुरु होते. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी 'शोले','चुपके चुपके,'ब्लॅकमेल','धरम वीर','फूल और पत्थर' असे सुपरहिट सिनेमे दिले. वयाच्या नव्वदीतही ते अतिशय दिलखुलास, कायम एनर्जेटिक होते. आज त्यांच्या निधनाने संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. दिग्दर्शक, निर्माता करण जोहरने भावुक पोस्ट लिहिली आहे.
करण जोहर लिहितो, "एका युगाचा अंत झाला.... एक मेगा स्टार... मुख्य प्रवाहातील चित्रपटसृष्टीतील एका हिरोचे मूर्त स्वरूप... अतिशय देखणा आणि पडद्यावर अद्भूत स्क्रीन प्रेझेन्स असणारा...भारतीय सिनेसृष्टीच्या इतिहासातला त्याचं स्थान कायम वरती राहील. माणूस म्हणून ते खूप चांगले होते. इंडस्ट्रीतील सर्वांचंच त्यांच्यावर खूप प्रेम होतं. त्यांनीही सर्वांवर खूप प्रेम केलं आणि सकारात्मकता पसरवली. त्यांचे आशीर्वाद, त्यांची मिठी आणि त्यांची आपुलकी शब्दांत व्यक्त न करणारी आहे. आज इंडस्ट्रीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अशी जागा जी कोणीही कधीही भरून काढू शकत नाही. धर्मेंद्र यांच्यासारखे केवळ तेच एकमेव होते. धर्मेंद्र सर आमचं तुमच्यावर खूप प्रेम आहे. आम्हाला तुमची खूप आठवण येईल. आज स्वर्गही धन्य झाला असेल. तुमच्यासोबत काम करणं हा कायमच माझ्यासाठी एक आशीर्वाद असले. आज माझं मन प्रेमाने, आदराने हेच म्हणतंय की, अभी ना जाओ छोडके.... के दिल अभी भरा नहीं…"
करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या २०२३ साली आलेल्या सिनेमात धर्मेंद्र यांनीही भूमिका साकारली होती. यामध्ये त्यांची शबाना आजमी यांच्यासोबत जोडी होती. तर आता येणाऱ्या 'इक्कीस' सिनेमातही धर्मेंद्र आहेत. हा त्यांचा शेवटचा सिनेमा ठरला आहे. सिनेमात अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा मुख्य भूमिकेत आहे. आजच या सिनेमाचं नवीन पोस्टर आलं ज्यामध्ये धर्मेंद्रही आहेत. आज त्यांच्या निधनाने सिनेसृष्टी पोरकी झाली आहे.