धर्मेंद्र यांचा शेवटचा सिनेमा 'इक्कीस', अभिनेत्याचे सेटवरील कधीही न पाहिलेले फोटो बघून चाहते भावुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 16:25 IST2025-11-25T16:21:55+5:302025-11-25T16:25:11+5:30
धर्मेंद्र यांचे त्यांच्या आगामी शेवटच्या सिनेमातील फोटो समोर आले आहेत. 'इक्कीस' सिनेमातील त्यांचे सह कलाकार जयदीप अहलावत यांनी हे फोटो शेअर केले आहेत

धर्मेंद्र यांचा शेवटचा सिनेमा 'इक्कीस', अभिनेत्याचे सेटवरील कधीही न पाहिलेले फोटो बघून चाहते भावुक
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं २४ नोव्हेंबर रोजी निधन झालं. धर्मेंद्र यांच्या निधनामुळे बॉलिवूड सिनेसृष्टी आणि कलाकारांना चांगलाच धक्का बसला आहे. आयुष्याच्या शेवटच्या काळातही धर्मेंद्र हे सिनेमांमध्ये काम करत होते. त्यामुळेच त्यांच्या निधनानंतर त्यांचा शेवटचा सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. या सिनेमाचं नाव आहे 'इक्कीस'. धर्मेंद्र या सिनेमात एका शहीद जवानाच्या वडिलांची भूमिका साकारणार आहेत. या सिनेमातील धर्मेंद्र यांचा सहकलाकार अभिनेता जयदीप अहलावतने सेटवरील अनसीन फोटो शेअर केले आहेत.
जयदीपची भावुक पोस्ट
जयदीप अहलावतने धर्मेंद्र यांचे सेटवरील खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोत धर्मेंद्र यांच्या पायाशी जयदीप बसलेला दिसतोय. तो त्यांच्याशी प्रेमाने आणि आपुलकीने गप्पा मारत आहे. धर्मेंद्र यांची सेटवरील एनर्जी सर्वांना थक्क करुन सोडणारी आहे. हे फोटो शेअर करुन जयदीप लिहितो, ''काही असं नाहीये जे मी बोलू शकेल. फक्त इतकंच सांगायचंय, त्या थोड्याश्या दिवसांसाठी तुमचं जे प्रेम मला मिळालं ते आयुष्यभर लक्षात राहील. तुमची खूप आठवण येईल. हे जग एकमेव अशा जट यमला पगला दिवानाला कायम मिस करेल. तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली.''
इक्कीस सिनेमाविषयी
श्रीराम राघवन दिग्दर्शित 'इक्कीस' सिनेमाची खूप चर्चा आहे. धर्मेंद्र यांचा हा शेवटचा सिनेमा ठरणार आहे. या सिनेमात धर्मेंद्र हे मेजर अरुण खेत्रपाल यांच्या वडिलांची भूमिका साकारतना दिसणार आहेत. अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा या सिनेमात प्रमुख भूमिकेत आहे. याशिवाय अभिनेता जयदीप अहलावतचीही खास भूमिका दिसणार आहे. हा सिनेमा २५ डिसेंबर २०२५ रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. धर्मेंद्र यांना शेवटचं मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.