Governor Teaser: चिन्मय मांडलेकर दिग्दर्शित नवा हिंदी सिनेमा 'गर्व्हनर', मनोज वाजपेयींची प्रमुख भूमिका, टीझर बघाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 12:26 IST2026-05-07T12:23:19+5:302026-05-07T12:26:37+5:30
'द सायलेंट सेव्हियर गव्हर्नर' हा सत्य घटनांवर आधारित चित्रपट असून, १९९० च्या दशकात भारताने अनुभवलेल्या सर्वात मोठ्या आर्थिक संकटाची कहाणी यात मांडण्यात आली आहे

Governor Teaser: चिन्मय मांडलेकर दिग्दर्शित नवा हिंदी सिनेमा 'गर्व्हनर', मनोज वाजपेयींची प्रमुख भूमिका, टीझर बघाच
विपुल अमृतलाल शाह प्रस्तुत 'गव्हर्नर' हा चित्रपट ऐतिहासिक घटनांपासून प्रेरित आहे. मनोज वाजपेयी स्टारर या चित्रपटाचे दिग्दर्शन मराठी मनोरंजन विश्वातील दमदार अभिनेता आणि दिग्दर्शक चिन्मय मांडलेकरने केले आहे. 'द केरळ स्टोरी' आणि 'द केरळ स्टोरी २: गोज बियॉन्ड'च्या निर्मात्यांकडून आणखी एक प्रभावी चित्रपट प्रेक्षकांसमोर येत आहे.
मनोज वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त 'द सायलेंट सेव्हियर गव्हर्नर'चा पोस्टर समोर आल्यानंतर या चित्रपटाबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. आता निर्मात्यांनी याचा दमदार टीझरही रिलीज केला आहे, जो अत्यंत रंजक आहे.
'द सायलेंट सेव्हियर गव्हर्नर' हा सत्य घटनांवर आधारित चित्रपट असून, १९९० च्या दशकात भारताने अनुभवलेल्या सर्वात मोठ्या आर्थिक संकटाची कहाणी यात मांडण्यात आली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते मनोज वाजपेयी या चित्रपटात आरबीएल (राष्ट्रीय बँक ऑफ इंडिया) गव्हर्नरच्या भूमिकेत दिसणार आहेत. अशी भूमिका त्यांनी याआधी कधीच साकारलेली नाही.
या चित्रपटाची निर्मिती सनशाइन पिक्चर्स आणि विपुल अमृतलाल शाह यांनी केली आहे. चिन्मय मांडलेकरने सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. विशेष म्हणजे, चिन्मयने याआधी मनोज वाजपेयींसोबत 'इन्स्पेक्टर झेंडे' या चित्रपटासाठी काम केलं होतं.
'गव्हर्नर' या चित्रपटात मनोज वाजपेयींसह अदा शर्माही झळकत आहे. आशिम ए. शाह हे या चित्रपटाचे सह-निर्माते आहेत. सुवेंदु भट्टाचार्जी, सौरभ भारत, रवी असरानी आणि विपुल अमृतलाल शाह यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे. याशिवाय दिग्गज गीतकार जावेद अख्तर यांनी चित्रपटाची गाणी लिहिली असून अमित त्रिवेदी यांचे संगीत या चित्रपटाला आहे. हा चित्रपट १२ जून २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.