'दृश्यम ३'मध्ये तब्बू दिसणार का? 'या' दिवशी रिलीज होणार चित्रपट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 17:15 IST2026-05-18T17:13:54+5:302026-05-18T17:15:03+5:30
अजय देवगणच्या 'दृश्यम ३' मध्ये तब्बू 'मीरा देशमुख' म्हणून परतणार का? यावर दिग्दर्शक अभिषेक पाठक यांनी काय मोठा खुलासा केला आहे.

'दृश्यम ३'मध्ये तब्बू दिसणार का? 'या' दिवशी रिलीज होणार चित्रपट!
गेल्या काही महिन्यांंपासून मनोरंजन विश्वात एका सिनेमाची चांगलीच चर्चा आहे. हा सिनेमा म्हणजे 'दृश्यम ३'. अजय देवगण पुन्हा एकदा विजय साळगावकरच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याने सर्वांना उत्सुकता आहे. पण, अनेक चाहत्यांच्या मनात एकच प्रश्न रेंगाळत आहे की, 'दृश्यम ३' मध्ये तब्बू पुन्हा एकदा आयपीएस अधिकारी 'मीरा देशमुख'च्या भूमिकेत परतणार का? आता यावर स्वतः चित्रपटाचे दिग्दर्शक अभिषेक पाठक यांनी मौन सोडले असून, एक महत्त्वपूर्ण संकेत दिला आहे.
'झूम' (Zoom) या वृत्तवाहिनीशी संवाद साधताना दिग्दर्शक अभिषेक पाठक यांनी तब्बूच्या भूमिकेबाबतची चाहत्यांची उत्सुकता कमालीची वाढवली आहे. 'दृश्यम २' च्या शेवटी मीराच्या मुलाच्या म्हणजेच 'सॅम'च्या अस्थींचे विसर्जन झाल्यानंतर मीरा देशमुखची कथा संपली आहे, असा अंदाज अनेकांनी लावला होता. यावर अभिषेक पाठक यांनी भाष्य केलंय.
अभिषेक पाठक म्हणाले, "प्रत्येकाला नेमके हेच वाटते की मीराची कथा तिथेच संपली. पण ज्या क्षणी तुम्हाला वाटते की 'दृश्यम' संपत आले आहे, नेमक्या त्याच क्षणी तुम्ही प्रत्यक्षात या कथेचा पुरेसा खोलवर विचार केलेला नसतो. या कथेत सांगण्यासारखे अजूनही खूप काही बाकी आहे".अभिषेक पाठक यांच्या या विधानामुळे 'दृश्यम ३' मध्ये तब्बूची एन्ट्री होणार आणि ती पुन्हा एकदा विजय साळगावकरच्या अडचणी वाढवणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे.
'या' दिवशी चित्रपटगृहात येणार 'दृश्यम ३'
'दृश्यम ३' हा या थरारक फ्रँचायझीचा तिसरा आणि अंतिम अध्याय असणार आहे. हा चित्रपट २ ऑक्टोबर २०२६ रोजी गांधी जयंतीच्या मुहूर्तावर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट मूळ दिग्दर्शक जीतू जोसेफ यांच्या याच नावाच्या मल्याळम चित्रपटाचा अधिकृत रिमेक आहे, ज्यामध्ये साऊथचे सुपरस्टार मोहनलाल यांनी मुख्य भूमिका साकारली होती. तथापि, हिंदी प्रेक्षकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी म्हणजे, हिंदी आवृत्तीच्या दिग्दर्शकाने हा भाग मल्याळम चित्रपट 'दृश्यम ३' पेक्षा लक्षणीयरीत्या वेगळ्या आणि नव्या पद्धतीने तयार केला आहे. त्यामुळे मल्याळम चित्रपट पाहिलेल्या प्रेक्षकांसाठीही हिंदी 'दृश्यम ३' मध्ये अनेक नवनवीन ट्विस्ट आणि सस्पेन्स पाहायला मिळणार आहेत.