"आई दहशतवाद्यांसोबत कारमध्ये होती..." दिव्या दत्ताने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 12:52 IST2026-04-16T12:51:45+5:302026-04-16T12:52:09+5:30
अभिनेत्री दिव्या दत्ता हिने थरारक अनुभव नुकताच शेअर केला आहे.

"आई दहशतवाद्यांसोबत कारमध्ये होती..." दिव्या दत्ताने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
बॉलिवूडमधील प्रतिभावान अभिनेत्री दिव्या दत्ता आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. मात्र, दिव्याच्या आयुष्यात अशा काही घटना घडल्या आहेत, ज्या चित्रपटापेक्षाही कमी नाहीत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दिव्याने पंजाबमधील दहशतवादाच्या काळातील एक थरारक आठवण शेअर केली. तिच्या आईने नकळतपणे काही दहशतवाद्यांच्या गाडीतून लिफ्ट घेतली होती आणि त्यानंतर जे घडलं ते धक्कादायक होतं.
दिव्या दत्ताची आई पंजाबमध्ये सरकारी नोकरीला होती. त्या काळी पंजाबमध्ये दहशतवादाचा मोठा धोका होता आणि संचारबंदी लागू असायची. एकदा तिची आई लुधियानाहून चंदीगडला प्रशिक्षणासाठी जात असताना त्यांच्या जीपचे टायर पंक्चर झाले. रात्रीची वेळ आणि संचारबंदी असल्याने तिच्या आईने रस्त्यावरून जाणाऱ्या एका गाडीला हात दाखवला. त्या गाडीत चार-पाच लोक बसलेले होते. आईने विचारल्यावर त्यांनी तिला गाडीत घेतले. दिव्या सांगते, "वाटेत आईने त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण ते कोणीच काही बोलले नाहीत. त्यांनी आईला सुरक्षित ठिकाणी उतरवले आणि ते निघून गेले".
रुग्णालयात पोहोचताच बसला धक्का!
धक्कादायक बाब म्हणजे, आईला उतरवून काही वेळ झाल्यानंतर जेव्हा ती रुग्णालयात पोहोचली, तेव्हा तिथे पाच मृतदेह आणले गेले होते. दिव्याने सांगितले, "ते मृतदेह त्याच लोकांचे होते, ज्यांच्या गाडीत माझी आई बसली होती. ते दहशतवादी होते आणि आईला उतरवल्यानंतर काही वेळातच पोलीस चकमकीत ते मारले गेले होते". हे कळल्यावर दिव्याच्या संपूर्ण कुटुंबाच्या पायाखालची जमीनच सरकली होती.