Birthday Special : कधीकाळी या अभिनेत्यावर जडला होता सायरा बानोंचा जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2019 09:46 IST2019-08-23T08:00:00+5:302019-08-23T09:46:23+5:30
खरे तर चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वीच सायरा बानू दिलीप कुमारांवर फिदा झाल्या होत्या. पुढे वयाच्या 17 व्या वर्षी सायरा चित्रपटसृष्टीत आल्या आणि चित्रपटसृष्टीत आल्यावर एक क्षण असा आला की, सायरा या अभिनेत्याच्या प्रेमात पडल्या.

Birthday Special : कधीकाळी या अभिनेत्यावर जडला होता सायरा बानोंचा जीव
‘तुम्हें और क्या दूं मैं दिल के सिवा..’ हे गाणे आठवले की, हमखास आठवते ती सायरा बानो आणि राजेंद्र कुमार यांची जोडी. याच चित्रपटाच्या सेटवर सायरा बानोच्या मनात प्रेमाचा अंकुर फुलला होता. पण हा अंकुर रूजण्याआधीच कोमेजला. आज (23 ऑगस्ट) सायरा बानो यांचा वाढदिवस. तेव्हा जाणून घेऊ या त्यांच्या प्रेमाचा हा किस्सा...
खरे तर चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वीच सायरा दिलीप कुमारांवर फिदा झाल्या होत्या. पुढे वयाच्या 17 व्या वर्षी सायरा चित्रपटसृष्टीत आल्या आणि चित्रपटसृष्टीत आल्यावर एक क्षण असा आला की, सायरा राजेन्द्र कुमार यांच्या प्रेमात पडल्या.
1960 मध्ये दिलीप कुमार व मधुबाला यांचा ‘मुगल ए आजम’ रिलीज झाला होता. सायरा बानो या चित्रपटाचा प्रीमीअरला गेल्या आणि दिलीप कुमारांना पाहून अक्षरश: मोहित झाल्यात. ‘मुगल ए आजम’ रिलीज झाल्यानंतर वर्षभराने सायरा यांनीही बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. अभिनेता शम्मी कपूर यांच्यासोबत ‘जंगली’ या चित्रपटातून त्यांचा डेब्यू झाला. यानंतर सायरा यांनी विश्वजीत, जॉय मुखर्जी, राजेन्द्र कुमार यांच्यासोबत अनेक चित्रपट केले. याचकाळात चंचल स्वभावाच्या सायरा राजेन्द्र कुमार यांच्या प्रेमात पडल्या होत्या.
‘आई मिलन की बेला’ या चित्रपटात सायरा व राजेंद्र कुमार यांनी एकत्र काम केले आणि याच चित्रपटाच्या सेटवर सायरा बानो यांच्या मनात प्रेमाचा अंकुर फुलला. राजेन्द्र कुमार त्यावेळी विवाहित होते आणि तीन मुलांचे बाप होते. सायराच्या आई नसीम यांनी मुलीच्या डोळ्यांतील प्रेम अचूक हेरले. त्या सायरावर नाराज झाल्या. केवळ इतकेच नाही तर सायराची समजूत काढण्याची जबाबदारी त्यांनी शेजारी राहणा-या दिलीप कुमार यांच्यावर सोपवली. विशेष म्हणजे, सायरा यांना समजवता समजवता दिलीप कुमार स्वत: सायरांच्या प्रेमात पडले.
आईचा राग आणि दिलीप कुमार यांनी समजावल्यानंतर सायरा यांनी राजेंद्र कुमार यांच्याशी असलेले नाते कायमचे संपवण्याचा निर्णय घेतला आणि पुढे दिलीप कुमारांशी त्यांचे लग्न झााले. त्यावेळी दिलीप कुमार 44 वर्षांचे होते तर सायरा केवळ 22 वर्षांच्या होत्या.