दीपिका पादुकोणच्या ८ तास कामाच्या शिफ्टवर आशुतोष राणा स्पष्टच बोलले, म्हणाले- "जास्त वेळ काम केल्याने..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 17:41 IST2026-01-29T17:40:05+5:302026-01-29T17:41:10+5:30
लोकप्रिय अभिनेते आशुतोष राणा यांनीही दीपिकाला पाठिंबा दर्शवला आहे. आशुतोष राणा यांनी दीपिकाच्या आठ तास काम करण्याच्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे.

दीपिका पादुकोणच्या ८ तास कामाच्या शिफ्टवर आशुतोष राणा स्पष्टच बोलले, म्हणाले- "जास्त वेळ काम केल्याने..."
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या आठ तासांच्या कामाच्या शिफ्टच्या मागणीमुळे काही प्रोजेक्ट तिच्या हातातून गेले. सिनेइंडस्ट्रीतही दीपिकाच्या या वक्तव्याची चर्चा रंगली होती. अनेकांनी दीपिकाला सपोर्ट केला होता. तर काहींनी तिच्या विरोधात भूमिका मांडली होती. आता लोकप्रिय अभिनेते आशुतोष राणा यांनीही दीपिकाला पाठिंबा दर्शवला आहे. आशुतोष राणा यांनी दीपिकाच्या आठ तास काम करण्याच्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे.
राणा म्हणाले, “माझ्या मते सर्जनशील काम आठ तासांपलीकडे जाऊ नये. जर सर्वोत्तम परिणाम अपेक्षित असतील, तर हे समजून घेणे अत्यावश्यक आहे. आठ तासांचा कालावधी पुरेसा असतो आणि काम त्या वेळेत पूर्ण होऊ शकते. प्री-प्रोडक्शन मजबूत असेल, सर्व गोष्टी व्यवस्थित ठरलेल्या असतील आणि काय शूट करायचे आहे याची स्पष्टता असेल, तर आठ तासांतही उत्कृष्ट काम करता येते.”
ते पुढे म्हणाले की, "दीर्घकाळ काम केल्यास त्याचा थेट परिणाम अभिनयावर होतो, कारण ऊर्जा ही मर्यादित असते. आठ तासांपेक्षा जास्त वेळ काम केल्यास कामाच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. हे संपूर्ण गणित ऊर्जा आणि क्षमतेचे आहे. प्रत्येक व्यक्तीकडे वीस तास काम करून उर्वरित चार तासांत स्वतःला पुन्हा ताजेतवाने करण्याची क्षमता नसते. एखाद-दोन दिवस थोडे अधिक काम करणे ठीक असू शकते, पण तेच जर सवय बनले, तर कामाच्या सादरीकरणावर परिणाम होणारच. म्हणूनच आठ तासांच्या वेळेचे योग्य नियोजन आणि व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.”
“स्क्रिप्ट, सीन ब्लॉकिंग आणि नियोजनासंबंधी सर्व चर्चा कार्यालयातच व्हायला हव्यात. सेटवर पोहोचल्यानंतर ‘हा सीन तर होता नाही, तो बदलूया’ असे म्हणणे योग्य नाही. जहाजाचा कॅप्टन जर स्पष्ट असेल, तर आठ तासांपेक्षा जास्त काम करण्याची गरजच भासत नाही", असं त्यांनी सांगितलं.