ट्रेलर पाहून चाहते खूश, पण... अनन्या पांडेच्या सिनेमातील 'या' सीन्सवर सेन्सॉर बोर्डाची कात्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 17:34 IST2026-05-18T17:06:26+5:302026-05-18T17:34:48+5:30
सेन्सॉर बोर्डाने सिनेमात केले बरेच बदल

ट्रेलर पाहून चाहते खूश, पण... अनन्या पांडेच्या सिनेमातील 'या' सीन्सवर सेन्सॉर बोर्डाची कात्री
बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे सध्या तिच्या आगामी 'चांद मेरा दिल' चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. ट्रेलरला नेटकऱ्यांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला. सिनेमात अनन्या आणि लक्ष्य लालवानी यांची जोडी आहे. दोघांचे रोमँटिक किंसींग सीन्सही आहेत. मात्र आता सेन्सॉर बोर्डाने या सीन्सवर कात्री फिरवल्याचं समोर येत आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने चित्रपटाला U/A 16+ सर्टिफिकेट देण्यापूर्वी मेकर्सना काही महत्त्वाचे बदल करण्याचे निर्देश दिले होते. सेन्सॉर बोर्डाने चित्रपटातील १० सेकंदांचा एक किसिंग सीन पूर्णपणे काढून टाकून त्याऐवजी दुसरे व्हिज्युअल्स वापरण्यास सांगितले. याव्यतिरिक्त, जवळपास १ मिनिट २६ सेकंदांचे इतर लिप-लॉक सीन्सही चित्रपटातून डिलीट करण्यात आले आहेत. म्हणजेच, चित्रपटातून एकूण ९६ सेकंदांचे (सुमारे दीड मिनिटांचे) रोमँटिक सीन्स हटवण्यात आले आहेत.
या बदलांशिवाय, सेन्सॉर बोर्डाने मेकर्सना चित्रपटात काम करणाऱ्या सर्व बालकलाकारांच्या पालकांचे संमतीपत्र आणि आवश्यक कागदपत्रे जमा करण्यास सांगितले होते. या सर्व कायदेशीर प्रक्रिया आणि आवश्यक बदल पूर्ण केल्यानंतर ८ मे रोजी चित्रपटाला सेन्सॉर प्रमाणपत्र जारी करण्यात आले आहे. या सर्व कात्रीनंतर आता चित्रपटाची एकूण लांबी २ तास १५ मिनिटे इतकी झाली आहे. या रोमँटिक ड्रामा चित्रपटाचे दिग्दर्शन विवेक सोनी यांनी केले असून, मोठ्या पडद्यावर अनन्या आणि लक्ष्यची जोडी पहिल्यांदाच एकत्र पाहायला मिळणार आहे.
'चांद मेरा दिल' या चित्रपटाची निर्मिती करण जोहरच्या 'धर्मा प्रॉडक्शन'अंतर्गत करण्यात आली असून करण जोहर, हीरू यश जोहर, अदार पूनावाला, अपूर्व मेहता, सोमन मिश्रा आणि मारिके डीसूजा हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. अनन्या पांडे आणि लक्ष्य लालवानी यांच्यातील सिझलिंग केमिस्ट्रीवर सेन्सॉर बोर्डाची कात्री चालल्यामुळे चाहत्यांमध्ये आता चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे. हा बहुप्रतिक्षित चित्रपट येत्या २२ मे रोजी चित्रपटगृहात रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे.