"अरिजीत माझ्याकडे आला अन् म्हणाला, भैय्या...", अभिजीत सावंतने सांगितला 'तो' किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 13:56 IST2026-02-27T13:56:05+5:302026-02-27T13:56:29+5:30
'बिग बॉस मराठी ५' मध्ये सहभागी झाल्यामुळे आता तो पुन्हा चर्चेत आला आहे.

"अरिजीत माझ्याकडे आला अन् म्हणाला, भैय्या...", अभिजीत सावंतने सांगितला 'तो' किस्सा
मराठमोळा गायक अभिजीत सावंतने २००५ साली 'इंडियन आयडॉल' सीझन १ ची ट्रॉफी जिंकली होती. धारावीत वाढलेला अभिजीत रातोरात देशभरात प्रसिद्ध झाला होता. 'मोहोब्बते लुटाऊँगा' सारखी त्याची गाणीही नंतर गाजली. अभिजीत सावंत मधल्या काळात गायब होता. 'बिग बॉस मराठी ५' मध्ये सहभागी झाल्यामुळे आता तो पुन्हा चर्चेत आला आहे. नुकतंच त्याने अरिजीत सिंहचा एक किस्सा सांगितला.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
अमोल परचुरेंच्या 'कॅचअप'ला दिलेल्या मुलाखतीत अभिजीत सावंत म्हणाला, "२००७-०८ दरम्यानची गोष्ट आहे. अरिजीत माझ्याकडे आला आणि म्हणाला की, 'भैय्या, मेरेको मेरे एरिया मे कॉन्सर्ट करना है'. तर मी म्हणालो, 'हो करुया ना'. त्याचं गाव कोलकाताच्या अजून पुढे आहे. तो आता तिथेच राहतो. त्याच्या गावाहून कोलकतालाच यायला चार तास लागतात. तो म्हणाला, 'भैय्या, माझ्या गावात खूप समस्या आहेत. मला लोकांना मदत करायची आहे. त्यासाठीच मला चॅरिटेबल शो करायचा आहे. तुमचा शो ठेवूया, आपण तिकीटं विकूया आणि जो नफा होईल तो मी गावासाठी देईन."
तो पुढे म्हणाला, "मी त्याला म्हटलं की करायला काहीच अडचण नाही. पण तू माझ्याकडून असे किती पैसे जमा करणार? जर तुला एका शहरासाठी काम करायचंय तर तुला जास्त निधी लागेल. तुला जास्त मोठा विचार करावा लागेल. मग मी, अरिजीत आणि बहुतेक प्राजक्ता शुक्रेही होती...आम्ही सोनूजींकडे गेलो. त्यांना ही संकल्पना ऐकवली. ते हो म्हणाले...पण पुढे गोष्टी होऊ शकल्या नाहीत. पण त्याला त्याच्या गावाबद्दल खूप प्रेम आहे. तो खूप शांत व्यक्ती आहे..गौतम बुद्धच आहे तो. असे लोक खरं तर खूप जपली पाहिजे. ते पाथ ब्रेकर्स आणि मेकर्सही असतात."
अरिजीत सिंहने काही दिवसांपूर्वी पार्श्वगायनातून निवृत्ती जाहीर केली. यामुळे सर्वांनाच धक्का बसला. तर यानंतर अभिजीत सावंतने इंडस्ट्रीत गायकांना किती कमी मानधन मिळतं याची पोलखोल केली होती. इतकंच नाही तर अनेक गायक फुकटातही काम करतात असं तो म्हणाला होता. दुसरीकडे अरिजीत सिंह आता स्वतंत्र म्युझिक बनवणार आहे. तसंच तो सध्या एका सिनेमाची निर्मिती आणि दिग्दर्शन करत आहे.