रामोजी ‘फिल्म सिटी’...एक विलोभनीय पर्यटनस्थळ !
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2016 15:46 IST
रामोजी ‘फिल्म सिटी’ मध्ये फक्त चित्रपटांचीच निर्मिती होत नसून, हे एक पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध होेत आहे. दक्षिण भारतातील हैदराबादमध्ये ही सुंदर फिल्म सिटी असून, सुमारे १५ हजार एकरात उभारली आहे.
रामोजी ‘फिल्म सिटी’...एक विलोभनीय पर्यटनस्थळ !
रामोजी ‘फिल्म सिटी’ मध्ये फक्त चित्रपटांचीच निर्मिती होत नसून, हे एक पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध होेत आहे. दक्षिण भारतातील हैदराबादमध्ये ही सुंदर फिल्म सिटी असून, सुमारे १५ हजार एकरात उभारली आहे. विशेष म्हणजे याची नोंद गिनिज बुकमध्येही झाली असून, जगातील सर्वात मोठा फिल्म स्टुडिओ कॉम्प्लेक्स आहे. यामुळेच येथे अनेक बॉलिवूड, टॉलिवूड फिल्म निर्मात्यांची मोठी सोय झाली आहे. चित्रपट निर्मितीशी संबंधित सगळ्या गोष्टी येथे उपलब्ध आहेत. एकाहून एक सुंदर उद्याने, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या भव्य व अप्रतिम वास्तू, बालकांसाठी असलेली सरस ‘सरप्रायझेस’ येथे आहेत. हैदराबाद शहरापासून सुमारे एक ते दीड तासाच्या अंतरावर हे निसर्गरम्य ठिकाण आहे. आजपर्यंत येथे तीन हजारांहून अधिक चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे. गाव-खेड्यापासून ते विदेशातल्या चकाचक लोकेशन्ससह विमान ते रेल्वेस्थानक अशी नानाविध लोकेशन्स येथे उपलब्ध आहेत. एका बाजूने न्यायालय तर दुसरीकडून आयुक्तालय, एका बाजूने मध्यवर्ती तुरुंग तर दुसरीकडून आलिशान बंगला, एकीकडे विमानतळ तर दुसरीकडे रुग्णालय आणि तिसरीकडे हॉटेल असे थक्क करणारे ‘मल्टिपर्पज’ सेट्स इथे दिमाखात उभे आहेत.याशिवाय फंडुस्तान, बोरासुरा (जादूगाराचा अड्डा), भगवतम, मोहक फुलपाखरू पार्क, रामोजी फिल्म फंडा, रामोजी मुव्ही मॅजिक, रामोजी टॉवर पर्यटकांच्या आनंदात भर टाकतात. ‘शांतिनिकेतन’ या बजेट हॉटेलसह ‘तारा‘, ‘सितारा’ ही आलिशान हॉटेल्स पर्यटकांच्या गरजेनुरूप सेवेला सज्ज आहेत. पर्यटनासह शाही लग्नसोहळे, कॉपोर्रेट मिटिंग्ज, वर्कशॉप्स आदींसाठीही रामोजी फिल्मसिटीची दालने खुली आहेत. अशा या सर्वसुविधा संपन्न ठिकाणाला एकदा तरी भेट द्यायलाच हवी !