- मोहिनी घारपुरे-देशमुख
अत्यंत तलम वस्त्रापासून बनवलेले झुळझुळीत असे मॅक्सी ड्रेस दैनंदिन वापरातही अत्यंत सुंदर दिसतात. हे ड्रेस पायापर्यंत लांब आणि वेगवेगळ्या टाईपच्या स्लीव्हजमुळे अत्यंत आकर्षक, सुंदर आणि स्टायलिश दिसतात. अलिकडे या प्रकारच्या ड्रेसेसमध्ये वेगवेगळ्या प्रिंट्स बाजारात उपलब्ध आहेत. त्यांपैकी फ्लोरल प्रिंट्स आणि प्लेन कलर्सची जास्त चलती आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसात हे तलम, मुलायम कापडापासून बनवलेले ड्रेस वापरणं अत्यंत आरामदायी असून त्याचा लुक देखील खूपच ग्रेसफुल असतो. शिफॉन, लिनन, कॉटन, क्रेप आदी कापडापासून बहुतेकरून तयार केले जाणारे हे मॅक्सी ड्रेसेस वेगवेगळ्या आकाराच्या गळ्यांच्या पॅटर्नमुळे आणि बाह्यांच्या वेगवेगळ्या प्रकारांमुळे अत्यंत आकर्षक दिसतात. या कापडांच्या मॅक्सीवर लेसवर्कअधिक प्रमाणात असतं. साधारणत: दिड ते दोन हजारापासून वीस एक हजारांपर्यंत हे ड्रेसेस बाजारात उपलब्ध आहेत. त्याचबरोबर इंटरनेटवरही वेगवेगळ्या साईट्सवर या मॅक्सी ड्रेसेसचे अक्षरश: शेकडो प्रकार विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तरीही ते स्वत:साठी घ्यायचे म्हटलं तर केवळ डोळ्यांना छान दिसतात म्हणून घेवू नये. आपल्याला ते कसे दिसतील आणि काय केलं तर चांगले दिसतील याचा विचार करूनच ते घ्यावेत.
मॅक्सी ड्रेस कसे शोभतील?
* मॅक्सी ड्रेसेस कॅरी करताना आपली उंची, एकंदर बांधा आणि वय या साऱ्याच बाबींचा विचार करून योग्य तो मॅक्सी ड्रेस निवडावा अन्यथा तो अजिबात सूट होणार नाही आणि ड्रेस कितीही चांगला असला तरी अंगावर प्रत्यक्ष घातल्यानंतर त्याचा लुक ओंगळवाणा दिसेल.
* मॅक्सी ड्रेस निवडताना तो साधारण अँकल लेंग्थपर्यंत असेल असाच निवडावा. त्यापेक्षा लांब किंवा त्यापेक्षा लहान मॅक्सी ड्रेस बरेचदा चीप दिसू शकतात.
* रंग, प्रिंट्स आणि कपडा याचा एस्थेटीक सेंन्स वापरून निवड करावी. कितीही छान दिसला तरीही आपल्याला तो शोभेल का याचाही विचार करावा.
* कॅज्युअल आऊटफीट ते पार्टीवेअर अशा प्रकारात मॅक्सी ड्रेसेस उपलब्ध आहेत परंतु त्यासोबत पायात शूज, सॉक्स, गमबूट, फ्लिपफ्लॉप्स वगैरे अजिबातच घालू नका ते अगदीच ओंगळवाणे दिसतं. * त्याऐवजी छानशा, नाजूकशा सँडल्स आणि डायमंड ज्वेलरी किंवा चोकरही चालेल. हेअरस्टाईलही अगदी शोभेल अशी करा. झोला पर्स किंवा मोठ्या बँग्स या ड्रेससोबत नकोतच. त्यापेक्षा क्लच किंवा स्मार्ट हँडपर्स वापरा.