ऑनलाइन लोकमतबंगळुरु, दि. 10 - ई-कॉर्मस वेबसाइटवरुन अनेकदा मोबाईल मागवला आणि आले साबण अशा बातम्या तुम्ही खूप वाचल्या असतील पण बंगळुरुतील एका महिलेने ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट असलेल्या अॅमेझॉनला अशा प्रकारे फसवले आहे, की तुम्ही विश्वासच ठेवू शकणार नाही. बंगळुरुत आज सकाळी अॅमेझॉन कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली आहे. ऑनलाइन शॉपिंग करुन दुय्यम दर्जाचे सामान कंपनीला माघारी करत असल्याचा आरोप त्या महिलेवर अॅमेझॉन इंडियाने केला आहे. अशा प्रकारे गेल्या वर्षभरात त्या महिलेने अॅमेझॉनला 69.91 लाख रुपयांचा चुना लावला आहे. मूळची पश्चिम बंगाल येथील असलेली 32 वर्षीय दीपांविता घोष ही व्यवसायाने इंजिनीअर आहे. आपल्या पतीसमवेत ती बंगळुरुत राहत आहे. एका आयटी कंपनीत कामाला असणाऱ्या दीपांविता घोषला ऑनलाइन खरेदी करण्याचे आवड आहे. पूर्ण सिस्टीमला चातुर्याने तिने चुना लावला. 18 एप्रिल रोजी पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या तक्रारीनुसार, दीपांविता घोषने बनावट नावाचा वापर करत 104 वेळा खरेदी केली. यामध्ये तिने डीएसएलआर कॅमेरा, टीव्ही सारख्या महागड्या वस्तूंचा समावेश होता. घोष महागड्या वस्तू विकत घेऊन 24 तासाच्या आत माघारी पाठवत असे. बंगळुरु पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घोष प्रत्येक वेळी नव्या पत्त्यावरुन खरेदी करत असे, त्यानंतर 24 तासांत रिफंड मागत असे. आपल्या खात्यावर पैसे जमा झाल्यावर ती अॅमेझॉनला स्वस्त वस्तू देत असे. अशा प्रकारच्या घटना बंगळुरूत वाढल्यानंतर कंपनीने शिताफीने घोषचा शोध घेत पोलिसात तक्रार दाखल केली.
महिलेने अॅमेझॉनची केली 70 लाखांची फसवणूक
By admin | Updated: May 10, 2017 17:35 IST