शहरं
Join us  
Trending Stories
1
कपडे फाडले; लाथा मारल्या, धमकी दिली, जगतापांनी आयोगाला दिलेल्या तक्रार अर्जात धक्कादायक बाबी समोर
2
टीम इंडियातील 'प्रिन्स'च्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ; गंभीर-गिल जोडीसह कसोटीत नवे पर्व
3
धक्कादायक! ४० हजारांसाठी देशाशी गद्दारी; गुजरातच्या कच्छमधून पाकिस्तानी गुप्तहेराला अटक
4
IND vs ENG : तो चांगला खेळतोय; पण...श्रेयस अय्यर कसोटी संघात का नाही? अजित आगरकर यांनी असं दिलं उत्तर
5
बिपाशाच का ही? अभिनेत्रीचा व्हिडिओ पाहून नेटकरी शॉक; एकेकाळची 'फिटनेस दिवा' आता...
6
Covid-19: चिंता वाढली! कळव्यात २१ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू
7
लग्नादरम्यान भर मंडपातून वराचं अपहरण, समोर आलं धक्कादायक कारण, कुटुंबीयांच्या तोंडचं पळालं पाणी  
8
४ ग्रह, ४ राजयोग: १० राशींवर लक्ष्मी प्रसन्न, भरघोस भरभराट; बक्कळ पैसा, बंपर लाभ, वरदान काळ!
9
धक्कादायक! गाण्याचा आवाज कमी करायला सांगितल्याने पती चिडला, पत्नीवर फेकले टॉयलेट क्लीनर
10
प्रेमाच्या जाळ्यात अडकवून बनवले तरुणींचे अश्लील व्हिडीओ; ७ आरोपींची पोलिसांनी काढली धिंड
11
ऑपरेशन सिंदूर: सैन्याने IPS अधिकाऱ्याचा सन्मान का केला? पाकिस्तानचा रहीम यार खान एअरबेस जवळच होता...
12
बुलेट ट्रेनचं देशातील पहिलं रेल्वे स्टेशन बांधून तयार, या दोन स्थानकांदरम्यान धावणार पहिली ट्रेन
13
Somavati Amavasya 2025: पितरांच्या फोटोची जागा तर अयोग्य नाही? सोमवती अमवास्येला करा बदल!
14
कोसळल्या धारा...! केरळमध्ये मान्सून दाखल झाला; महाराष्ट्रात कधी पोहोचणार...
15
Nuclear Weapon : ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानच्या अण्वस्त्रांचं नुकसान झालं? पाकचं परराष्ट्र मंत्रालय म्हणतंय... 
16
"काळजी करू नका…’’ पुंछमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात नुकसान झेलणाऱ्या पीडितांना राहुल गांधींनी दिला धीर
17
Corona Virus : मास्क लावायला हवा का, बूस्टर डोसची गरज आहे का, कोरोनाचा JN.1 व्हेरिएंट किती संसर्गजन्य?
18
'सन ऑफ सरदार' फेम अभिनेत्याचं वयाच्या ५४ व्या वर्षी निधन; उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास
19
पोर्शे प्रकरणातील डॉ. अजय तावरेचा आणखी एक कारनामा; रुबी हॉलच्या किडनी रॅकेटमध्ये सहआरोपी
20
अरे देवा! तरुणाला चष्मा न लावणं पडलं महागात; ५०० रुपयांऐवजी गमावले तब्बल ९० हजार

योग हा धर्म नव्हे ?

By admin | Updated: June 12, 2015 23:46 IST

योग हा हिंदू धर्माचा भागच नव्हे असे ज्ञानी वचन उच्चारून भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मनुष्यबळ विकास मंत्री मुरली मनोहर जोशी यांनी देशातील सगळ्या अज्ञ जनांना ज्ञानाचा जबर

योग हा हिंदू धर्माचा भागच नव्हे असे ज्ञानी वचन उच्चारून भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मनुष्यबळ विकास मंत्री मुरली मनोहर जोशी यांनी देशातील सगळ्या अज्ञ जनांना ज्ञानाचा जबर धक्का दिला आहे. न्याय-वैशेषिक, सांख्य-योग आणि पूर्वोत्तर मीमांसा ही वैदिक धर्माची आरंभकालीन, अभ्यासनीय व वंदनीय सूत्रे आहेत असेच अनेकांप्रमाणे आम्हीही समजत होतो. पतंजलीची योगसूत्रे हा धर्मशास्त्राचाच एक भाग आहे आणि पतंजली हा सर्व हिंदूंना पूजनीय असलेला खरा व मूळ योगगुरू आहे असाच आमचा समज होता. पतंजलीची योगसूत्रे ही अखेर त्या ब्रह्म्याशी तादात्म्य पावण्याच्या मुमुक्षुंच्या इच्छेनुरूपच बेतलेली शास्त्रशुद्ध परंपरा आहे, असे आमच्याप्रमाणे इतरही अनेकांना वाटत होते. परंतु मुरली मनोहरांच्या ताज्या वक्तव्याने योगाची बदली धर्मातून राजकारणात केली असल्यामुळे आपल्या धर्मनिरपेक्ष परंपरेप्रमाणे त्याचा धर्माशी संबंध उरला नसावा. आता योग म्हणजे नुसताच शारीरिक व मानसिक व्यायाम. त्याचा ब्रह्म्याशी वा आत्म्याशी संबंध नाही. परिणामी तो सर्व धर्मांना लागू करण्यात कोणता प्रत्यवायही नाही. महाराष्ट्राचे एक शहाणे मंत्री एकनाथ खडसे म्हणतात, मुसलमानांचा नमाज म्हणजेही योगच असल्यामुळे त्यांनी योगाला विरोध करण्याचे कारण नाही. नमाज ही अल्लासमोरची तर योग ही ब्रह्मासमोरची शरणागत अवस्था आहे आणि त्या दोहोंच्या मानसिकतेत व श्रद्धाविषयात जराही साम्य नाही ही गोष्ट खडशांना ठाऊक नसेल तर त्यांनी संघाच्या कोणत्याही अभ्यासू स्वयंसेवकाकडून ती समजून घेणे गरजेचे आहे. आपले असे हसे करून घेण्यापेक्षा हा अभ्यास त्यांच्यासाठी महत्त्वाचा ठरावा. योग ही भारताची व त्यातही हिंदू धर्माची गेल्या दोन हजार वर्षांहून जुनी परंपरा आहे. ती नुसती व्यायामाशीच नाही तर अध्यात्माशी व मोक्षमार्गाशीही संबंध राखणारी आहे. पतंजली योगसूत्राचे अखेरचे अध्याय ज्यांनी वाचले असतील त्यांना हे कळणारेही आहे. शिवाय सरकारच्या मदतीला धावून आलेले रामदेवबाबाही याबाबत मुरली मनोहर आणि एकनाथ खडसे यांना बरेच काही शिकवू शकणारे आहेत. प्रत्यक्षात योग प्रकार किंवा योगाचे सामुदायिक आयोजन हा रा.स्व. संघाच्या, विहिंपच्या व त्याचमुळे भाजपाच्या छुप्या अजेंड्याचा भाग आहे. साऱ्या देशाला हिंदुत्वाचा भगवा रंग फासण्याच्या त्याच्या कार्यक्रमाशी तो संबंधित आहे. त्याने छत्तीसगडमध्ये सूर्यनमस्कार आणले, गुजरातेत सरस्वतीपूजन आणले, मध्य प्रदेशात गीताध्ययन आवश्यक केले आणि राजस्थानात वैदिक धर्माचे काही भाग अभ्यासक्रमात टाकले. महाराष्ट्र व हरियाणात गोवंशहत्त्या बंदीचे कायदे करून शेतकऱ्यांवर भाकड जनावरे पोसण्याची सक्ती लादली. भाजपाचे राज्य जिथे असेल तिथे हिंदुत्वाशी संबंधित व धर्मनिरपेक्षतेच्या विरोधात जाणारा कोणतातरी कार्यक्रम राबविणे हा त्या पक्षाच्या धार्मिक राजकारणाचा एक भाग आहे. त्याचमुळे देशातील धर्मनिरपेक्ष शक्तींनी त्याकडे फार काळजीने पाहणे गरजेचेही आहे. दिल्लीत मोदींचे सरकार आहे आणि त्याचा कारभार साऱ्या देशावर चालणारा आहे. त्यामुळे त्याच्या माध्यमातून देशभर योगासने घडवून आणण्याची त्याची आताची योजना आहे. ती जाहीर होताच अल्पसंख्यकांचे वर्ग व धर्मनिरपेक्ष राजकारणावर श्रद्धा असणाऱ्यांचे पक्ष व समूह त्याविरुद्ध संघटितपणे उभे झालेले दिसले. त्यांचा जोर लक्षात घेऊन सरकारने या योगासनातून प्रथम सूर्यनमस्कार वजा केले, पुढे जाऊन या योगासनात भाग घेण्याचे नागरिकांवर बंधन नाही असे जाहीर करून त्या लादालादीतून सपशेल माघारच घेतली. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दिलेल्या माहितीनुसार राजपथावर होणाऱ्या योगासनाच्या वर्गात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता सहभागी होणार नाहीत. सरकारची ही माघार हा आपला विजय आहे असे धर्मनिरपेक्ष शक्तींनी आताच समजण्याचे मात्र कारण नाही. कारण ‘चार वर्षात राममंदीर’ किंवा ‘शिक्षणाचे धार्मिकीकरण’ आणि ‘इतिहासाचे संघानुकूल लेखन’ हे कार्यक्रम अजून बाकी आहेत. जमेल तेथे संघाची माणसे कुलगुरूपदापासून अन्य पदांवर नेमणे सुरू झाले आहे. तसे करताना त्यांचा अध्ययनातला व संबंधित क्षेत्रातला अधिकार तपासावा असेही त्या नेमणूकदारांना वाटल्याचे दिसले नाही. हे सारे करीत असताना या मंडळीकडून होणारा प्रचार मात्र करमणूक करणारा राहिला आहे. मुरली मनोहर जोशींसारखा अलाहाबादी प्राध्यापक जेव्हा योगाचा धर्माशी संबंध नाही असे म्हणतो तेव्हा त्यातले जोशींचे अध्ययन खरे की त्यांच्यातला प्रचारक प्रभावी असा प्रश्न पडतो. एकनाथ खडशांकडून यातल्या कशाचीही अपेक्षा करण्यात अर्थ नाही. मात्र सुषमा स्वराज, अरुण जेटली किंवा रामदेवबाबासह हिंदू धर्माचे आचार्य, मुनी, साधू आणि संन्याशी योगाचा धर्माशी संबंध नाही या जोशींच्या विधानावर कोणती प्रतिक्रिया नोंदवितात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र राजकारण हे अशा अडचणींच्या प्रश्नावर मौन बाळगण्याचे क्षेत्र आहे. त्यामुळे याहीविषयी सारे गप्प राहिले तर आपण त्याचे नवल वाटू देण्याचे कारण नाही. तसेही मुरली मनोहर हे त्यांच्या पक्षात फारसे वजन नसलेले नेते आहेत आणि एकनाथ खडसे हे मुख्यमंत्रिपद न मिळाल्यामुळे रुसून बसल्याचे महाराष्ट्राने पाहिले आहे.