शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

यादवी!

By admin | Updated: September 17, 2016 04:50 IST

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि त्यांचे चुलते शिवपाल यादव यांच्यातील यादवी त्या राज्याच्या राजकारणात उतरली असून त्याचे प्रशासकीय व्यवहार त्यामुळे पुरते थंडावले आहेत.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि त्यांचे चुलते शिवपाल यादव यांच्यातील यादवी त्या राज्याच्या राजकारणात उतरली असून त्याचे प्रशासकीय व्यवहार त्यामुळे पुरते थंडावले आहेत. काका-पुतण्यातले हे भांडण सोडविण्यात त्यांच्या पक्षाचे सर्वोच्च नेते मुलायमसिंह यादव अपयशी होत असल्याचे दिसल्याने त्यांच्या समाजवादी पक्षाच्या अन्य नेत्यांत व कार्यकर्त्यांतही कमालीची दिशाहीनता व गोंधळलेपण आले आहे. समाजवादी पक्षात मुलायमसिंह यांना नेताजी म्हटले जाते आणि त्यांचा शब्द अखेरचा समजला जातो. गेली २५ वर्षे त्या पक्षाची अशी एकचालकानुवर्ती स्थिती राहिली आहे. यादव-मुस्लीम व बहुजन यांची संयुक्त आघाडी बनवून ती पक्षामागे उभी करण्यात मुलायमसिंहांनी सारे आयुष्य वेचले. त्यांच्या पक्षाचे बळ व सध्याची त्याची सत्तास्थिती त्याच परिश्रमावर उभी आहे. स्वाभाविकच त्यांचा शब्द त्यांच्या पक्षात आज्ञेप्रमाणे चालतो व सारेजण त्याचा निष्ठापूर्वक आदर करतात. मात्र पुत्र आणि भाऊ या दोघांच्या ओढाताणीत आता या नेताजींची अवस्थाही एकेकाळी घरात सर्वोच्च सत्ता वापरलेल्या व आता दुर्लक्षिल्या जाणाऱ्या म्हाताऱ्यासारखी झाली आहे. अखिलेश यादव यांना आपल्या पक्षाला तरुणाईच्या व विकासाच्या दिशेने न्यायचे आहे. विधानसभेची या आधीची निवडणूक त्यांनी याच वाटेने जाऊन जिंकली व नेताजींनीही त्यांच्या नेतृत्वाचा आदर करीत स्वत:ऐवजी त्यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रिपद दिले. मात्र नेताजींच्या घरातील किमान एक डझन माणसे संसदेत, राज्याच्या मंत्रिमंडळात किंवा विधानमंडळात आहेत आणि त्या साऱ्यांनाच सत्ताकांक्षेने पछाडले आहे. स्वत: शिवपालसिह यादव राज्यातले दुसऱ्या क्रमांकाचे नेते आहेत आणि महसूल व सिंचनसारखी महत्त्वाची खाती त्यांच्या हाती आहेत. शिवाय प्रशासनातील वरिष्ठ अधिकारीही त्यांच्याच कलाने वागतात असे त्या राज्यात बोलले जाते. शिवपाल यादवांच्या राजकारणाची दिशा जुनी व जुन्या धोरणांना चिकटून राहाणारी आहे. त्यांना पक्षातली जुनी माणसे व त्यातले जातीय समीकरण तसेच टिकवायचे आहे. तात्पर्य, तरुणाई आणि विकास विरुद्ध परंपरा आणि जातीय समीकरण यांच्यातले हे भांडण आहे. नेताजींना दोन्ही बाजू एकत्र राहाव्या आणि त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीला संघटितपणे तोंड द्यावे असे वाटते. मात्र अखिलेश आणि शिवपाल या दोघांनाही येत्या निवडणुकीचे नेतृत्व आपणच करावे या महत्त्वाकांक्षेने ग्रासले आहे. शिवपाल यादवांची ताकद कमी करण्यासाठी अखिलेश यादवांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या अधिकारांचा वापर करून राज्याचे मुख्य सचिव दीपक सिंघल यांना नुकतेच निष्कासित केले. हे अधिकारी शिवपाल यादवांच्या लहरीनुसार वागतात व मुख्यमंत्र्यांविरुद्ध सार्वजनिकरीत्या टवाळीची भाषा वापरतात याचा अखिलेश यांना राग आहे. गेल्या काही काळापासून त्यांनी स्वत:च्या मर्जीनुसार राज्यकारभार हाकायलाही सुरुवात केली आहे. नेताजींचे म्हणणे मला शिरोधार्ह आहे असे एकीकडे म्हणत असतानाच दुसरीकडे प्रशासनात ते स्वत:च्या इच्छेनुरुप निर्णय घेताना दिसले आहेत. पुत्राचे हे वर्तन नेताजींनाही अस्वस्थ करणारे ठरल्याने त्यांनी त्याला धडा शिकवण्यासाठी त्याच्याकडे असलेले राज्याचे पक्षाध्यक्षपद काढून ते शिवपाल यादवांकडे अलीकडे सुपूर्द केले. त्यावर कुरघोडी करताना अखिलेश यादवांनी शिवपाल यादवांकडील महसूल व सिंचनासारखी महत्त्वाची खाती काढून घेऊन त्यांना समाज कल्याणासारखे हलकेफुलके खाते देऊ केले. शिवपाल यादवांनी आता मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी व मुलगा यांनीही त्यांच्याकडची पदे सोडली आहेत. हे सारे नेताजींना उघड्या डोळ््यांनी व काही एक न करता पाहावे लागत आहे. पक्षातील काही जाणकारांच्या मते नेताजींना आपल्या पुत्राचे महात्म्य अधिक प्रिय आहे तर इतरांच्या मते त्यांना पक्षाच्या ऐक्याएवढेच त्यांच्या कुटुंबाचे ऐक्य आवडणारे आहे. सबब नेताजी द्विधा मनस्थितीत आहेत. त्यातच अखिलेश यादव यांनी आता पक्षाचे राज्यसभेतील नवनिर्वाचित सभासद व एकेकाळचे पक्षाचे सचिव अमर सिंह यांना या वादात ओढले असून त्यांनीच पक्षात आताची भांडणे लावली असा आरोप केला आहे. अमरसिंहांनी आपण त्यापासून दूर असल्याचे सांगून स्वत:चा बचावही केला आहे. समाजवादी पक्षातले हे भांडण लवकर मिटले नाही तर त्याला अशाच स्थितीत विधानसभेच्या निवडणुकीला तोंड द्यावे लागणार आहे. त्या निवडणुकीत त्यांच्या विरोधात राहुल गांधींच्या नेतृत्वातील काँग्रेस, मायावतींच्या नेतृत्वातील बहुजन समाज पक्ष आणि अमित शाह यांची भाजपा उभे आहेत. निवडणुकीला राष्ट्रीय युद्धाचे स्वरुप आहे. जो पक्ष उत्तर प्रदेशावर राज्य करील त्याला दिल्लीवर आपला प्रभाव कायम करता येतो असे म्हटले जाते. मुलायमसिंहांना त्यांच्या पक्षाचा आजचा प्रभाव टिकवायचा व वाढवायचा असेल तर त्यांनी त्यांच्या घरातली यादवी तत्काळ थांबविली पाहिजे. या यादवीमुळे काँग्रेस, बसपा आणि भाजपा यांनी आपल्या प्रचार यंत्रणांना आताच चालना दिली असून येती निवडणूक अटीतटीची असेल असे चित्र उभे केले आहे.