शहरं
Join us  
Trending Stories
1
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
2
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
3
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
4
'हल्ली मुली नग्न होऊन पैसे कमावत आहेत'; साध्वी ऋतंभरा यांच्या विधानाने नवा वाद
5
फक्त ३,००० रुपये भरा आणि वर्षभर टोल फ्री प्रवास करा, १५ ऑगस्टपासून नवा नियम! फक्त 'या' वाहनांना लागू
6
Mahabharat: एखादी गोष्ट बायकांच्या पोटात राहत नाही, त्याला कारणीभूतआहे महाभारतातली 'ही' कथा!
7
IND vs ENG : एक धाव वाचवण्याच्या नादात 'मॅच विनर' खेळाडू कसोटीतून OUT; टीम इंडिया याचा फायदा उठवणार?
8
PM Kisan योजनेच्या २० व्या हप्त्यासाठी फक्त एक दिवस शिल्लक; लाभार्थींच्या यादीत नाव आहे का चेक करा
9
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
10
चीनमुळे अनेक उद्योगांवर संकट, सामना करण्यासाठी आता भारताचा 'मास्टर प्लान', सरकार उचलणार पाऊल?
11
महाराष्ट्र बदलतोय : पैठणी ते कोल्हापुरी चप्पल, MSME उद्योगांची डिजिटल झेप!
12
२ पिढ्या पण ध्येय एकच! माय-लेकीच्या जोडीची दमदार कामगिरी, एकत्र पास केली NEET
13
दमदार इंजिन, शानदार मायलेज..; Honda ने लॉन्च केली स्वस्त स्पोर्ट्स बाईक, किंमत...
14
Powerful Air Forces : जगातील सगळ्यात ताकदवान हवाई दलं; भारत 'टॉप ५'मध्ये कितव्या स्थानावर?
15
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
16
रमीला ऑलिम्पिक दर्जा मिळणार, कोकाटेंना क्रीडा मंत्रालय देऊन सन्मानच; काँग्रेसचा महायुतीला चिमटा
17
Monsoon Recipe: तुम्ही कधी पंजाबी शिरा 'प्यायलात' का? ट्राय करा, पावसाळी आजारांवरचा चविष्ट उपाय!
18
ओव्हल कसोटीत टीम इंडियाकडून झाली मोठी चूक, ठरू शकते पराभवाचं कारण  
19
UPI New Rule: आजपासून लागू झाले यूपीआयचे नवे नियम; सारखं सारखं करता येणार नाही 'हे' काम
20
दीड वर्षांचा लेक, महिन्याभरापूर्वी प्रमोशन; लेफ्टनंट कर्नल भानू प्रताप शहीद, दगड पडले अन्...

शरद जोशी नसताना...

By admin | Updated: January 5, 2016 00:05 IST

शेतकऱ्यांच्या दु:खाशी एकरूप होण्यासाठी शरद जोशी शेतकरी झाले. त्यासाठी या शेतकरी योद्ध्याने स्वत:चा संसार स्वत:च्या हातानी मोडला. उबळ आली किंवा उमाळा दाटून आला

शेतकऱ्यांच्या दु:खाशी एकरूप होण्यासाठी शरद जोशी शेतकरी झाले. त्यासाठी या शेतकरी योद्ध्याने स्वत:चा संसार स्वत:च्या हातानी मोडला. उबळ आली किंवा उमाळा दाटून आला म्हणून त्यांनी शेतकऱ्यांसाठी लढा उभारला नाही. शेतकरी विधवांना ‘एकरकमी’ मदत करायची, डोळ्यात पाणी आणायचे, अश्रूंचे आणि भावनात्मक संवादाचे फाऊंडेशन उभारायचे. एकदा हा भर ओसरला की शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून आपल्या मायावी जगात मग्न व्हायचे, अशी नाटके शरद जोशींना कधी जमली नाहीत. नंतर शेतकरी संघटनेची अनेक शकले झाली. शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्यासाठी सुरु झालेली ही लढाई केवळ वाटाघाटींच्या चौकटीत बंदिस्त होत गेली. राजकारण्यांच्या जाळ्यात जोशी अलगद सापडले. त्यांच्या चुकीच्या निर्णयांमुळे चळवळीचेच नुकसान झाले. पण त्यांच्या त्यागाबद्दल कुणी शंका घेतली नाही. आज ते नसताना त्यांच्यानंतर शेतकऱ्यांच्या चळवळीचे काय, या प्रश्नाने विदर्भातील कार्यकर्ते अस्वस्थ आहेत.शरद जोशींनी शेतकरी संघटना स्थापन केली, तोवर बहुतांश राजकीय पक्ष शेतकऱ्यांना कस्पटासमान वागवायचे. उद्योगांसाठी भांडवल उभारणी करायची असेल तर शेतमालाच्या किमती सातत्याने खालच्या पातळीवर स्थिर ठेवणे हेच सरकारचे धोरण होते. अस्मानी आणि सुल्तानी संकटाच्या या काळात शेतकऱ्यांना त्यांच्या दु:खाचे मूळ समजावून सांगण्यासाठी जोशींनी जीवाचे रान केले. या चळवळीचा झंझावात एवढा की, १९८० पूर्वी लाल किल्ल्यावरून भाषण देताना शेतकऱ्यांबद्दल चकार शब्द न काढणारे पंतप्रधान शेतकऱ्यांबद्दल बोलू लागले. ही किमया जोशींच्या आंदोलनाची होती. आंदोलनकर्त्यांची ताकद तरी केवढी? दिसायला अगदीच मरतुकडा, पोट खपाटी गेलेला, पिढ्यानपिढ्यांपासून गांजलेला, उभे राहण्याचेही त्राण नसलेला... जोशी सांगायचे, ‘‘तुम्ही काहीच करु नका, फक्त हातावर हात बांधून बांधावर बसून राहा, ‘आम्ही आमच्यापुरते पेरू, आम्हीच खाऊ, तुम्हाला देणार नाही,’ असे ताठर होऊन तेवढे सांगा.’’ राज्यकर्त्यांना वठणीवर आणण्याचा हा अहिंसक मार्ग गांधींच्या अधिक जवळ जाणारा होता. या आंदोलनाच्या माध्यमातून व्यवस्था परिवर्तनासोबतच त्यांना लोकशिक्षणही घडवायचे होते. म्हणूनच शेतकऱ्यांच्या मागणीला त्यांनी स्वातंत्र्याच्या लढाईशी जोडले. जातीधर्मात विभागलेले राजकारण अर्थकारणाच्या दिशेने नेण्याचा क्रांतिकारक प्रयत्न जोशींनी केला. तो त्यांच्या हयातीत यशस्वी होऊ शकला नाही. पण भविष्यातील राजकारण त्यावरच केंद्रित राहणार आहे.भारत आणि इंडिया यांच्यातील विसंगती शरद जोशींनीच पहिल्यांदा समोर आणली. कोट्यवधींचे कर्ज बुडविणारा मद्यसम्राट निर्लज्जपणे पार्ट्यांमध्ये मिरवतो. फुटपाथवर झोपलेल्या गरिबांना चिरडणारा दिवटा नट पंतप्रधानांसोबत पतंग उडवितो, हे इंडियाचे दृश्य आणि बँकेचे दहा हजाराचे कर्ज फेडू न शकणारा विदर्भातील शेतकरी बायको-पोरांसह जहर खाऊन मृत्यूला कवटाळतो, हे भारताचे विदारक वास्तव! ते काल होते, आज आहे, कदाचित उद्याही राहील. त्यांची लढाई यासाठीच होती. पुढच्या काळात तिचा वणवा होईल, पण त्यावेळी हा लढवय्या नेता नसेल. शरद जोशींनतर शेतकऱ्यांच्या चळवळीची धुरा समर्थपणे पुढे नेऊ शकणारा कुणी नेता अवतीभवती दिसत नाही. शेतकऱ्यांची आंदोलने ट्रेड युनियनच्या धर्तीवर, प्रादेशिक मागण्यांवर आधारित पुढे नेणाऱ्या शेतकरी नेत्यांचा हा काळ आहे. शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्याची लढाई आता मागण्यांची झाली आहे. अशावेळी नेत्यांपुढे आश्वासनांचे तुकडे फेकून चळवळी मोडीत काढणे राज्यकर्त्यांना सोपे जाते. खासदारकी किंवा महामंडळांचा लाल दिवा बहाल केला की ‘शेतकरी नेते’ म्हणून त्यांना आपले अस्तित्वही टिकवून ठेवता येते. पुढच्या काळात वैयक्तिक स्वार्थासाठी शेतकऱ्यांच्या मतांचा लिलाव करणारे असे पायलीचे पन्नास नेते येतील. त्यावेळीही शेतकऱ्यांना शरद जोशींची पदोपदी उणीव जाणवेल ती अशी... - गजानन जानभोर