शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
5
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
6
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
7
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
8
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
9
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
10
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
11
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
12
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
13
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
14
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
15
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
16
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
17
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
18
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
19
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
20
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले

ज्याच्या त्याच्या पाठीला केवळ खंजिराचीच भीती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 08:08 IST

स्पीच संपलं. काका उठले. दादाही त्यांच्या ‘पाठी’मागं निघाले. मात्र लगेच त्यांचा हात धरून काकांनी त्यांना आपल्या‘सोबत’ घेतल्याचं मुनींनी पाहिलं...

- सचिन जवळकोटे

रंभा अन्‌ उर्वशीतला वाद काही मिटता मिटत नव्हता. अखेर इंद्र महाराजांनाच यात मध्यस्थी करावी लागली, ‘काय चाललंय तरी काय तुम्हा दोघींचं? आघाडी सरकारमधले नेतेही भांडत नसतील एवढा तुम्ही विषय ताणताहात. स्वत:ला काय नाना समजताहात की दादा?’ - महाराजांच्या खोचक प्रश्नावर दोघीही चपापल्या. 

‘आम्ही दोघी भांडतो, रुसतो, फुगतो; परंतु त्या मंडळींबरोबर नका ना आमची तुलना करू. आम्ही नक्कीच त्यांच्यापेक्षा अधिक समजूतदार आहोत,’- दोघींनीही एका तालात, एका सुरात सांगितलं. दरबारात हशा पिकला. वातावरण हलकं-फुलकं बनलं. ‘पण, काय मुनीऽऽ या तीन पार्ट्यांमध्ये नेमका प्रॉब्लेम तरी काय? सातत्यानं का फील येतोय सार्वजनिक नळावरचा?’ - महाराजांनी विचारताच नारद उत्तरले, ‘केवळ आपल्यालाच नव्हे, तर अवघ्या महाराष्ट्राला हा प्रश्न पडलाय. मी समक्ष जाऊनच शोध घेतो. आज्ञा असावी.’ 

वीणा झंकारत नारद भूतलावर पोहोचले. सुरुवातीला त्यांना पटोले नाना भेटले. ते कुणाशीतरी मोबाइलवरून बोलत होते, ‘हे बघ राजू.. मला वर्षा सूट होईल की दुसरा बंगला, याचा निर्णय उद्या घेतो. तोपर्यंत दोन-तीन लाल दिव्यांच्या नव्या कोऱ्या गाड्या आजच बुक करून ठेव. एक मुंबईत तर दुसरी भंडाऱ्यात फिरण्यासाठी.’ 

ते आपल्या राजू पीएसोबत ‘भावी सीएम’पदाची चर्चा करताहेत, हे मुनींच्या लक्षात आलं.‘तुमची तयारी तर भलतीच जोरात दिसतेय नानाभाऊऽऽ मग सध्याचे सीएम कुठं जाणार?’- नारदांनी खोदून विचारताच नाना नेहमीप्रमाणं ठसक्यात बोलले, ‘ते पीएमना विचारा. चला जाऊ द्या मला विदर्भाच्या दौऱ्यावर.’ नाना निघाले. पाठमोरे झाले. त्यांची पाठ जरा मोठी वाटली. नारदांनी विचारताच एका कार्यकर्त्यानं कानात सांगितलं, ‘आजकाल नाना शर्टाच्या आत चिलखत घालून फिरताहेत.’ 

मुनी दादरला गेले. तिथं रौतांचे संजयराव भेटले. मुनींनी विचारलं, ‘तुमचे पॉलिटिकल पार्टनर नाना म्हणत होते की, सीएमबद्दल पीएमना विचारा. त्या दोघांचं काय दिल्लीत ठरलं-बिरलं की काय?’ डोकं खाजवत संजयराव हळूच कुजबुजले, ‘आजकाल काय चाललंय, हे मलाही कळेनासं झालंय. माझेपण आडाखे चुकू लागलेत. मलाही धोरण बदलावं लागणार की काय, असं वाटू लागलंय.’ नारद गालातल्या गालात हसत म्हणाले, ‘कदाचित थोरले काका बारामतीकरांपर्यंत या हालचाली पोहोचू नयेत म्हणून तुमच्यापासूनही गुप्त ठेवल्या जात असाव्यात.. पण काय हो, दिल्लीच्या भेटीत काहीतरी गिफ्ट दिलंय म्हणे नमोंनी खास?’ यावर रौतांनी बोलणं टाळलं; मात्र प्रतापराव घाईघाईनं बोलले, ‘होय. होय. तेच ते चिलखत घालून आमचे सीएम फिरताहेत सर्वत्र. माझ्या लेटरमध्येही लिहिलंय की तसं!’ 

पुन्हा पाठीवरच्या चिलखताचा विषय कानावर पडताच मुनी चमकले. त्यांनी थेट बारामतीची वाट धरली. गोविंद बागेजवळ प्रशांत किशोर यांचा कार ड्रायव्हर भेटला, ‘भविष्य में हमारे साब का हेड ऑफिस इसी गाँव मे होगा क्या?’ - तो घाबरून विचारत होता. बंगल्यात अनेक नेत्यांची मिटिंग सुरू होती. एका स्टील कंपनीचा अधिकारी पीपीटी सादर करत होता. खासगी साखर कारखान्यांनंतर अजितदादांनी आता स्टील फॅक्टरीतही लक्ष घातलं की काय, असं उगाच मुनींना वाटून गेलं. ऑफिसर शेवटी बोलला, ‘कितीही ॲटॅक होऊ देत. आमचं स्ट्राँग चिलखत हण्ड्रेड परसेंट सेफ मिन्स सेफ!’स्पीच संपलं. साऱ्यांच्या नजरा थोरल्या काकांकडं वळल्या. त्यांनी मूकपणेच संमती दिली. डील झालं. डझनभर चिलखतांची ऑर्डर दिली गेली. काका उठले. दादाही त्यांच्या ‘पाठी’मागं निघाले. मात्र लगेच त्यांचा हात धरून काकांनी आपल्यासोबत घेतलं.मुनी गोंधळले. तेव्हा मिश्कील हसत जयंतराव हळूच बोलले, ‘साहेबांना खंजिरांची अन् विरोधकांचीही भीती नाही वाटत. फक्त आपल्याच माणसांपासून ते नेहमी सावध असतात. पहाटे झोपेतही!’ अगाऽऽगाऽऽ मुनींच्या डोक्यात प्रकाश पडला. तत्काळ इंद्र दरबारात पोहोचून त्यांनी कथन केलं, ‘महाऽऽराज.. भूतलावर राज्य केवळ चिलखतांचंच. दहशत केवळ खंजिरांचीच. प्रत्येकालाच वाटतंय की आपल्या पाठीत आता खंजीर खुपसला जाणार.’ नारायणऽऽ नारायणऽऽ