शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

गर्भातच कळ्या खुडणारे गुन्हेगार कोण?

By नंदकिशोर पाटील | Updated: March 16, 2024 07:48 IST

पुरोगामी राज्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात २२ जिल्ह्यांत घटलेले स्त्री-पुरुष लिंग गुणाेत्तर चिंताजनक आहे. गंभीर सामाजिक समस्येचे ते लक्षण आहे.

नंदकिशोर पाटील, संपादक, लोकमत, छ. संभाजीनगर

महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या चौथ्या महिला धोरणाच्या बातमीची शाई वाळते ना वाळते तोच, समोर आलेल्या एका आकडेवारीने आपली झोप उडाली नाही तरच नवल! पुरोगामी राज्य म्हणून नावलौकिक असलेल्या महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यांत घटलेले स्त्री-पुरुष लिंग गुणाेत्तर प्रमाण केवळ चिंताजनक नसून, येऊ घातलेल्या एका गंभीर सामाजिक समस्येचे ते लक्षण आहे; ज्याचे दुष्परिणाम सध्याच जाणवू लागले आहेत. 

राज्यातील २२ जिल्ह्यांमध्ये २०१९च्या तुलनेत लिंग गुणोत्तर घटले आहे. मुख्यत: दुष्काळी प्रदेशात मोठ्या प्रमाणात अवैध गर्भपात होतात ही बाब बीड जिल्ह्यातील डॉ. सुदाम मुंडे प्रकरणातून समोर आली होती. या जिल्ह्यात ऊसतोड मजुरांची संख्या अधिक आहे. ऊस तोडणीसाठी सहा-सहा महिने घराबाहेर राहणाऱ्या महिलांना बाळंतपण परवडणारे नसते. त्यामुळे या महिला गर्भपिशवी काढून टाकतात. परंतु, उपसंचालकांनी ‘रेड अलर्ट’ दिलेल्या जिल्ह्यांमध्ये अहमदनगर, सांगली, नागपूर, सोलापूर, लातूर, छत्रपती संभाजीनगरसारख्या तुलनेने प्रगत जिल्ह्यांचा समावेश असल्याने या सामाजिक संकटाची व्याप्ती आणि गांभीर्य अधिकच अधोरेखित झाले आहे. 

गर्भलिंग निदान व गर्भपात करणे कायद्याने गुन्हा आहे. यासाठी ‘पीसीपीएनडीटी’ कायदाही आहे; परंतु, याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्यानेच गर्भलिंग निदान व गर्भपात होत असल्याचा संशय उपसंचालकांनी व्यक्त केला आहे. सामाजिक जागृती आणि आरोग्य यंत्रणेचा वॉच यामुळे बीड जिल्ह्यातील लिंग गुणोत्तर प्रमाण मागील वर्षांच्या तुलनेत सुधारले, ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब. जालन्याची आकडेवारी सर्वाधिक चिंताजनक आहे. या जिल्ह्यात लिंग गुणोत्तर ८५४ वर आले आहे. म्हणजेच, एक हजार मुलांमागे मुलींची संख्या १६८ ने घटली आहे! जालन्यानंतर अकोला, नांदेड, सांगली या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो. या जिल्ह्यांतील लिंग गुणोत्तर पहिल्यांदाच घटले आहे असे नव्हे, तर घटीचे प्रमाणही वाढले आहे.

मुलगा असो की मुलगी, नव्या जिवाच्या जन्माचे स्वागत व्हायलाच हवे. पण, मुलगी जन्मताच कामा नये अशी मानसिकता आपण बाळगणार असू तर कितीही कठोर कायदे केले तरी गर्भपातासारख्या प्रकारांना आळा बसू शकणार नाही. एकीकडे पैशांच्या लालसेपोटी वैद्यकीय व्यवसायाच्या पावित्र्याला काळिमा फासणारे आधुनिक कसाई आणि दुसरीकडे मुलीचा भार नको म्हणून त्यास बळी पडणारे लोक! असे हे दुहेरी रॅकेट आहे. 

जन्माला येणाऱ्या मुलाबाबतचा निर्णय बहुतेक घरांत पुरुषांच्या मर्जीचा मामला असतो. १९९० च्या दशकात अल्ट्रासाउंडसारखे आधुनिक तंत्रज्ञान आल्यानंतर जन्माला येणारे मूल स्त्रीजातक असेल तर तो गर्भ पाडून टाकण्याचे प्रकार कमालीचे वाढले. दक्षिण भारताच्या तुलनेत गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र या प्रगतशील राज्यांत गर्भपाताचे प्रमाण अधिक आहे, हे विशेष! 

लोकसंख्येत सुमारे ३० दशलक्ष स्त्रियांची तूट असल्याचे लक्षात आल्यानंतर ऑगस्ट १९९४ मध्ये संसदेने जन्मपूर्व निदान तंत्र कायदा लागू केला. ज्याने समुपदेशन केंद्रांना कठोर निकष पाळल्याशिवाय अशा प्रक्रिया करण्यास मनाई केली. तथापि, पोलिस-डॉक्टर यांच्यात आर्थिक हितसंबंध निर्माण झाल्याने हा कायदा धाब्यावर बसविण्यात आला. संयुक्त राष्ट्रसंघाचे अध्यक्ष बान की मून भारतात आल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातील घटत्या लिंग गुणोत्तराबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली होती. अशीच चिंता अलीकडे आंतरराष्ट्रीय स्त्रीरोगतज्ज्ञांच्या संघटनेच्या अध्यक्षांनीदेखील व्यक्त केली आहे. 

टॅग्स :Abortionगर्भपात