‘मला विदर्भ कधी नीट समजला नाही’ अशी कबुली सुमारे २० वर्षांपूर्वी एका संपादकाजवळ देणाऱ्या शरद पवारांना आता त्यांची पंचाहत्तरी उलटल्यावर तो समजला असावा. मात्र विदर्भाची मागणी करणारी सगळी माणसे त्यांना अजूनही ‘अमराठी’ आणि काहीशी ‘अप्रामाणिक’ दिसत असतील तर त्यांचा जुना समज अजूनही टिकला आहे असेच म्हटले पाहिजे. विदर्भाच्या मागणीला अ.भा. काँग्रेसने १९२०च्या नागपूर अधिवेशनात पाठिंबा दिला तेव्हा पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्हही क्षितिजावर नव्हते. १९२२ च्या मद्रास काँग्रेसमध्ये विदर्भाच्या निर्मितीचा ठराव झाला तेव्हाही ते तिथवर आले नव्हते. दार कमिशन, जे.व्ही.पी. कमिशन आणि राज्य पुनर्रचना आयोग यांनी विदर्भाची मागणी मान्य केली तेव्हा पवार असले तरी त्यांना विदर्भाविषयीची जाण असावीच असे नव्हते. १९५७च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र व गुजरातमध्ये अनुक्रमे संयुक्त महाराष्ट्र समिती व महागुजरात परिषद यांनी यशवंतरावांच्या काँग्रेस पक्षाचा सपाटून पराभव केल्यामुळे विदर्भातील काँग्रेस आमदारांच्या मदतीवाचून त्यांचे सरकार सत्तेवर येणे शक्य नव्हते. तेव्हा पं. नेहरूंच्या विनंतीवरून दादासाहेब कन्नमवार यांनी विदर्भाला महाराष्ट्रात सहभागी होऊ द्यायला मान्यता दिली. निदान तेव्हापासून पवारांना विदर्भ समजायला हरकत नव्हती. मात्र विदर्भ हा काही आश्वासनांवर महाराष्ट्राला मिळालेला ‘भूप्रदेश’ आहे आणि त्याबाबत त्या आश्वासनांखेरीज आपल्याला काहीएक करायचे नाही ही त्यांची व त्यांच्या सहकाऱ्यांची भावना असल्याने विदर्भाचे आज व्हायचे ते झाले आहे. विदर्भाच्या नावावर त्या प्रदेशातील १७ जण राज्य विधानसभेत आणि दोन जण लोकसभेत निवडून गेले होते याचीही आठवण पवारांना नसावी. बापूजी अणे यांच्या पश्चात या चळवळीला मरगळ आली असली तरी तिची झळ तेव्हापासून आजतागायत तशीच कायम राहिली आहे. झालेच तर जे पक्ष एकेकाळी तिच्यापासून दूर होते तेही आता तिच्यामागे उभे झाले आहेत. महाराष्ट्राचे महाधिवक्ते अॅड. अणेच नाहीत तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, वीजमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विदर्भातील काँग्रेस पक्ष आणि प्रत्यक्ष केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेही या मागणीचा पाठपुरावा करणारे आहेत. रिपब्लिकन पक्ष त्याच मताचा आहे. एकट्या राष्ट्रवादीतील काही पुढाऱ्यांचा व शिवसेना आणि मनसे या मुंबईतील पक्षाचा अपवाद सोडला तर सारेच या मागणीसोबत आहेत. हे वास्तव पवारांना कळत नाही की ते लक्षात घेण्याची त्यांची इच्छा नाही? राजकीय नेत्यांना काही भूमिका बुद्ध्याच घ्याव्या लागतात. त्यातले खोटेपण कळत असले तरी त्यांना त्या रेटून न्याव्याच लागतात. पवारांची विदर्भाबाबतची स्थिती अशी आहे. त्यांच्या बोलण्याचा मुहूर्त लक्षात घेतला तरी ते कुणालाही कळण्याजोगे आहे. नितीन गडकरी विदर्भाची भाषा बोलत असताना पवार गप्प राहिले. फडणवीसांनाही त्यांनी कधी अडविले नाही. ते स्वत: काँग्रेसमध्ये असताना विदर्भातील त्यांच्या जवळची अनेक माणसे विदर्भवादी होती व ती त्यांना ठाऊक होती, पवारांनी त्यांनाही टोकले नाही. आता अॅड. श्रीहरी अणे यांनी मात्र ती भाषा बोलताच पवारांना त्यांची प्रतिक्रिया देणे योग्य वाटले आहे. यातले काळाएवढेच प्रयोजनाचे गुपित साऱ्यांच्या लक्षात यावे. अणे एकटे आहेत. त्यांना पक्षाधार वा जनाधार नाही. सरकारचे वकील असताना त्यांनी हे धाडस केले आहे. त्यामुळे त्यांची एकाकी शिकार करणे पवारांना जमणारे व आवडणारे आहे. पवारांची विदर्भातली एकेकाळची जवळची माणसे त्यांना सोडून भाजपाच्या आश्रयाला गेली आहेत. त्यात दत्ता मेघे सपुत्र गेले आहेत. गिरीश गांधींनी पुत्राला तिकडे पाठविले आहे. रणजित देशमुखांनी एका मुलाला पवारांकडे ठेवून दुसऱ्याला भाजपाकडे दिले आहे. त्यांची खास म्हणविणारी माणसे त्यांच्यापासून दूर गेली आहेत. बुलडाण्यापासून अकोल्यापर्यंतचा आणि तेथून नागपूरपर्यंतचा सारा प्रदेश राष्ट्रवादीवाचूनचा बनला आहे. पूर्वेला प्रफुल्ल पटेल आणि दक्षिणेत बाबा वासाडे हेच त्यांचा झेंडा कसाबसा उंचावून आहेत. मात्र त्या कोणात स्वबळावर लढण्याची शक्ती नाही आणि आपला पक्ष शाबूत राखण्याएवढे सामर्थ्यही नाही. शिवाय नवी मुले नव्या आकांक्षा घेऊन आली आहेत. पवारांना त्यांच्याजवळ वा त्यांना पवारांजवळ जाणे जमणारेही नाही. एकूण काय तर विदर्भाचे राजकारणच पवारांच्या हाताबाहेर गेले आहे. जाता जाता एक विचारायचे, अण्यांविरुद्ध कारवाई करण्याचा सल्ला सरकारला देण्यासाठी पवारांना मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचाच वापर का करावा लागला? ते स्वत: फडणवीस, गडकरी आणि अगदी मोदींकडेही बोलू शकतातच. शिवाय त्यांच्या पक्षात बोलघेवड्या माणसांची कमतरताही नाही. कदाचित अणे हे बऱ्याच मोठ्या पाठबळानिशी बोलत असावे याची आता त्यांना जाणीव झाली असणार आणि त्याचसाठी त्यांनी संमेलनाचे व्यासपीठ निवडले असणार. असो, पण पवारांना अण्यांची दखल घेणे भाग पडले ही घटनाही सामान्य नाही. ती अण्यांचे आताचे बळ दाखविणारी आणि त्यांना मिळत असलेला पाठिंबा दर्शविणारी आहे.
श्रीहरींवर पवार उखडतात तेव्हा...
By admin | Updated: January 22, 2016 10:39 IST