अतुल कुलकर्णीसंपादक, मुंबई
चार दिवस इजिप्तमधील कैरो शहरात राहण्याची संधी मिळाली. या शहरात फिरताना शहराचा आकार, लोकसंख्या यांची तुलना मनातल्या मनात होत होती. ८० ते ८५ टक्के मुस्लिमबहुल असलेल्या या देशाने केलेले काम थक्क करणारे आहे. अंदाजे ११ कोटी लोकसंख्येचा देश इजिप्त. कैरो हे या देशाचे प्रमुख शहर. कैरोचे भौगोलिक क्षेत्रफळ जवळपास ५२८ चौरस किलोमीटर तर लोकसंख्या २ ते २.५ कोटींच्या घरात. मुंबईचे भौगोलिक क्षेत्रफळ ६०३ चौरस किलोमीटर, तर लोकसंख्या १.५ कोटींच्या घरात आहे. कैरोमध्ये सुमारे ३० ते ३५ हजार किमी लांबीचे रस्ते आहेत. तर मुंबईत सुमारे ६ हजार किमी लांबीचे रस्ते आहेत. मुस्लिमबहुल असणारे हे शहर वाहतुकीची शिस्त, सिव्हिक सेन्स याबाबतीत कितीतरी पुढे आहे. इथे फिरताना अनेक ठिकाणी मोठे उड्डाणपूल दिसले. पुलांच्या खालूनही जाता आले. मात्र पुलांच्या खाली कुठेही कचऱ्याचे ढीग, लोकांनी टाकलेल्या झोपड्या असे चित्र नव्हते. डबा घेऊन जावे आणि सगळ्यांनी गोल बसून गप्पा मारत जेवण करावे इतकी स्वच्छता उड्डाणपुलांच्या खाली होती. (आपल्या उड्डाणपुलांच्या खाली काय चालते ते फक्त डोळ्यापुढे आणून बघा.) ४० ते ५० प्रवाशांना घेऊन जाणारी बस ९० ते १०० च्या वेगाने धावत होती. वाहतुकीची कोंडी या शहरालाही नवीन नाही. मात्र कोंडी झाली तरी वाहनांचा वेग २० ते २५ किलोमीटर प्रति तास असतो. ही वाहतूककोंडी ठरावीक भागांत आणि काही काळापुरतीच असते.
याउलट मुंबईमध्ये वाहनांचा वेग कायमच १० ते १२ किलोमीटर प्रति तास आहे. वाहतूक कोंडी आणि ट्रॅफिक जॅम सकाळी ८ ते रात्री १० रोज बघायला मिळते. कैरोमध्ये ३० हजार किलोमीटर लांबीचे चांगले रस्ते आहेत. काही ठिकाणी तर दोन्ही बाजूंनी ८ पदरी म्हणजे रस्ता १६ पदरी आहे. दोन्ही बाजूंनी मिळून १० पदरी रस्ते कैरोमध्ये असंख्य ठिकाणी आहेत. मात्र मुंबईमध्ये सलग ३ किलोमीटर लांबीचे रस्तेसुद्धा बिनाखड्ड्याचे बघायला मिळत नाहीत. कैरोमध्ये रस्त्याच्या दुतर्फा खूप झाडी बघायला मिळत नाही. दिसलीच तर काही खजुराची झाडे दिसतात. मात्र हिरवळ लावलेल्या किंवा फुलांची रोपे लावलेल्या प्रत्येक ठिकाणी ड्रीप इरिगेशनचा वापर करून पाणी दिले जाते. जगातली सगळ्यात मोठी नाईल नदी इजिप्तमध्ये असली, तरी त्या लोकांना पाण्याचे महत्त्व माहिती आहे.
आपल्याकडे रस्त्याच्या मधोमध डिव्हायडरवर लावलेल्या झाडांना कशा पद्धतीने पाणी दिले जाते हे आपण बघतो. ते पाणी झाडांना कमी आणि रस्त्यावर जास्त सांडलेले आपण पाहतो. अख्ख्या कैरोत फिरताना फुटपाथवर टपऱ्या टाकलेल्या दिसल्या नाहीत किंवा हातगाड्या लावून खाण्याचे पदार्थ विकताना कुठे दिसले नाहीत. अख्ख्या कैरो शहरात नेत्यांचे किंवा अमक्या-तमक्याच्या वाढदिवसाचे भले मोठे होर्डिंग लावून रस्ते विद्रूप केलेले दिसले नाहीत. या सगळ्यांच्या उलट दृश्य मुंबईत जागोजागी पाहायला मिळते. फुटपाथ फेरीवाल्यांच्या मालकीचे झाले आहेत. रस्ते विद्रूप करण्याचे ठेके राजकारण्यांनी घेतले आहेत. नुकत्याच महापालिका निवडणुका झाल्या. त्या-त्या वाॅर्डातून निवडून आलेल्या नगरसेवकांनी आपापले वाॅर्ड स्वतःचे होर्डिंग लावून कधीच विद्रूप करून टाकले आहेत.
नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांनी तरी निदान सात-आठ वर्षांनंतर आपण नगरसेवक म्हणून निवडून आलो आहोत. त्यामुळे आपला वॉर्ड आणि परिसर स्वच्छ ठेवावा. नीटनेटका करावा. फुटपाथ लोकांना चालण्यासाठी आहेत हे दाखवून द्यावे. सगळ्या रस्त्यांच्या झालेल्या कचराकुंड्या नीट करून रस्ते स्वच्छ करावेत. ही भावना निवडून आलेल्या नगरसेवकांच्या मनात ज्या दिवशी येईल, तो मुंबईकरांसाठी सुदिन म्हणावा लागेल. मुंबईत रोज ७ हजार मेट्रिक टनच्या आसपास कचरा जमा होतो. कैरो शहरात रोज १५ ते १७ हजार मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. कैरोमध्ये कचरा संकलनासाठी महापालिका, खासगी कंपन्या आणि पारंपरिक झबालेन समुदाय एकत्र मिळून काम करतात. या समुदायाकडून कचऱ्याचे मोठ्या प्रमाणावर हाताने वर्गीकरण होते आणि ५० ते ६० टक्के कचरा पुनर्वापरासाठी घेतला जातो. उरलेला कचरा शहराच्या बाहेर चार वेगवेगळ्या ठिकाणी टाकला जातो. कचऱ्यापासून ऊर्जा निर्मितीचेही प्रयत्न कैरोमध्ये सुरू आहेत. मुंबईमध्ये ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याचे नियम फक्त सोसायटींना आहेत. प्रत्यक्षात महापालिकेचे कचरा नेणारे डंपर प्रामाणिकपणे दोन्ही प्रकारचा कचरा एकत्र करूनच नेतात. पुनर्वापराचे प्रमाण मुंबईत फक्त २० ते ३० टक्के आहे. कैरोमध्ये अनौपचारिक प्रणालीमुळे पुनर्वापराचे प्रमाण जास्त आहे.
नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांना त्यांच्या वॉर्डांत काहीतरी चांगले करून दाखवण्याची तीव्र इच्छाशक्ती असेल तर त्यांनी आधी आपापले वॉर्ड कचरामुक्त, फुटपाथ फेरीवालामुक्त आणि रस्ते खड्डेमुक्त करून दाखवावे. महापालिका निवडणुकांमुळे काहीतरी बदल झाला, असे लोकांना वाटेल. नाहीतर प्रशासक राजवट गेली आणि नगरसेवक निवडून आले, आमच्या रोजच्या जगण्या-मरण्याच्या प्रश्नांमध्ये काहीच फरक पडला नाही, असे लोकांना वाटू लागले तर निवडून आलेले नगरसेवकही कसल्या कामाचे उरणार नाहीत. त्यांच्या लक्षात यावे म्हणून कैरो आणि मुंबईची तुलना केली आहे. आपले शहर स्वच्छ राहावे, असे इजिप्त आणि कैरोमधील लोकांनाच वाटत आहे. त्यादृष्टीने ते सतत कामही करत आहेत. चांगले रस्ते आपण जपले पाहिजेत, ही भावना त्यांच्यामध्ये आहे. इतिहासाच्या आणि संस्कृतीच्या खुणा जपून ठेवत या महानगराने स्वतःमध्ये अमूलाग्र बदल केले आहेत. निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये अशा भावना असतील, अशी अपेक्षा आहे. तसे असेल तर आणि तसे नसेल तर आपले नवनिर्वाचित नगरसेवक मुंबईचे काय करतील, हे लवकरच कळेल.
Web Summary : Mumbai corporators should emulate Cairo's cleanliness, traffic discipline, and infrastructure. Cairo prioritizes waste management, road quality, and pedestrian spaces, unlike Mumbai's challenges with garbage, footpaths, and potholes. Focus on improving basic amenities for citizens.
Web Summary : मुंबई के पार्षदों को काहिरा की स्वच्छता, यातायात अनुशासन और बुनियादी ढांचे का अनुकरण करना चाहिए। काहिरा कचरा प्रबंधन, सड़क की गुणवत्ता और पैदल यात्री स्थानों को प्राथमिकता देता है, मुंबई की कचरा, फुटपाथ और गड्ढों की चुनौतियों के विपरीत। नागरिकों के लिए बुनियादी सुविधाओं में सुधार पर ध्यान दें।