हवामानातील बदलांना कारणीभूत ठरणाऱ्या मानवी योगदानावर कायदेशीर निर्बंध लादणे आणि जगातील तमाम देशांमध्ये हवामानासंदर्भात करार घडवून आणणे, या हेतुने पॅरीस येथे आयोजित आणि उद्याअखेर चालणाऱ्या पाच दिवसीय वार्षिक जागतिक परिषदेत हा हेतू साध्य करण्याच्या दृष्टीने फारसे काही होणार नाही याची साऱ्यांना अगोदरपासूनच कल्पना होती. वास्तविक भारत व चीनसारख्या बड्या विकसनशील देशांनी आतापर्यंतच्या परिषदांमधील भूमिकेशी फारकत घेत, हरितगृह वायू उत्सर्जनात भरीव कपात करण्याचे आश्वासन दिले आहे. जागतिक तपमानवाढ हे विकसित देशांनी अधाशीपणे केलेल्या इंधन वापराचे अपत्य आहे आणि त्यामुळे तपमानवाढ कमी करण्यासाठी, आम्ही आमच्या विकासाच्या स्वप्नांना मुरड घालून, हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करणार नाही, अशी भूमिका विकसनशील देश आजपर्यंत घेत आले होते. विकसनशील देशांची ती भूमिका अजिबात चुकीची नव्हती. तरीदेखील जागतिक तपमानवाढीचे गांभीर्य लक्षात घेऊन, या देशांनी आपल्या भूमिकेला मुरड घातली आहे. भारताने आपल्या कर्बाम्ल वायू उत्सर्जनात, २०३० पर्यंत ३३ ते ३५ टक्क्यांनी कपात करण्याची तयारी दर्शविली आहे. इंडोनेशियाने २९ टक्क्यांच्या कपातीची तयारी दर्शविली आहे, तर चीनने २००५ च्या तुलनेत तब्बल ६० ते ६५ टक्क्यांची कपात करण्यास सहमती दिली आहे. इथे हे लक्षात घेणे गरजेचे आहे, की विकसनशील देशांनी हरितगृह वायू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सर्वच वायूंच्या उत्सर्जनात नव्हे, तर केवळ कर्बाम्ल वायूच्या उत्सर्जनात एवढी मोठी कपात करण्याची तयारी दाखविली आहे. याउलट विकसित देश सर्वच प्रकारच्या हरितगृह वायूंच्या उत्सर्जनात कपात करणार आहेत. एवढी मोठी कपात झाल्यानंतर जागतिक तपमानवाढीस सहज पायबंद बसेल, असे जर कुणाला वाटत असेल, तर ते काही खरे नाही. त्यामागचे कारण हे आहे, की ही जी कपात करावयाची आहे, ती सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) तुलनेतील उत्सर्र्जनाच्या प्रमाणात करायची आहे. सध्याच्या घडीला भारत व चीनच्या अर्थव्यवस्था सात ते आठ टक्क्यांच्या दराने वाढत आहेत आणि आगामी काही वर्षे तरी वाढीचे हे प्रमाण साधारण याच पातळीवर राहण्याची अपेक्षा आहे. परिणामी कर्बाम्ल वायू उत्सर्जनात प्रत्यक्षात वाढच होणार आहे; कारण विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्थांचा आकार २००५ च्या तुलनेत, २०३० मध्ये किमान सात ते आठ पट झालेला असेल. एकूण काय, तर या कपातीची गत, ‘आबा मेला अन् नातू झाला’ या वऱ्हाडी भाषेतील म्हणीसारखीच होण्याची दाट शक्यता आहे.
फलित काय?
By admin | Updated: December 3, 2015 03:29 IST