अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या प्रजासत्ताकदिनी होणा-या भारत भेटीला अपशकुन करण्यासाठी पाकिस्तानकडून भारतात घातपाती कारवाया घडवून आणण्याचा प्रयत्न हमखास केला जाईल, असा गुप्तचर यंत्रणांचा अंदाज होताच. त्याबरहुकुम सीमेवर अशांतता पसरविण्याचे काम पाकी सैनिक करीत असतानाच गेल्या आठवड्यात भयानक विस्फोटके घेऊन एक मच्छिमार बोट भारताच्या दिशेने निघाल्याची गुप्तवार्ता तटरक्षक दलास मिळाली. कराचीनजीक केटी बंदर येथून चार अतिरेक्यांना घेऊन निघालेल्या या बोटीत मच्छिमारीची नव्हे, तर भयानक स्फोट घडवून आणणारी सामग्री असल्याचेही गुप्तवार्तेद्वारा समजले होते. साहजिकच तटरक्षक दलाने सागरी तसेच हवाई मार्गाचा वापर करुन या बोटीला आहे तिथेच रोखण्याचे प्रयत्न सुरु केले. बोटीतील लोक आणि त्यांच्याकडील सामान जप्त करण्यासाठी तटरक्षक दलाने त्यांचा पाठलाग सुरु केला. आता आपण पक्के घेरले गेलो आहोत, याचा अंदाज येताक्षणी बोटीत भयानक विस्फोट घडून आला व ती पाहता पाहता जळून भस्मसात झाली. नवीन वर्षाचा प्रारंभ होत असतानाच हा भयानक प्रकार घडला. याचा सरळ अर्थ नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी भारतात मोठा घातपात घडवून आणण्याचा बोटीतील चौघांचा इरादा होता. ते चौघे फिदाईन म्हणजे आत्मघातकी अतिरेकी होते आणि म्हणूनच त्यांनी स्वत:सकट बोटदेखील स्फोटात उडवून दिली. परिणामी, त्यांना २६ नोव्हेंबरची पुनरावृत्ती घडवून आणायची होती, हा गुप्तचर विभागाचा अंदाज तंतोतंत खरा ठरतो. अरबी समुद्रातील ज्या ठिकाणी हा स्फोट घडवून आणला गेला, त्या परिसराची तटरक्षक दल अजूनही छाननी करीत असून काही हाती लागते का, याचा शोध घेत आहे. मुंबईवरील अतिभयानक अतिरेकी हल्ला ज्यांनी केला, ते कसाबासकट सारे कसाई समुद्रमार्गेच भारतात आणि तेही मुंबईच्या किनाऱ्यावर आले होते, हे येथे लक्षात घ्यायचे. अर्थात नेहमीप्रमाणे पाकिस्तानने या साऱ्या घटनेचा साफ शब्दात इन्कार केला आहे. तेथील परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्यानुसार त्या दिवशी केटी बंदरातून एकही बोट निघाली नव्हती! त्यामुळे जो काही प्रकार घडल्याचे भारतातर्फे सांगितले जात आहे, तो केवळ एक प्रचार असून पाकिस्तानची प्रतिमा डागाळण्याचाच तो एक प्रयत्न आहे. अर्थात हा कांगावखोरपणा नवा नाही. पण त्यातून एक वेगळा अर्थही निघू शकतो. पाकिस्तानातून बाहेर पडणारे अतिरेकीही पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याच्या अनुमतीने बाहेर पडत असतात! महाजनो येन गत:?तिकडे पंतप्रधान नरेन्द्र मोदी आणि इकडे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस आपल्याच पक्षाच्या खासदार-आमदारांना सांगत असतात की, बाबांनो, आता तुम्ही सत्ताधारी पक्षाचे सदस्य आहात, तेव्हा सत्ताधीशांसारखे बोला, उगा भरमसाठ बोलत जाऊ नका, पण कुणी ऐकेल तर नाव नको. विरोधात असताना भरमसाठ, बिनबुडाचं आणि विना पुराव्याचं बोलायला मोदी-फडणवीस यांची काही हरकत नाही, असा तर याचा अर्थ नाही? तर मुद्दा असा की, फडणवीस सरकारमध्ये खान्देशातील भाजपाचे एक जुने नेते, गिरीश महाजन जलसंपदा मंत्री म्हणून दाखल झाले आहेत. त्यांनी सत्तेत आल्या आल्या म्हणे, तब्बल ११००कोटी रुपयांची कामे स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला. या स्थगितीपायी होणारे नुकसान टळावे म्हणून त्यांच्यातील एकाने गिरीशभाऊंना चक्क १०० कोटी रुपयांची लाच देऊ केली, असे खुद्द त्यांनीच जाहीर केले. मोठे धारिष्ट्यच म्हणायचे, दोघांचे. लाच देऊ करणाऱ्याचे अणि ज्या व्यक्तीला ती देऊ केली तिचे. नाही म्हटले तरी थोडी खळबळ माजलीच. मग भाऊ म्हणाले, लाच केवळ एका व्यक्तीने नव्हे, तर काही जणांनी मिळून देऊ केली. म्हणजे लाच देणाऱ्यांचीही सहकारी संस्थाच तयार झाली म्हणायची. सरकारच्या प्रत्येक कृती आणि उक्तीकडे डोळे लावून बसलेल्या राष्ट्रवादीच्या नबाब मलिक यांनी तत्काळ मागणी केली की, गिरीष महाजन यांची नार्को टेस्ट करा. ती झाली म्हणजे ते खरेच बोलतात का याचा पत्ता लागेल आणि त्याचबरोबर लाच देणारा वा देणारे महाभाग कोण याचाही उलगडा होऊन जाईल. मलिक यांचा हेतु खरे तर शुद्धच म्हणायचा! भाजपाच्या मंत्र्याला कोणी लाच देण्याची हिंमत करतो म्हणजे काय, कोण समजतो, तो स्वत:ला? पण भाऊंनी नबाब यांचा शुद्ध हेतू तितक्या शुद्धपणे काही घेतला नाही. माझी एकट्याचीच कशाला, अजित पवार अणि सुनील तटकरे यांचीदेखील नार्को करा, असे प्रत्त्युत्तर त्यांनी दिले. हे दोघेच का, तर काँग्रेस आघाडीच्या सरकारमध्ये त्यांच्याकडे जलसंपदा खाते होते म्हणून. पण त्यांची नार्को कशासाठी तर, त्यांनी आपल्या सत्ताकाळात काही गडबड केली असेल तर त्याचा सुगावा लागावा म्हणून. पण त्यांनी कुठे लाच देऊ केल्याची तक्रार केली होती? असल्या भानगडीत म्हणजे गवगवा करण्याच्या भानगडीत ते कुठे पडले होते? गवगवा महाजन यांनी केला आहे. तेव्हां या गवगव्याचे खरे खोटेपण हाच मलिक यांच्या पुढ्यातील एकमात्र कार्यक्रम. त्यातून आज पवार-तटकरे सत्तेत नाहीत. महाजन मात्र आहेत. इतकेच नव्हे, तर केन्द्रातली सत्ताही त्यांच्याच मातुल घराण्याची. तेव्हां त्यांना जेव्हां वाटेल तेव्हां ते पवार-तटकरेच कशाला अगदी छगन भुजबळांचीही नार्को करु शकतात. कोण अडवणार आहे? परंतु तसे काही न करता, भाऊ मागणी करुन मोकळे झाले. यापेक्षा तो जो कुणी लाचवाला आहे, त्याच्या मुसक्या आवळल्या असत्या तर? तेव्हां महाजन ज्या मार्गाने जातात त्या मार्गाने इतरेजनांनी जावे, असे सुभाषित असले तरी या महाजनांचा मार्ग इतरांनी टाळलेलाच बरे.
जळाले ते काय?
By admin | Updated: January 5, 2015 02:33 IST