शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

हुकूमशहा मरून जातील; स्वातंत्र्य अढळ असेल!: व्लादिमीर झेलेन्स्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2022 08:04 IST

कान्स चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांचे भाषण सध्या जगभर गाजते आहे. त्या भाषणाचा हा गोषवारा.

व्लादिमीर झेलेन्स्की, अध्यक्ष, युक्रेन

चला, आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. सगळ्याच गोष्टींची सुरुवात याच शब्दांनी होते म्हणा..पण ही गोष्ट सुरू कशी होते, त्याहीपेक्षा ती संपते कशी हे जास्त रंजक असणार आहे, हे नक्की! या गोष्टीला शेवट आहे आणि तो निश्चित आहे. मी सांगतो आहे ती गोष्ट सिनेमातल्या गोष्टीसारखी  ‘ओपन एंडेड’ नाही. या गोष्टीच्या शेवटी एका  भयंकर युद्धाला पूर्णविराम लागणार आहे. या गोष्टीचा शेवट होणार आहे.- तर, या गोष्टीच्या सुरुवातीला एक रेल्वे धडधडत आली, त्यातून या गोष्टीच्या नायकाने खाली उडी घेतली, त्याच्यामागोमाग खलनायक उतरला आणि बघताबघता पडद्यावर तुंबळ युद्ध सुरू झाले.  काही कळायच्या आत हे युद्ध पडद्यावरून आमच्या आयुष्यात उतरले आणि आता त्याने आमचे आयुष्य खाऊनच टाकायला घेतले आहे.  श्वास रोखून धरायला लावणारे  युद्धाचे रोमांचक चित्रपट  आम्ही पाहत होतो, तर त्या फ्रेम्समध्ये अचानक  आम्हीच दिसू लागलो. आता पुढे या युद्धात काय होईल, हेही या सिनेमाची गोष्ट कोणत्या दिशेने जाते त्यावरच अवलंबून असेल.

आज मी जी गोष्ट सांगतो आहे, तीही या युद्धाचीच आहे. विसाव्या शतकात जेजे हुकूमशहा होऊन गेले, त्या प्रत्येकाला सिनेमाची  फार हौस होती. त्यांच्या या कॅमेरा-प्रेमाचे पुरावे अख्ख्या इतिहासात विखुरलेले आहेत. हे हुकूमशहा गेले, संपले; पण त्यांच्यामागे काय उरले? - त्यांनी केलेल्या अतिभयंकर कृत्यांचे कॅमेऱ्याने टिपून ठेवलेले पुरावे! रक्तपाताच्या, तुंबळ हिंसेच्या, क्रौर्याच्या घटना पोटात साठवून ठेवलेल्या भयंकर वृत्तमालिका आणि अस्वस्थ करणारे लघुपट! एवढेच नाही! या हुकूमशहांना त्यांच्या कृत्यांचा जाब विचारणारे सिनेमेही केले गेले त्या काळात. हुकूमशहांचा अंत झाला, हे सिनेमे आजही मागे उरले आहेत!१ सप्टेंबर १९३९. या दिवशी पहिला कान्स फिल्म फेस्टिव्हल सुरू होणार होता; पण तेवढ्यात दुसऱ्या  महायुद्धाचा बॉम्ब फुटला आणि अख्खे जग एका भयंकराच्या गर्तेत ओढले गेले. त्यापुढली सहा वर्षे जगभरातले कॅमेरे  युद्धभूमीवरच भटकत राहिले. या कॅमेऱ्याला  डोळे लावून असलेल्या माणसांनी स्वातंत्र्यासाठीचा संघर्ष करणे सोडले नाही. त्या काळातले ते सिनेमे आठवून पाहा. काय होत्या या सिनेमांच्या गोष्टी? रणभूमीवर विध्वंसाचा भयानक आक्रोश सुरू असतानाही कणाकणाने स्वातंत्र्याकडे सरकत राहिल्या या गोष्टी.. आणि एकाही गोष्टीच्या अखेरीस एकाही बलदंड, बलशाली हुकूमशहाला लोकांची हृदये पादाक्रांत करणे जमले नाहीच.

या प्रवासातला सर्वांत महत्त्वाचा टप्पा होता १९४०सालचा. सर्वशक्तिमान खलनायकालाही निष्प्रभ करण्याची अजब क्षमता असलेला एक सर्वसामान्य माणूस पडद्यावर मोठा होताना जगाने पाहिला. त्याच्याकडे  ‘हीरो’ असण्यालायक कसलीच झगमग नव्हती, तरी त्याच्या कहाणीचा तोच हीरो होता :   ‘द ग्रेट डिक्टेटर’मधला चार्ली चॅप्लिन! त्याने खलनायकाला मारले नाही हे खरे; पण पडद्यावर त्याने रंगवलेला प्रतिमांचा खेळ अखेरीस स्वातंत्र्याचीच सरशी होणार हे निक्षून सांगत राहिला. तो म्हणाला,  ‘माणसांच्या मनातला द्वेष अखेर संपून जाईल, हुकूमशहा एक दिवस मरून जातील आणि त्यांनी सर्वसामान्य माणसाच्या हातून जबरदस्तीने हिसकावलेल्या स्वातंत्र्याची सनद अखेर सामान्य माणसाच्या हातीच परत येईल! या युद्धात माणसे मरतील, मरत राहातील; पण स्वातंत्र्याचा कधीही अस्त होणार नाही. ते असेल. असेलच!!’

आजवर जगभरात अनेक कलावंतांनी अनेकानेक अजरामर सिनेमांची निर्मिती केली आहे. क्षणाक्षणाला मृत्यूच्या किंचाळ्या ऐकवणाऱ्या बॉम्ब शेल्टर्सऐवजी मानवी आयुष्याच्या विविध रंगांची सुंदर उधळण करणारी सिनेमा थिएटर्स हा लोकांना जिंकून घेण्याचा अधिक सोपा मार्ग  आहे, हेही एव्हाना जगाला कळलेले नसेल असे नाही आणि हेही जगाला पक्केच माहिती असणार, की पृथ्वीवरच्या एका अख्ख्या खंडाला आपल्या जबड्यात ओढू पाहणारे युद्ध अनंत काळ सुरू राहू शकत नाही. 

- आणि असे पाहा, याही गोष्टीत एक हुकूमशहा आहे. आणि ही स्वातंत्र्यासाठीच्या लढाईचीच तर गोष्ट आहे.असे असताना सिनेमाची प्रभावी भाषा जाणणारे लोक या गोष्टीकडे तोंड फिरवून मूर्ख मुर्दाडासारखे कसे बसू शकतात? २४ फेब्रुवारी २०२२ या दिवशी अख्खा युरोप घशात घालण्याचा डाव आखून रशियाने युक्रेनवर हल्ला चढवला. 

आहे काय हे युद्ध? कसे आहे? - तुम्हाला समजेल अशा सोप्या भाषेत स्पष्टच सांगतो : महायुध्दानंतर तयार झालेल्या सिनेमांमध्ये तुम्ही जे पाहिले आणि ऐकले आहे, तेच वास्तवात प्रकट होऊन आमच्या आयुष्यात उतरले आहे. त्या सिनेमांमध्ये तुम्ही जी दृश्ये पाहिली, तीच दृश्ये.. तुम्ही जे संवाद ऐकले तेच संवाद.. सारे पडद्यावरून आमच्या आयुष्यात घुसले आहे. काही अजरामर संवाद आजही आठवले की अनेकांच्या अंगावर भीतीचा काटा येतो... तेच शब्द आज आमची मुले-बाळे रोज ऐकत आहेत. ‘यू स्मेल दॅट? नेपलम सन! आय लव्ह द स्मेल ऑफ नेपलम इन द मॉर्निंग!’

आठवली ही क्रूर आणि अजरामर ओळ? - तुम्ही म्हणाल, हा तर अनेक वर्षांपूर्वीच्या सिनेमातला डायलॉग आहे! पण युक्रेनमध्येही धुमसत्या  बॉम्बचा पहिला वास घुसला, तेव्हाही पहाटच तर होती! रशियाची पहिली क्षेपणास्त्रे आमच्या देशावर डागली गेली, तेव्हा पहाटेचे चार वाजले होते. - आणि आता आमच्या देशात जिथे जिथे रशियन सैन्याच्या तुकड्या घुसल्या आहेत, तिथे तिथे मारून टाकलेल्या, अर्धवट जखमी करून अर्धमेल्या अवस्थेत पुरलेल्या शेकडो लोकांनी भरलेले खड्डे सापडले नाहीत, असा एक दिवसही जात नाही. आजवर आमची २२९ मुले या युध्दात मारली गेली आहेत. बुचा नावाच्या एका छोट्या गावात रशियाने  काय हैदोस घातला, हे अख्ख्या जगाने पाहिले आहे. कीव्ह, मरियुपोलसारख्या आमच्या शहरांची राखरांगोळी झाली आहे.  रशियाने फेकलेल्या बॉम्बच्या धमाक्यात आमचे एक सर्वोत्तम थिएटर क्षणात मातीचा ढिगारा बनून गेले... बॉम्ब हल्ल्यातून जीव वाचवण्यासाठी त्या थिएटरमध्ये जमलेली सगळी मुले-माणसे एका क्षणात जळून गेली... हे सारे आम्ही कसे विसरू?

युद्ध म्हणजे नरक नव्हे. युध्द हे युध्द असते. नरक हा नरक. तुलनाच करायची म्हटली, तर युध्दभूमी नरकाहून अधिक भीषण असते! आजवर रशियाची दोन हजारांहून अधिक क्षेपणास्त्रे युक्रेनवर डागली गेली आहेत. आमची असंख्य शहरे उद्ध्वस्त झाली आहेत. गावेच्या गावे होरपळली आहेत. पाच लाखांहून अधिक नागरिकांना देश सोडून परागंदा व्हावे लागले आहे. हिटलरने उभारलेल्या छळछावण्यांची आठवण यावी, अशा छावण्या रशियाने आमच्या देशात उघडल्या आहेत. त्यात कोंडलेले किती युध्दकैदी जिवंत राहतील, हे कोणालाही सांगता येणार नाही; पण या सगळ्या विध्वंसाचा दोष कोणाला द्यायचा, हे मात्र आमच्या देशातले जिवंत उरलेले लहान मूलही सांगू शकेल. 

दुसऱ्या  महायुध्दानंतरचा सर्वात भीषण संहार आत्ता युरोपमध्ये चालू आहे. मॉस्कोमध्ये बसलेल्या त्या एका माणसामुळे अनेक निरपराध माणसे रोज मारली जात आहेत. - आणि महत्त्वाचे म्हणजे ही सिनेमाची गोष्ट नव्हे. दिग्दर्शकाने  ‘कट’ म्हटल्यानंतर ही मेलेली माणसे उठून बसणार नाहीत. कारण ती खरेच मेली आहेत. - तर आता प्रश्न असा आहे की, हे सारे चालू असताना तुम्ही सगळे गप्प बसणार की काही भूमिका घेणार? बोलणार? आजही एक हुकूमशहा आहे, स्वातंत्र्यासाठीचे युध्द चालू आहे; पण त्या युध्दाची जबाबदारी फक्त आमच्याच खांद्यावर असणार असेल, तर मग सिनेमाचे, कलावंतांचे जग काय कुंपणाबाहेर नुसते बसून राहणार का?

- अर्थात, आम्ही लढत राहूच. आम्हाला दुसरा पर्यायही नाही आणि हेही निश्चित की आमच्या या गोष्टीच्या शेवटी हुकूमशहाचीच हार होईल. आमचे जगाकडून एकच मागणे आहे : १९४० चे ते शब्द सिनेमाच्या पडद्यावरून पुन्हा एकवार घुमू द्या. आजच्या काळातला नवा चार्ली चॅप्लिन जन्माला येऊ द्या. त्याला हे सिध्द करू द्या, की सिनेमाचे जग आजही तितकेच संवेदनशील आहे. ते मूर्ख आणि आंधळे नाही.

१९४० सालच्या चार्लीने काय सांगितले होते, तुमच्या लक्षात आहे ना? तो म्हणाला होता, ‘लोभ आणि लालसेने माणसाच्या आत्म्याला दंश केला आहे. जगामध्ये सर्वत्र द्वेषाच्या लाल रेघा ओढल्या गेल्या आहेत. त्यातून फक्त रक्तपात आणि दु:खच प्रसवते आहे; पण आधुनिक मानवाला त्याची जाण नाही. विज्ञानाने आपल्याला वेग दिला खरा; पण आपल्या स्वार्थाने आपल्याला कोंडून घातले आहे. सुखसोयींची रेलचेल देणाऱ्या तंत्रज्ञानाने हाव आणखीच वाढवली आहे.  अथांग ज्ञानाने आपल्याला एकमेकांमधले दोषच हुडकायची सवय लावली आहे. आपण अधिक हुशार आहोत; पण दुष्ट आणि एककल्ली झालो आहोत. आपण फार विचार करतो; पण आपल्या हृदयाला काही जाणवणे जणू बंदच झाले आहे. नवी यंत्रे नकोत आता, माणसाला थोडी माणुसकी हवी आहे. मी एवढेच सांगेन, धीर सोडू नका. द्वेष संपून जाईल, हुकूमशहा मरून जातील; पण स्वातंत्र्याचा कधीही अस्त होणार नाही. ते असेल. असेलच !’

- अनुवाद : अपर्णा वेलणकर 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशिया