शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

शब्दबंबाळ साहित्यिक होल्डॉल!

By admin | Updated: January 18, 2016 00:10 IST

पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक नगरीमध्ये साजऱ्या होत असलेल्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे मान्यवर अध्यक्ष प्राध्यापक श्रीपाल सबनीस यांचे अध्यक्षीय भाषण म्हणजे

पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक नगरीमध्ये साजऱ्या होत असलेल्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे मान्यवर अध्यक्ष प्राध्यापक श्रीपाल सबनीस यांचे अध्यक्षीय भाषण म्हणजे जणू एक साहित्यिक होल्डॉलच आहे! शब्दबंबाळ साहित्यिक होल्डॉल ! साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या सारस्वताने मराठी साहित्य विश्वाच्या आणि ते साहित्य विश्व ज्याच्या मुशीतून साकारते त्या मराठी जीवनव्यवहाराच्या विविध अंगांना स्पर्श करावा, अशी एक सर्वसाधारण अपेक्षा असते. माननीय सबनीस यांनी ही अपेक्षा प्रचंड गांभीर्याने शब्दश: मनावर घेतलेली दिसते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय दहशतवादापासून शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या, शेतमालाचे हमीभाव, बहुसांस्कृतिकता, ‘सेक्युलॅरिझम’, राष्ट्रवाद, असहिष्णुता इथपासून ते गेल्या अर्धशतकाहून अधिक काळ भिजत पडलेल्या सीमा प्रश्नापर्यंत सबनीस महाशयांनी सगळ्यांनाच वेठीला धरलेले आहे. साहित्याच्या प्रांतातही ‘सेक्युलर’ वाङ्मयीन प्रवाहापासून ते विद्रोही, मुस्लीम, ख्रिश्चन, दलित, ग्रामीण, गांधीवादी, मार्क्सवादी, विनोदी, भटक्या-विमुक्तांचे साहित्य, स्त्रीसाहित्य, बालसाहित्य, पर्यावरणवादी, कोशवाङ्मय ते ‘चारोळ्यां’पर्यंतच्या यच्चयावत साहित्य प्रवाहांना अध्यक्षांनी त्यांच्या भाषणात हजेरी लावणे भाग पाडले आहे. या औरसचौरस पसाऱ्यापायी सबनीस यांच्या विवेचनास कोठेही कोणत्याही एकात्म सूत्राचा मागमूस लागत नाही. त्यामुळे विविध साहित्य प्रवाहांवर जाता जाता केलेली शेरेबाजीवजा टिप्पण्णी, असेच सबनीस यांच्या मनोगताचे स्वरूप आहे. परिणामी, पसारा भरपूर दिसला तरी खोलीचा ठणठणाटच प्रकर्षाने जाणवतो. मराठी साहित्यातील विविध दालनांबद्दल अध्यक्ष महोदयांना काही ना काही म्हणायचे आहे, एवढाच बोध हे बाड नजरेखालून घातल्यानंतर होतो. मराठीतील एक ज्येष्ठ समीक्षक अशी प्राध्यापक श्रीपाल सबनीस यांची ओळख असली तरी त्यांच्यातला समीक्षक त्यांच्या अध्यक्षीय भाषणात प्रगटलेला जाणवत नाही. त्या त्या साहित्य प्रकारातील प्रचलित ढोबळ प्रवाह आणि साहित्याच्या त्या प्रांतात गाजणाऱ्या साहित्यकारांचे मोजके व निवडक नामनिर्देश यांचाच काय तो निर्देश सबनीस यांच्या टिप्पण्णीत असल्याने वाङ्मयेतिहासाच्या खंडांतील काही पाने आपण वाचतो आहोत की काय, असा भास वारंवार होत राहतो. चमकदार परंतु प्रत्यक्षात ठोस अर्थनिष्पत्ती न होणाऱ्या वाक्यांची ठायी ठायी पखरण हे सबनीस यांच्या भाषणाचे आणखी एक वैशिष्ट्य. त्यातही शब्दांच्या अनावर हव्यासापायी अध्यक्षांची गाडी काही ठिकाणी औचित्याच्या आणि अभिरुचीच्या जोडरुळांवरून घसरताना दिसते. ‘शोषणमुक्त पत्रकारिता आणि लोकशाहीचे भवितव्य’ या मथळ्याखाली अध्यक्ष महाशयांनी वृत्तपत्र व्यवसायातील पत्रकर्मींच्या साहित्यनिर्मितीतील योगदानाचा ऊहापोह केलेला आहे. प्रादेशिक पत्रकारांच्या प्रातिभ शब्दाविष्काराने मराठी भाषा व वाङ्मयीन व्यवहाराला केलेल्या मूल्यात्मक योगदानाचा यथोचित निर्देश केल्यानंतर पुढे सबनीस यांनी जे एक वाक्य घातलेले आहे, ते आधीच्या विवेचनाची चव पूर्णपणे घालवणारे असेच आहे. ‘‘परंतु काही संपादक सुपारी घेऊन अजिंडा ठरवितात. ही पत्रकारिता चौथ्या स्तंभाला शोभणारी की लोकशाहीच्या तिरडीच्या दांडीला शोभणारी? याचा विचार करणे आवश्यक’’, या वाक्यातील सबनीस यांची उद्विग्नता समजण्याजोगी असली तरी तिचा भडक आविष्कार मात्र समर्थनीय अजिबातच नाही. वृत्तपत्रांचे मालक आणि वृत्तपत्रात काम करणारे संपादकासह यच्चयावत पत्रकर्मी यांच्या संबंधांमध्ये अलीकडील काळात घडून आलेल्या गुणात्मक बदलांबाबत मतप्रदर्शन करणारे सबनीस यांचे विधान तर कमालीचे भोंगळ आहे. ‘‘भारतातील मालकशाही संतांच्या संस्कारात रमल्याच्या साक्षी आहेत. निदान त्या संतत्वाला तरी काळजात व व्यवहारात स्थान मिळावे. म्हणजे पत्रकारांपासून कामगार-मजुरांपर्यंतचे सर्व शोषित सर्वार्थाच्या गुलामीतून मुक्त होऊन स्वातंत्र्याचा श्वास घेऊ शकतील’’, या सबनीस यांच्या शब्दबंबाळ मल्लीनाथीची अर्थनिष्पत्ती काय? भारतातल्या कोणत्या भागातील कोणती मालकशाही संतांच्या संस्कारात रमल्याचे साक्षीदार बनण्याचे अहोभाग्य सबनीस यांना लाभले हे त्यांचे तेच जाणोत ! मराठी शाळांच्या आजच्या दुरवस्थेचे उत्तरदायित्व सरकारच्या गळ्यात बांधताना, ‘‘मराठी शाळांची गळती व अवहेलना शासनाने त्वरित थांबवावी; अन्यथा मराठी माणसाच्या नव्या पिढ्यांचे सांस्कृतिक पाप महाराष्ट्र शासनाच्या कपाळावर कोरले जाईल’’, अशी सबनीस यांनी उच्चारलेली भविष्यवाणी सगळ्यांनाच बुचकळ्यात पाडणारी आहे. आजच्या मराठी पिढ्या आपल्या मुलांना मराठी शाळेत पाठवणारच नसतील, तर साहित्य संमेलनांसारख्या उत्सवांचे प्रयोजनच मुदलात काय, असा प्रश्न स्वाभाविकच उपस्थित होतो. या प्रश्नांचे उत्तर सबनीस यांनी द्यावे अशी अपेक्षा नाही कारण ते माहीत असते तर या उत्सवाचे अध्यक्षपद पदरात पाडून घेण्यासाठी त्यांनी आजवर इतका आटापिटा केलाच नसता !