शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
5
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
6
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
7
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
8
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
9
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
10
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
11
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
12
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
13
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
14
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
15
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
16
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
17
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
18
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
19
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
20
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप

व्ही.के. सिंहांची वाचाळता

By admin | Updated: December 5, 2015 09:10 IST

व्ही.के. सिंह या संरक्षण राज्यमंत्र्यांना सभागृहातून बाहेर घालविण्याची बहुजन समाज पक्षाचे राज्यसभा सदस्य सतीशचंद्र मिश्र यांनी केलेली मागणी वरकरणी आक्रस्ताळी

व्ही.के. सिंह या संरक्षण राज्यमंत्र्यांना सभागृहातून बाहेर घालविण्याची बहुजन समाज पक्षाचे राज्यसभा सदस्य सतीशचंद्र मिश्र यांनी केलेली मागणी वरकरणी आक्रस्ताळी दिसणारी असली तरी या सिंहांचे आजवरचे वर्तन व इतिहास पाहाता ती कुणीतरी, कधीतरी करायलाच हवी होती. हे गृहस्थ मुळातून खोटारडे आहेत व त्यांचे त्यांच्या जिभेवर नियंत्रण नाही. सारे आयुष्य लष्करात घालविल्यानंतर आणि त्यातील सर्वोच्च पद भूषविल्यानंतरही त्यांना आपले वाचाळपण रोखता येऊ नये ही बाब कायमस्वरूपी नादुरुस्तीची व नाठाळपणाची निदर्शक आहे. लष्करात लवकर प्रवेश मिळावा म्हणून त्यांनी स्वत:च्या जन्मतारखेचे, ती अगोदरची असल्याचे सांगणारे खोटे प्रमाणपत्र सरकारला सादर करून एनडीएत प्रवेश मिळविला. पुढे निवृत्तीची वेळ आली तेव्हा आपण अगोदर दिलेले प्रमाणपत्र चुकीचेच नव्हे तर खोटे असल्याची कबुली त्यांनीच दिली. लष्करात लवकर प्रवेश मिळाला तर आपली बढतीही लवकर होऊन आपण त्यातल्या उच्चपदापर्यंत पोहोचू शकू या अपेक्षेने आपण ते पहिले प्रमाणपत्र तयार केले होते, हे त्यांनी स्वत:च सांगून टाकले. त्याचवेळी आपली निवृत्ती काही महिन्यांनी लांबविता यावी म्हणून मग दुसरे प्रमाणपत्र आणून त्यातील जन्मतारखेचा दाखला खरा मानावा अशी विनंती सरकारला केली. त्यांच्या या खोटारडेपणावर त्या काळात बरीच भवतीनभवती झाली, परंतु तेव्हाच्या मनमोहन सिंग सरकारने त्यांची विनंती अव्हेरली आणि जन्मतारखेच्या पहिल्या दाखल्यानुसार त्यांना निवृत्तही केले. त्यावर त्यांनी सरकारच्या निर्णयाविरुद्ध न्यायासनाचा दरवाजा ठोठावण्याचा प्रयत्न केला. पण त्यात आपल्याला हवा तसा निकाल मिळणार नाही याचा अदमास येताच माघारही घेतली. पण सत्ता आणि पद यांची महत्त्वाकांक्षा स्वस्थ बसू देणारी नसल्याने त्यांनी सरळ सरकारविरोधी आंदोलनाचे व्यासपीठ गाठले. त्या काळात अण्णा हजारेंनी उभारलेले व्यासपीठ कामीही आले. त्यावर चढून सरकारने आपल्यावर केलेल्या तथाकथित अत्याचारावर त्यांनी भाषणे द्यायला सुरुवात केली. ती देत असताना आपल्या डोक्यावर लष्कराची टोपी राहू देण्याची काळजी मात्र घेतली. भ्रष्टाचाराच्या निर्मूलनासाठी अण्णांनीही मग आपल्या मांडीला मांडी लावून बसणारे हे गृहस्थ दोन वेगळ्या जन्मतारखा सांगणारे व त्याचे लाभ उपटू पाहणारे आहेत याची भ्रांत राखली नाही. आंदोलनात येणारे हौसे, गवसे आणि नवसे असे सारे आपल्याचएवढे स्वच्छ आणि सोवळे आहेत या भ्रमात अण्णा अखेरपर्यंत राहिले. त्यांच्या आंदोलनाची होऊ नये तशी परिणतीही त्याचमुळे झाली. याच काळात देशात २०१४च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली. व्ही.के. सिंहांची काँग्रेसविरोधी भाषणे आणि लष्करातील हुद्दा यावर लक्ष असणाऱ्या भाजपाने त्यांना आपले तिकीट दिले आणि लोकसभेवर निवडून आणले. पुढे मंत्रिमंडळाच्या निर्मितीनंतर काही काळ संरक्षण मंत्रिपद नरेंद्र मोदी यांनी स्वत:कडे ठेवले, तेव्हा या व्ही.के. सिंहांना त्यांनी आपले सहाय्यक म्हणून त्या खात्याचे राज्यमंत्रिपद देऊ केले. त्या नेमणुकीनंतरही त्यांची बेफाट भाषा थांबली नाही. आपले लष्कर सर्व तऱ्हेच्या साधनांनी सुसज्ज असल्याचे त्यांनी देशाला त्या काळात अनेकदा ऐकविले. पुढे मनोहर पर्रीकर संरक्षण खात्याचे मंत्री झाले आणि त्यांनी लष्करातील साधनसामग्रीच्या अभावाचा मोठा पाढाच देशाला वाचून दाखविला. लष्करी विमानांपासून बंदुकीच्या गोळ्यांपर्यंत सारेच कसे अपुरे आहे हे त्यातून देशाला कळले. तेव्हा या व्ही.के. सिंह यांनी त्यांच्या लष्करप्रमुखपदाच्या कारकिर्दीत काय केले हाच प्रश्न साऱ्यांच्या मनात उभा राहिला. सिंह मूग गिळून गप्प राहिले व त्यांनी आपला अपमान मुकाट्याने सहन केला. तथापि आता त्यांंनी नव्याने केलेला सर्वात मोठा व नवा अपराध समाजाने दखल घ्यावी असा आहे. उत्तर प्रदेशातील एका दंगलीत दोन अल्पवयीन दलित मुले बळी पडली. त्या भीषण घटनेवर भाष्य करताना व्ही.के. सिंह म्हणाले की, ‘अशी कुत्र्यासारखी सडकेवर जगणारी मुले मरणारच.’ दलित मुलांना कुत्री असे संबोधून त्यांनी साऱ्या दलित समाजाचाच अपमान केला. लष्करप्रमुख व राज्यमंत्री या जबाबदारीच्या पदांवर राहिलेल्या या सद्गृहस्थाच्या लेखी भारतीय नागरिकांचे व त्यांच्या मुलाबाळांचे स्थान कोणत्या दर्जाचे आहे हेही त्यातून उघड झाले. नेमक्या याच गोष्टीवर आक्षेप घेत बसपाच्या सतीशचंद्र मिश्र यांनी त्यांना राज्यसभेच्या बाहेर घालविण्याची विनंती सभापतींकडे केली. सिंह हे लोकसभेचे सदस्य असल्याने त्यांना राज्यसभेत बसू दिले जाऊ नये असेही मिश्र म्हणाले. मंत्र्यांना दोन्ही सभागृहात बसण्याची परवानगी असल्याने ती विनंती सभापतींनी अमान्य केली असली तरी सिंह यांचा अपराध व वाचाळपण क्षम्य ठरत नाही. दुर्दैव हे की त्या स्थितीत त्यांचा बचाव करायला भाजपाचे सगळे सभासद तावातावाने एकत्र आले आणि बसपाच्या सदस्यांशी वाद घालताना दिसले. आमची माणसे कशीही वागतील आणि कशीही बोलतील, तुम्ही मात्र त्याचा प्रतिवाद करायचा नाही असा हा पवित्रा आहे. तो लोकशाहीत मान्य होणारा आहे असे ज्यांना वाटते त्यांच्याविषयी आपण सहानुभूतीच तेवढी बाळगायची असते.