शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

दहशतीचा मुकाबला केवळ हिंसेने शक्य नाही

By admin | Updated: November 16, 2015 00:01 IST

अमेरिकेतील ९/११ किंवा मुंबईतील २६/११ अथवा पॅरिसमध्ये झालेले ताजे दहशतवादी हल्ले असोत, यातून एकच वस्तुस्थिती समोर येते की, असे हल्ले हे खरे तर आपणा सर्वांवरचे हल्ले असतात

विजय दर्डा, (लोकमत पत्र समूहाचे चेअरमन)अमेरिकेतील ९/११ किंवा मुंबईतील २६/११ अथवा पॅरिसमध्ये झालेले ताजे दहशतवादी हल्ले असोत, यातून एकच वस्तुस्थिती समोर येते की, असे हल्ले हे खरे तर आपणा सर्वांवरचे हल्ले असतात. कठोर इराद्याने हिंसाचार करणाऱ्या दहशतवाद्यांपुढे शांतताप्रिय नागरिक हतबल असतो. याअर्थाने हे हल्ले आपल्यावरचेही हल्ले ठरतात. जगभरातील राजकीय नेत्यांनी यास युद्ध असे संबोधले आहे. पण हे आक्रमण परिचित असलेल्या प्रकाराचे नाही. ही असमान लढाई आहे. यात एकीकडे अशा दहशतवादी कृत्याची कित्येक महिने आधीपासून जय्यत तयारी केलेला हल्लेखोर असतो व दुसरीकडे पुढच्या क्षणी आपल्यापुढे काय वाढून ठेवले आहे याची पुसटशीही कल्पना नसलेले असुरक्षित नागरिक असतात. अशा परिस्थितीत लोक असा हल्ला होऊन जिवास मुकतात किंवा अपंग होतात. याविरुद्ध लढायचे असेल तर या संघर्षाचे नेमके स्वरूप आपण सर्वांनी नीटपणे समजावून घ्यायला हवे.सन २००० नंतर जगभरात दहशतवादी घटनांमध्ये पाचपट वाढ झाली असून, त्यांत २० हजारांहून अधिक निरपराधांचे प्राण गेले आहेत. हेही लक्षात घेणे गरजेचे आहे की, दहशतवादाच्या निम्म्याअधिक घटनांमध्ये प्राणहानी होतही नाही तरीही लोकांच्या मनात भय निर्माण करण्याच्या दृष्टीने त्यांचा परिणाम तीव्र असतो. भारतात गेल्या १४ वर्षांत दहशतवादी घटनांमध्ये ७० टक्के वाढ झाली असून, मृतांचा आकडा २३२ वरून ४०४ पर्यंत पोहोचला आहे. दहशतवादाच्या जागतिक निर्देशांकात भारताचा क्रमांक सहावा लागतो. इराण, अफगाणिस्तान, पाकिस्तान, नायजेरिया व सीरिया हे पहिल्या पाच क्रमांकांवरील देश आहेत. या सर्व देशांमध्ये एक तर युद्ध सुरू आहे किंवा वांशिक संघर्षांमुळे तेथे गृहयुद्धासारखी परिस्थिती आहे. जगभरातील दहशतवादाच्या ८२ टक्के घटना या पहिल्या पाच देशांमध्ये होत असतात.जागतिक प्रसिद्धी माध्यमांमध्ये या घटनांची गांभीर्याने दखल घेतली जात नाही. पॅरिससारखी घटना घडते तेव्हा जगाचे लक्ष त्याकडे वेधले जाते. जागतिक दहशतवादाच्या निर्देशांकात अमेरिका व फ्रान्स अनुक्रमे ३० व ५६ व्या स्थानावर आहेत. प्रत्येक जीव अमूल्य असतो व दहशतवादामुळे कोणालाही प्राण गमवावा लागू नये अशी सर्वांचीच प्रार्थना असते. तरी स्वातंत्र्य, समानता व बंधुभाव या लोकशाहीच्या तीन मूल्यांच्या बळकटीच्या दृष्टीने पॅरिसवरील हल्ला सर्वोच्च स्थानावर मानायला हवा. हा हल्ला हा या तीन मूल्यांची गळचेपी करण्याचा प्रयत्न आहे.दहशतवादाला कोणताही धर्म नसतो हे बोलायला ठीक आहे, पण दहशतवादी उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी धर्माचीच कास धरत असतात याकडे दुर्लक्ष करणे घातक ठरेल. आपण शांततेने सहजीवन व्यतीत करण्यासाठी धर्माचरण करतो, तर दहशतवादी इतरांना यातना देण्यासाठी धर्म पाळतात. दहशतवादाविरुद्ध एका समान दृष्टिकोनातून लढा द्यायचा असेल तर हा फरक पूर्णपणे समजून घ्यायला हवा. काही राजकीय उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी काही प्रकारच्या दहशतवादाचा वापर करण्यास हरकत नाही असे आपल्यापैकी काहींना (यात दहशतवादीही आले) वाटत असेल तर हे नक्की समजा की दहशतवादाचा हा धोका दीर्घकाळ दूर होऊ शकणार नाही. जे कोणी इतरांविरुद्ध दहशतवादाचा वापर करण्याचे समर्थन करतात त्यांनाही हा भस्मासुर सोडत नाही. पाकिस्तान हा आपला शेजारी देश याचे उत्तम उदाहरण आहे. काश्मीरमध्ये भारताविरुद्ध लढणारे दहशतवादी काश्मीर समस्या सोडविण्याचा राजकीय हेतू साध्य करण्यासाठी उपयुक्त आहेत, असे पाक मानत आले आहे. पण दहशतवाद हे दुहेरी शस्त्र असते याची प्रचिती पाकला आली आहे. आज दहशतवादाच्या जागतिक निर्देशांकात पाकिस्तानचा तिसरा क्रमांक लागतो व या विखारी धोरणाची मोठी किंमत त्यांना मोजावी लागत आहे. २०१३ या वर्षात पाकमध्ये दहशतवादी हल्ल्यांमध्ये २,२०० हून अधिक लोक ठार झाले.अशाच प्रकारे अफगाणिस्तानमधील अस्थिरतेमधून अल काईदाचा भस्मासुर उभा राहिला. मुजाहिदीन ही आपल्यासाठी जमेची बाजू आहे, असे अमेरिका काही काळ मानत आली. पण या घोडचुकीची किंमत अमेरिकेला ९/११च्या अतिरेकी हल्ल्याच्या रूपाने मोजावी लागली. पॅरिस हल्ल्याची जबाबदारी घेणाऱ्या इस्लामिक स्टेट आॅफ इराक अ‍ॅण्ड सीरिया (इसिस) या संघटनेस शांतता ही कल्पनाच मान्य नाही. त्यांना नरसंहाराची तहान लागलेली आहे. त्यांचे धार्मिक विचारच एवढे कट्टर आहेत की त्यांच्यात बदल संभवत नाही. जगाचा अंत जवळ आला आहे व त्याची सिद्धता आपणच करणार, अशा राक्षसी विचारांचा त्यांच्यावर पगडा आहे. त्यामुळे सीरियामध्ये राष्ट्राध्यक्ष बशीर असद व त्यांच्या विरोधकांत सुरू असलेल्या संघर्षात इस्लामिक स्टेटने उडी घेतल्याने गेल्या साडेचार वर्षांत सीरियामध्ये अडीच लाखांहून अधिक लोकांची कत्तल झाली आहे व ११ दशलक्ष नागरिकांना देश सोडून परागंदा व्हावे लागले आहे. या दहशतवादातील इस्लामी भाग दुर्लक्षित करता येणार नाही. म्हणून आपण सर्वच मुसलमानांना शत्रू समजण्याचे काही कारण नाही. पण पाश्चात्त्य राष्ट्रांनी हे समजण्याची गरज आहे की अल काईदा असो, इसिस असो अथवा भविष्यात उभा राहणारा त्याच जातकुळीतील अन्य धोका असो, त्याचा बिमोड करण्यासाठी केवळ हिंसाचारास हिंसाचाराने उत्तर देणे पुरेसे नाही, तर त्यासाठी रणनीती आखावी लागेल. पॅरिस हल्ल्यांनंतर फ्रेंच राष्ट्राध्यक्ष फ्रँकॉई होलांद यांनी दयामाया न दाखविता या शक्तींविरुद्ध युद्ध पुकारण्याचे जाहीर केले आहे. अमेरिकेतील हल्ल्यांनंतर राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश यांनीही तेच केले व त्याचे परिणामही आपण पाहिले. संयुक्त राष्ट्र संघांच्या मध्यस्थीने सीरियात येत्या १८ महिन्यांत निवडणूक घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशी निवडणूक झाली व त्यात राष्ट्राध्यक्ष बशीर अल असद यांना सत्तेवरून दूर केले गेले तरी त्याने इसिसला आवर घातला जाण्याची शक्यता फारच कमी आहे. ज्या बाताक्लान थिएटरमध्ये दहशतवाद्यांनी ८९ लोकांना ठार केले तेथे सापडलेल्या हाताच्या तुटलेल्या बोटावरून तेथील हल्लेखोराची ओळख पटली, असा दावा फ्रेंच सुरक्षा दलांनी केला आहे. त्याचे नाव ओमर इस्माईल मोस्तफाई असे असून, पोलीस रेकॉर्डमध्ये किरकोळ गुन्हेगार म्हणून नोंद असलेला अल्जेरियन वंशाचा तो फ्रेंच नागरिक आहे. यावरून या गुन्ह्याची उकल करणे शक्य व्हावे. पोलिसांच्या दृष्टीने हा महत्त्वाचा दुवा असेलही, पण सर्वांनाच ग्रासून टाकणारे दहशतीचे वातावरण हा याहूनही व्यापक विषय आहे. त्यामुळे केवळ पोलिसी दृष्टीने न पाहता दहशतवादाचा फटका सर्वांनाच बसतो व जे याचा अवलंब करतात त्यांना तो सर्वात जास्त बसतो या जाणिवेची त्याला जोड देण्याची गरज आहे.हे लिखाण संपविण्यापूर्वी...पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वेम्बली स्टेडियममध्ये भव्य कार्यक्रम झाला. त्यांच्या व्यक्तित्वास साजेसा असाच तो कार्यक्रम होता. भारताला सौरऊर्जेचे ‘पॉवर हाऊस’ बनविण्याची ग्वाही मोदींनी दिली. असहिष्णुता खपवून न घेण्याचे मोदींचे वक्तव्यही स्वागतार्ह आहे. पंतप्रधान मोदी यांनी भारतासाठी महत्त्वाकांक्षी योजना मांडण्यात काहीच कमतरता नाही. प्रश्न तो तळागाळातील लोकांच्या जीवनात फरक पडेल अशी पावले उचलण्याचा. हेही साध्य होईल, अशी आशा धरू या.