शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
2
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
3
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
4
बाबांसाठी घड्याळ, आईला कानातले पण ते...; अधिकाऱ्याच्या लेकाची काळजात चर्र करणारी गोष्ट
5
भारतीय नवराच हवा! न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरवर फलक घेऊन उभी राहिली तरुणी
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
7
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
8
टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुपरफास्ट ३००० धावा; विराट दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
9
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
10
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
11
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
12
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
13
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
14
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव
15
IND vs PAK सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावर अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?
16
Akola: रेल्वेतून उतरताना घसरला आणि मृत्यूच्या जबड्यातच अडकला; मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थरकाप उडवणारी घटना
17
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
18
विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...
19
नेपाळनंतर आता आणखी एका देशात सत्तांतर?; भारताच्या मित्र देशात सैन्य अलर्टवर, लोक रस्त्यावर उतरले
20
पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?

कोरोनायुद्धात मुलांच्या लसीकरणाला क्षेपणास्त्रांइतके महत्त्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2022 07:26 IST

महामारीच्या काळात जेव्हा रुग्णांचे आकडे मंदावतात आणि लसीविषयीचे गांभीर्य कमी झालेले असते, नेमकी तीच वेळ लसीकरण वाढवून संक्रमण रोखण्याची असते.

- डॉ. अमोल अन्नदाते

डॉक्टर व पहिल्या फळीतील आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी १६ जानेवारी २०२१ पासून सुरू झालेला कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम आता १२ ते १४ वर्षांच्या मुलांच्या लसीकरणापर्यंत येऊन पोहोचला आहे. सद्यस्थिती अशी आहे की, देशातील पंधरा वर्षांपुढील ८०.१ टक्के तर राज्यातील ७०.०२ टक्के जनतेचे पूर्ण लसीकरण झाल्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर आपण आहोत. त्यातच तिसरी लाट सारून कोरोनाची रुग्णसंख्या जाणवण्याइतपत कमी झालेली आहे. असे असताना १२ ते १४ वर्षांच्या मुलांचे लसीकरण कशासाठी, हा प्रश्न पालकांच्या मनात आहे.

कोरोनाच्या बाबतीत शेवटचा नसला तरी महत्त्वाच्या कळसाध्यायास सुरुवात झाली आहे. महामारीच्या काळात जेव्हा रुग्णांचे आकडे मंदावतात आणि जनतेच्या मनात लसीविषयीचे गांभीर्य कमी झालेले असते, नेमकी तीच वेळ लसीकरणाचे प्रमाण वाढवून नवीन संक्रमणे व लाटा रोखण्याची असते. हे लक्षात घेऊन १२ ते १४ वर्षांच्या मुलांच्या लसीकरणाचा हा टप्पा किती महत्त्वाचा आहे, हे फक्त पालकच नव्हे; तर जनतेने समजून घेणे गरजेचे आहे.

लहान मुलांमधील कोरोना हा सौम्य स्वरूपाचा असतो व मृत्यूदरही नगण्य आहे. पण असे असले तरी ही मुले कोरोनाची वाहक होऊ शकतात. म्हणूनच लहान मुलांमधील संसर्गाचे प्रमाण कमी झाल्यास त्याचा महामारी रोखण्यासाठी महत्त्वाचा वाटा असेल. पहिली गोष्ट, लहान मुलांमध्ये मृत्यूदर नगण्य असला तरीही तो काही प्रमाणात आहे, हे समजून घेणे गरजेचे आहे. देशातील १५ वर्षांपुढील ८० टक्के लोक लसीकृत झालेले असताना कोरोना विषाणूसाठी सर्वात सोपे सावज ही १५ वर्षांखालील मुले असतील. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा की, पंधरा वर्षांखालील सौम्य स्वरूपातील संसर्गित मुले ही घरातील ज्येष्ठांसाठी संसर्गाचा सर्वात मोठा स्रोत ठरू शकतात. 

या वयोगटाचे लसीकरण त्यांच्या वैयक्तिक आरोग्यासाठीही तितकेच महत्त्वाचे आहे. कारण आधीच आपल्या देशात कुमारवयीन मुलांच्या मृत्यूसाठी जबाबदार ठरण्यास इतर संसर्गजन्य आजारांची कारणे बरीच आहेत. त्यात अल्प सहभाग असलेल्या कोरोनाच्या कारणांचा नायनाट लसीकरणाने होईल. तसेच या वर्गासाठी अल्प प्रमाणात मृत्यूदरासाठी कारणीभूत असलेल्या कोरोनाच्या विषाणूचा नायनाट या लसीकरणाने होणार आहे. तसेच भावी पिढीमध्ये कोरोना विरोधात प्रतिकारशक्तीची इमारत बांधण्यासाठी हा महत्त्वाचा पाया आहे. आरोग्य विमा आयुष्यात जितक्या लवकर घ्याल, तितका लाभ जास्त मिळतो. तसेच लसीकरणही जितक्या कमी वयासाठी सुरू होईल, तितकीच पुढील वर्षात कोरोनाविरोधातील सामूहिक प्रतिकारशक्ती उभी राहण्यास उपयुक्त ठरेल. म्हणून कमी वयात व लवकरात लवकर लसीकरण घेणारे हे कोरोनाच्या बाबतीत सर्वात भाग्यशाली ठरतील.

यापलीकडेही १२ ते १४ या वयोगटासाठीच्या कोरोना लसीकरणाचे आणखी एक महत्त्व आहे. कोरोना संसर्ग सौम्य असला तरी शरीरातील विविध अवयवांवर परिणाम करणारी एक गुंतागुंत म्हणजे या वयोगटातील मुलांमध्ये कोरोना ४ ते ६ आठवड्यानंतर दिसून येतो. ही गुंतागुंत जिवावर बेतणारी आहे. राज्यात दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर शाळा सुरळीत सुरू झाल्या आहेत. ओमायक्रॉनची लाट सरून गेली असली तरी, पुढील लाटा कधी व कशा येतील, याचे भाकीत आता वर्तवणे अवघड आहे, पण सौम्य किंवा तीव्र संसर्गाची लाट येऊ नये, असे वाटत असेल तर १२  ते १४  वर्षे वयोगटाच्या मुलांच्या लसीकरणाचे  प्रमाणपत्रच शाळा सुरू ठेवण्यासाठी सर्वात मोठे आयुध ठरणार आहे. या लसीकरणासाठी कोव्हॅक्सिन नाही, तर नवीन कर्बोवॅक्स ही लस वापरण्यात येणार आहे. ही लस आधी वापरण्यात आली नसल्याने त्याच्या सुरक्षिततेबद्दल पालकांच्या मनामध्ये शंका आहेत; पण ही लस अत्यंत सुरक्षित असल्याचे निश्चित दाखले वैज्ञानिकांनी दिले आहेत. तसेच कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड या लसींचा ८० टक्के जनतेचा अनुभव गाठीशी असल्याने पालकांनी या लसीमध्ये कुठलेही किंतु मनात बाळगण्याचे कारण नाही.

१२ ते १४ या वयोगटाचे लसीकरण करताना, हे आतापर्यंतच्या लसीकरणापेक्षा काहीसे वेगळे असल्याचे शासकीय यंत्रणेने समजून घेणे गरजेचे आहे. जसजसे लसीकरणाचे वय खाली येत जाईल, तसतसे या मोहिमेत बालरोगतज्ज्ञांचा सहभाग वाढवणे आवश्यक आहे. १२ ते १४ वयोगटातील मुलांची राज्यात ६४ लाख ९५ हजार, तर  देशात ७ कोटी ११ लाख एवढी संख्या असल्याने हे लसीकरण वेगाने व पुढची लाट येण्याआधी होणे गरजेचे आहे. पालकांनीही आपल्या पाल्यांना घेऊन लसीकरण केंद्रांवर रांगा लावणे गरजेचे आहे. लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी लसीवरचे सरकारी आरक्षण उठवून तिला खुल्या बाजारात येऊ देणे हितवाह ठरेल. लहान मुलांची लस ही कोरोनाच्या युद्धात साधी बंदूक किंवा रणगाडा नसून क्षेपणास्त्रच आहे हे सत्य पालक, शाळा तसेच शासनाच्या पचनी पडले तरच सर्व स्तरावर या मोहिमेला वेग येईल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या