शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

US Election 2020: अमेरिका नावाचा एक बेपत्ता देश!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2020 06:07 IST

US Election 2020: ट्रम्प यांच्या चक्रम नेतृत्वशैलीतच आपला उद्याचा सुवर्णकाळ लपला आहे अशा समजुतीत मग्न नागरिकांमुळे अमेरिकन ड्रीम संपत चालले आहे का?

- प्रशांत दीक्षित (संपादक लोकमत, पुणे)

अमेरिकेइतके आकर्षण अन्य देशाचे जगाला नाही. सर्वसामान्य मध्यमवर्ग हा अमेरिकेला जाण्यासाठी उत्सुक असतो. मुलाला अमेरिकेत नोकरी मिळाली की संसाराचे सार्थक झाले असे मानणारे बहुसंख्य महाराष्ट्रासह जगभरात आहेत. याचे कारण अमेरिकेचा चेहरा. श्रीमंत होण्याची संधी देणारा, जात-वंश-धर्मभेद बाजूला ठेवून गुणवत्ता व श्रमांची कदर करणारा  देश म्हणून अमेरिका ओळखली जाते. नियमांना महत्त्व देणारा, अधिकांचे अधिक सुख पाहणारा, सुदृढ  लोकशाही जपणारा देश अशी अमेरिकेची ख्याती आहे. जगाला आकर्षित करणारे अमेरिकेचे हे रूप हा मुखवटा आहे का, असा प्रश्न अमेरिकेच्या निवडणुकीनंतर जगाला पडला आहे. अमेरिकेच्या अध्यक्षपदी बायडेन बसणार, की पुन्हा ट्रम्प हे अद्याप निश्चित झालेले नाही. निकाल कोणाच्याही बाजूने लागो, अमेरिकेचा स्वभाव बदलला आहे असे तेथील अभ्यासक म्हणतात. ट्रम्प यांच्या आक्रस्तळ्या, चक्रम नेतृत्वाला झिडकारून अमेरिका त्यांचा सणसणीत पराभव करेल हा अंदाज फसला. बायडेन यांच्या डेमॉकॅट्रिक पक्षाची निळी लाट अमेरिकेत येईल अशी अपेक्षा माध्यमातील बुद्धिवंतांची होती. अमेरिकी जनतेने ती पूर्ण केली नाही. ‘इनफ इज इनफ’ असे म्हणणाऱ्यांची संख्या ‘इनफ’ नाही, याकडे डोव्ह सेजमन यांनी लक्ष वेधले आहे. नेतृत्वगुणांचा अभ्यास करणारे जाणकार म्हणून ते परिचित आहेत. ट्रम्प यांचा पराभव झाला तरी गेल्या चार वर्षातील आपल्या कारभाराने उभा केलेला ‘ट्रम्प-अमेरिकन’ तेथे सशक्तपणे रुजला आहे, असे मतदानातून दिसते. 

या ‘ट्रम्प-अमेरिकना’ला जगाशी देणे-घेणे नाही. उदारमतवादी मूल्ये त्याला भावत नाहीत. राबवून घेऊन त्याला श्रीमंत करण्यासाठी स्थलांतरित येत असतील तर त्याला ते हवे आहेत. मात्र अमेरिकेत येऊन ते मतदानाचा हक्क बजावणार असतील, स्थानिक गौरवर्णीयांच्या नोकऱ्या बळकावणार असतील, किंवा अमेरिकेतील उदारमतवादी नियमांच्या बळावर स्वत: श्रीमंत होऊन आपल्या देशातील लोकांना श्रीमंत करणार असतील तर ट्रम्प-अमेरिकनांचा त्यांना कडवा विरोध आहे. आपला पैसा, आपले तंत्रज्ञान, आपले विज्ञान वापरून जगाची परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न अमेरिकेने करणे याला मान्य नाही. स्वार्थ साधला जात नसेल तर जगाचे नियम बेलाशक धुडकावून द्या असे हा अमेरिकन सांगतो. ट्रम्प यांचा सगळा कारभार या स्वभावानुसार चालत होता. हा ‘ट्रम्पिझम’ आता अमेरिकेत चांगला रुजला आहे हे या मतदानातून दिसते. 

बायडेन किंवा डेमोक्रॅट यांची अमेरिका थोडी वेगळी आहे. जगातील गुणवत्तेला आवाहन करणारी, व्यक्तिस्वातंत्र्याचा केवळ आदर नव्हे तर आग्रह धरणारी, कला-क्रीडा-कौशल्ये यांचा मोकळेपणे स्वीकार करणारी, स्थलांतरितांकडील गुणांमुळे अमेरिकेचा अधिक विकास होईल, असे मानणारी, महासत्ता म्हणून जगात वावरताना उदार भूमिका स्वीकारणारी, पर्यावरणाचा समतोल राखणारी, जगातील गरिबांना आर्थिक समृद्धी मिळवून देणे हे कर्तव्य आहे असे मानणारी, पुरोगामी मूल्यांचे स्वागत करणारी अशी ही अमेरिका आहे. डेमोक्रॅट अमेरिका अत्यंत नि:स्वार्थ, कमालीची सुसंस्कृत आहे असे नव्हे. मतलबी स्वार्थ त्यांनाही सुटलेला नाही. परंतु, उच्च मूल्ये आचरणात आणता येत नसतील तर त्याबद्दल खंत करण्याची संवेदनशीलता त्यांच्याकडे आहे. ट्रम्प-अमेरिकनाला अनैतिक वागणुकीची खंत नाही. बायडेन यांची अमेरिका जगातील मध्यमवर्गाला आकर्षित करते. आपले आयुष्य पालटण्याची क्षमता या अमेरिकेत आहे असे गरीब देशातील मध्यमवर्गाला वाटते. हे ‘अमेरिकन ड्रीम’ संपत चालले आहे याची जाणीव आजची निवडणूक करून देते. 

बायडन जरी अध्यक्ष झाले तरी ‘ट्रम्प-अमेरिकन’चा स्वभाव ते बदलतील असे तेथील जाणकारांना वाटत नाही. ट्रम्प यांचीच धोरणे बायडेन यांना राबवावी लागतील. ट्रम्प यांच्यापेक्षा अधिक सभ्यपणाने, पुरोगामी मूल्यांचा मुलामा देऊन बायडेन कारभार करतील. मात्र समाजचिंतक डेव्हीड ब्रुक्स म्हणतात त्याप्रमाणे ‘कोअर अमेरिका’ बदलणे बायडेन यांना जमेल का, याबद्दल शंका आहे. अमेरिकेसमोरील सर्वात मोठे आव्हान हे आहे. स्वातंत्र्य, सर्वांना समान संधी, सुख शोधण्याचा हक्क आणि सर्वंकष लोकशाही ही मूल्ये अमेरिकेने, फ्रेंच राज्यक्रांतीच्या तेरा वर्षे आधी जगाला दिली. जगभरातील गुणवत्तेचे स्वागत करण्याची परंपरा आणि विचार-आचारांचे स्वातंत्र्य हा अमेरिकेच्या आकर्षणाचा गाभा होता. यामुळेच अमेरिकेतील विज्ञान, तंत्रज्ञान फुलले व व्यापार वाढला. लोकशाहीशी निष्ठा जपणाऱ्या या मूल्यांमुळे जगाचे नेतृत्व अमेरिकेकडे आले. ओबामांपेक्षा ट्रम्प यांनी अमेरिकेची आर्थिक स्थिती सुधारली असली तरी कोणत्याही नियमांची, करारांची चौकट न मानणाऱ्या ट्रम्प यांच्या बेदरकार कारभारामुळे  जगाचे नेतृत्व अमेरिकेकडून निसटत गेले.

आश्चर्य याचे आहे की रिपब्लिकन पक्षाला ट्रम्प यांनी आपल्यामागे फरफटत नेले. मतमोजणी ताबडतोब थांबवा आणि मला विजयी घोषित करा या ट्रम्प यांच्या मागणीतून नियमांना झुगारून देण्याची त्यांची वृत्ती दिसते. लोकशाहीत लपलेली ही एकाधिकारशाही आहे. ट्रम्पिझम हेच ग्रॅण्ड ओल्ड पार्टीचे (रिपब्लिकन) भविष्य आहे, असे न्यू यॉर्क टाइम्सचे स्तंभलेखक फ्रिडमन यांनी गौतम मुकुंद यांच्या अभ्यासाला हवाला देऊन म्हटले आहे. तथापि, ट्रम्प यांच्या चक्रम नेतृत्वशैलीतच आपला उद्याचा सुवर्णकाळ लपलेला आहे अशा समजुतीत मग्न असलेला वर्ग अमेरिकेत वाढला आहे. उदारमतवादी  मूल्ये आणि सांस्कृतिक क्षेत्र तसेच माध्यमांतील उदारमतवादी उच्चभ्रूंचा प्रभाव यांचा विलक्षण राग अमेरिकेतील कामगार व गरीब वर्गाला आहे, असे फ्रिडमन सांगतात. राजमार्गाने ट्रम्प यांना सत्तेवर बसविण्याचा या वर्गाचा प्रयत्न फसला तर ट्रम्प यांच्याच मार्गावरून चालण्याचा दबाव बायडेन यांच्यावर टाकला जाईल. हा दबाव झुगारून कारभार करण्याची ताकद बायडेन यांच्याकडे आहे का, यावर अमेरिकन ड्रीमची भुरळ अवलंबून असेल. एक बेपत्ता देश, असे अमेरिकेचे वर्णन पु.ल. देशपांडे यांनी केले होते. जगातील मध्यमवर्गासाठी अमेरिकेचा पत्ता खरोखरच हरवत चालला आहे. 

आधार : डेव्हीड ब्रुक्स, थॉमस फ्रिडमन व माजी परराष्ट्र सचिव विजय गोखले यांचे लेख तसेच असोसिएटेड प्रेस व एडिसन रिसर्च यांचे एक्झिट पोल

टॅग्स :US ElectionAmerica ElectionDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पJoe Bidenज्यो बायडन