शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

ट्रम्प हे जगाचेच दुर्दैव

By admin | Updated: March 6, 2017 23:33 IST

अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवडून आलेले डोनाल्ड ट्रम्प हे नुसते बेजबाबदारच नाहीत तर असभ्य म्हणावे असे पुढारी आहेत.

अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवडून आलेले डोनाल्ड ट्रम्प हे नुसते बेजबाबदारच नाहीत तर असभ्य म्हणावे असे पुढारी आहेत. मुळात हिलरी क्लिंटन या डेमॉक्रेटिक पक्षाच्या उमेदवाराच्या तुलनेत साठ लाखांहून कमी मते मिळाल्यानंतरही ते अध्यक्षपदावर आले आहेत. अमेरिकेतील प्रत्येक राज्य त्याच्या काँग्रेसमधील (विधिमंडळ) सभासदांच्या संख्येएवढे अध्यक्षीय मतदार निवडून देते. उदा. न्यू यॉर्क या राज्याचे हाऊस आॅफ रिप्रेझेंटेटिव्हजमध्ये ४५ व सिनेटमध्ये दोन सभासद असतील तर ते राज्य अध्यक्षपदाचे ४७ मतदार निवडून देते. त्या राज्यात ज्या उमेदवाराला बहुमत मिळेल त्याला त्याचे ४७ ही मतदार मिळतात. त्यामुळे काही मोठी राज्ये अल्पमताने जिंकली आणि अनेक लहान राज्ये मोठ्या संख्येने गमावली तरी एखाद्या उमेदवाराला जास्तीचे मतदार घेऊन विजयी होता येते. ट्रम्प हे तसे निवडले गेलेले अध्यक्ष आहेत. आपल्या प्रचारकाळात त्यांनी स्त्रिया, मेक्सिकन लोक, अमेरिकेतील विदेशी रहिवासी, कृष्णवर्णीय अमेरिकन आणि मुसलमान धर्म यांच्याविषयी जी बेजबाबदार व अपमानकारक विधाने केली ती साऱ्यांच्या लक्षात आहेत. त्यांच्या प्रचारकाळात अमेरिकेशी गेली ७० वर्षे चाललेल्या शीतयुद्धात शत्रुत्व करणाऱ्या रशियाने त्यांना गुप्तपणे मदत केली व त्यांच्या विरोधी उमेदवाराला अडचणीत आणणाऱ्या बातम्या जगभर पेरल्या हेही आता स्पष्ट झाले आहे. अध्यक्षपद हाती येताच ओबामांची आरोग्यविषयक योजना रद्द करणे, सात मुस्लीम देशांतील नागरिकांच्या अमेरिकेतील प्रवेशावर बंदी घालणे, मेक्सिकोच्या सीमेवर भिंत बांधणे असे आदेश त्यांनी काढले. त्यातले काही तेथील सांघिक न्यायालयाने रद्द केल्यानंतर ते नव्या स्वरूपात पुन्हा जारी करण्याची घोषणाही त्यांनी केली. सीएनएन, बीबीसी, न्यू यॉर्क टाइम्स आणि वॉशिंग्टन पोस्टसारख्या देशातील प्रमुख प्रसारमाध्यमांनी त्यांचे प्रतिनिधी अध्यक्षीय वार्तालापासाठी पाठवू नयेत, असा चमत्कारिक व अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणारा आदेशही त्यांनी काढला. परिणामी त्यांच्याच रिपब्लिकन पक्षातील अनेक जुने व जाणते पुढारी आणि प्रशासनातील अनेक वरिष्ठ अधिकारी त्यांच्या विरोधात जाताना वा त्यांच्यापासून अंतर राखताना दिसू लागले. त्यांच्याविरुद्ध अमेरिका, कॅनडा, जर्मनी, इंग्लंड आणि फ्रान्स या देशातील स्त्रियांनी निषेध मोर्चे काढले मात्र त्याचा त्यांच्यावर कोणताही परिणाम झाल्याचे त्यांच्या वृत्तीत दिसले नाही. नाही म्हणायला त्यांनी काँग्रेससमोर जे पहिले अध्यक्षीय भाषण केले ते बरेच संयमाचे व मर्यादशील होते. त्यामुळे ‘हा माणूस आता जबाबदार बनला’ अशी भाषा अमेरिकी माध्यमांनी सुरू केली. हिलरी क्लिंटन यांनी त्यांच्या परराष्ट्र मंत्रिपदाच्या काळात आपल्या हातातील संपर्क माध्यमांचा गैरवापर केला असा जो आरोप ट्रम्प यांनी केला तो आजवर सिद्ध झाला नाही. मात्र आता नेमका तोच आरोप त्यांचे उपाध्यक्ष असलेले माईक पेन्स यांच्यावर झाला आणि त्याचे खंडन करणे पेन्स यांना जमताना दिसत नाही. त्यामुळे ट्रम्प यांचा संयम पुन्हा एकवार सुटला आहे आणि त्यांच्या बेफाटपणाने पुन्हा उसळी घेतली आहे. आताचा आपला वार त्यांनी पूर्वाध्यक्ष बराक ओबामा यांच्यावर केला आहे. ‘मी अध्यक्षपदाची निवडणूक लढवीत असताना ओबामा आणि त्यांचे सरकार यांनी माझे टेलिफोन टॅप केले होते व माझी संभाषणे ते चोरून ऐकत होते’ असा आरोप कोणताही पुरावा पुढे न करता त्यांनी केला आहे. बराक ओबामा यांची कारकीर्द, कार्यशैली आणि त्यांच्या वागणुकीतील गांभीर्य पाहता हा आरोप कोणालाही खरा वाटणारा नाही. रस्त्यावर भांडण करणारी अल्पवयीन पोरे ज्या तऱ्हेने शिवीगाळीवर उतरतात तसा ट्रम्प यांचा आरोप बालिश व पोरकट म्हणावा असा आहे. फार पूर्वी रिचर्ड निक्सन यांनी त्यांच्या अध्यक्षीय निवडणुकीच्यावेळी विरोधी पक्षाच्या कार्यालयात गुप्तपणे फोन टॅपिंगपासूनची सगळी व्यवस्था केली होती, असा आरोप झाला व तो सिद्ध होऊन निक्सन यांच्याविरुद्ध महाभियोगाचा खटलाही काँग्रेसमध्ये दाखल झाला. सिनेटमध्ये त्याची चौकशी सुरू असतानाच निक्सन यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन त्यातून स्वत:ची सुटका करून घेतली होती. एवढा गंभीर अपराध देशाच्या अलीकडच्या इतिहासात जमा असताना ओबामांसारखा सभ्य नेता तो पुन्हा करील असे अमेरिकेसह जगातही कुणाला वाटत नाही. आपल्यावर आरोप होत असताना त्यावरून लोकांचे लक्ष अन्यत्र वळविण्यासाठी दुय्यम दर्जाचे अनेक पुढारी अशा आरोपतंत्रांचा वापर करीत असतात. ‘आमच्या वाट्याला आलेली यंत्रणाच भ्रष्ट होती’ असा ठपका आपले मोदी सरकार त्यांच्या आधीच्या सरकारवर ठेवून नामानिराळे होताना जसे भारतात दिसते त्याचीच ही अमेरिकी आवृत्ती आहे. त्यातून ट्रम्प यांची प्रतिमा उजळणार नाही आणि ओबामांची डागाळणारही नाही. चोहोबाजूंनी होत असलेल्या आरोपांमुळे भांबावून गेलेली उथळ माणसे जशी बहकल्यासारखी वागतात वा बरळतात तसा ट्रम्प यांचा आताचा प्रकार आहे. जगाचे नेतृत्व करणाऱ्या अमेरिकेच्या अध्यक्षपदावर अशी माणसे येणे हे एकट्या अमेरिकेचेच नाही तर जगाचेही दुर्दैव आहे.