शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
3
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
4
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
5
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
6
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
8
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
9
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
10
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
11
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
12
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
13
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
14
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
15
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
16
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
17
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
18
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
19
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
20
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story

अंधारातील एकच प्रकाश, कोठे गेले जयप्रकाश...?

By वसंत भोसले | Updated: February 5, 2023 09:37 IST

समोर अंधार दिसत असतानाही स्वच्छ प्रकाशच पडला आहे, असे जर भीतीपोटी म्हणत राहिलो, तर संपूर्ण अंधार कधी झाला समजणार नाही. पाकिस्तान आणि श्रीलंका पाहतो आहोत. श्रीलंकेत सातशे रुपये किलो तांदूळ आहे. आपण ऐंशी कोटी जनतेला फुकट अन्नधान्य देण्याची मतासाठी घोषणा करतो. ही ताकद कोणी दिली?, तोट्यात चालणारी शेती करणाऱ्यांनी दिली आहे. त्यांना विसरुन अदानी ग्रुपला जवळ करणार असाल, तर जयप्रकाश कधीच भेटणार नाहीत.

- वसंत भोसले, लोकमतच्या कोल्हापूर आवृत्तीचे संपादक

समाजवाद्यांपासून जनसंघीय ते संधीसाधू काँग्रेसवाल्यांपर्यंत एकच घोषणा देत होते, "अंधेरे में एक प्रकाश, जयप्रकाश जयप्रकाश!" संपूर्ण क्रांतीची घोषणा लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी बिहारची राजधानी पाटण्यातील मध्यवर्ती भागात असलेल्या ऐतिहासिक महात्मा गांधी मैदानावरुन केली होती. या सभेला लाखो बिहारी जनतेने मोठ्या अपेक्षेने तुडुंब गर्दी केली होती. त्या गर्दीत लालूप्रसाद यादव, नितीशकुमार, रामविलास पासवान, सुशीलकुमार मोदी हे तरुण आघाडीवर होते. पुढे ते राज्यकर्ते झाले आणि बिहारमध्ये प्रतिक्रांतीदेखील त्यांनी घडवून आणल्याचे आपण पाहतो आहोत. जयप्रकाश नारायण यांनी ही घोषणा आणीबाणी जाहीर होण्यापूर्वी केली होती. त्याचाही सुवर्णमहोत्सव दोन वर्षांनी होईल. पुढे जयप्रकाश नारायण यांनी दिल्लीच्या रामलीला मैदानावर लाखो लोकांच्या उपस्थितीत पोलिस आणि लष्करास बंड करण्याचे आवाहन करुन एका मोठ्या अराजकतेला निमंत्रण दिले होते. ती वेळ आली नाही, आपल्या लष्कर आणि पोलिस दलाने संयम दाखविला. संपूर्ण भारत वर्षावर अंधार पसरला आहे, असे वातावरण तयार करण्यात आले होते. पुढे देशाचे संरक्षणमंत्री झालेल्या जॉर्ज फर्नांडिस यांनी बाॅम्बस्फोट घडवून आणण्याची संपूर्ण तयारी केली होती. ही खरी आणीबाणीची परिस्थिती होती.

पुढचा सर्व इतिहास तुम्हाला माहीत आहे. जयप्रकाश नारायण यांच्या आवाहनानुसार विनाविचारांची संपूर्ण क्रांती मतपेटीतून झाली. विनादिशा असणारे सरकार स्थापन झाले आणि भारतीय लोकशाही अधिक भरभक्कम करणाऱ्या सामान्य मतदारांची सदविवेकबुद्धी जागृत झाली. पुन्हा एकदा श्रीमती इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील इंदिरा काँग्रेस पक्षाला बहुमताने सत्तारुढ केले. समाजवाद्यांची पांगापांग झाली, जनसंघवाल्यांनी भारतीय जनतेच्या नावाने भाजपला जन्म दिला. बहुसंख्य संधिसाधू काँग्रेसवाल्यांनी श्रीमती इंदिरा गांधी यांच्या पायावर लोळण घातले. कर्नाटकातील चिक्कमंगळूर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत श्रीमती इंदिरा गांधी यांचा पराभव करण्यासाठी जनता पक्षाकडून लढणारे काँग्रेसचेच माजी मुख्यमंत्री वीरेंद्र पाटील देखील त्या लोळणाऱ्यांमध्ये सामील झाले होते. पुन्हा ते मुख्यमंत्री होण्याची स्वप्ने पाहात होते.

अशा वातावरणातून भारत जात असताना, खलिस्तानसारख्या फुटीरता वादी शक्तींनी इंदिरा गांधी यांचा बळी घेतला. पुन्हा एकदा धर्माच्या आधारे देशाची फाळणी करणारा डाव कठोरपणे मोडून काढल्याची किंमत श्रीमती इंदिरा गांधी यांना मोजावी लागली. राजीव गांधी यांच्या कालखंडात संगणक तसेच दूरसंचार क्रांती झाली. मात्र केवळ ६४ कोटी रुपयांच्या बोफोर्स प्रकरणावरुन पुन्हा एकदा अंधार पसरल्याचे वातावरण तयार करण्यात आले. (केवळ ६४ कोटी म्हणण्याचे कारण अदानी ग्रुपने जो घोटाळा तयार करुन लुटालूट केली आहे, त्याकडे लक्ष वेधायचे आहे.)

इतकी लुटालूट झाली तरी, अद्याप कोणालाही तिसऱ्यांदा भारत वर्ष अंधारात गेल्याचे दिसेनासे झाले आहे. त्या बोफोर्सच्या ६४ कोटी रुपयांच्या कमिशनचा शोध घेण्यासाठी चौकशी आयोग आणि संसदीय चौकशी समितीवर तेवढाच पैसा खर्ची पडला असणार आहे. बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडीचे  खासदार तथा केंद्रीय मंत्री बी. शंकरानंद या निष्ठावान काँग्रेस नेत्याने या चौकशी समितीच्या अहवालातून ना कमिशन दिले ना घेतले ? असा शोध लावून बोफोर्स प्रकरणावर पडदा टाकला. मात्र त्या प्रकरणावरुन राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाला सत्ता गमवावी लागली. डाव्या आणि तेव्हा सौम्य असलेल्या उजव्या विचारांच्या पक्षांच्या पाठिंब्यावर विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या नेतृत्वाखाली जनता दलाचे सरकार सत्तेवर आले. पुन्हा एकदा दिशाहीन, विचारहीन आणि संधिसाधूंच्या कामगिरीमुळे देशाचे अतोनात नुकसान झाले. त्यात आजचे भाजपवाले देखील भागीदार होते. शिवाय त्यांनी बहुसंख्यांकांच्या व्होट बँकसाठी श्री प्रभू रामास वेठीस धरण्यास सुरुवात केली. भारत आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभाच होता. त्याची कोणाला ना चिंता ना अंधारुन आलं आहे, असे वाटलं नव्हते. धार्मिक उन्मादाने देश होरपळून निघत होता, बॉम्बस्फोट घडत होते. गुजरातची क्रूर दंगल घडली. त्याला राज्यकर्ते जबाबदार ठरलेच नाहीत. कसाब मुंबईत आलाच कसा? पोलिस यंत्रणेचे अपयश आहे म्हणून बिचाऱ्या आर. आर. आबाला तासगावला घरी पाठविण्यात आले. जबाबदारी कोणीतरी घेतली पाहिजेच. मात्र, रेल्वे कोणी जाळली हे समजले नाही. तरी ही बदला घेण्यासाठी तीन हजार निरपराध माणसं वस्त्या-वस्त्यांमध्ये कापून काढली आणि अनेक महिलांवर बलात्कार करण्यात आले. त्यांना कोणी जबाबदार नव्हते. तो एक अंधारात दिसणारा एक प्रकाश-जयप्रकाश होता का, याचे उत्तर आजही कोणी देत नाही.

अंधार फार झाला, पणती जपून ठेवा ! आता संपूर्ण क्रांतीचा एक जयप्रकाश हवा, असे कोणाला वाटत नाही. कारण बहुसंख्यांक-अल्पसंख्यांक ही व्होट बँकेची राजनीती एवढी यशस्वी ठरली की, त्याआधारे काहीही केले तरी चालते, असा गैरसमज निर्माण झाला. त्यानिमित्त  अंधार तयार करण्याच्या प्रतिक्रांतीतून भारत जातो आहे. अदानी ग्रुपने जी श्रीमंती मिळविली, त्याचा पर्दाफाश झाला आहे. शेअर बाजारातील व्यवहारांचा वापर करुन आपल्याकडे अमाप संपत्ती असल्याचे दाखवून राष्ट्रीयीकृत बँका आणि भारतीय आयुर्विमा महामंडळासारख्या (एलआयसी) वित्तीय संस्थांकडील सामान्य माणसांचा पैसा वापरला आहे. सामान्य माणसाला घरबांधणी असो की विहीर खोदणे असो, बँका दारात उभ्या करुन घेत नाहीत. राष्ट्रीयीकृत बँकांचा अनुभव तर फारच वाईट येतो. असे असताना अदानी ग्रुपला हा पैसा कसा सहजासहजी उपलब्ध करुन देण्यात आला. ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय स्टेट बँकेची शाखा आहे. त्या शाखेने देखील सहा हजार कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. एलआयसीने आपल्याकडील सोळा हजार कोटी रुपयांची पुंजी अदानी ग्रुपमध्ये गुंतविली आहे. हे सारे सहजासहजी किंवा अदानी ग्रुपच्या देदीप्यमान कामगिरीमुळे शक्य झाले का? भारतीय अर्थव्यवस्थेला धक्का देणारे कृत्य घडले असतानाही, देश अंधाराकडे वाटचाल करतो आहे, असे भाजपवाल्यांना वाटत नाही? जॉर्ज फर्नांडिस बॉम्बस्फोटाच्या तयारीत असताना सापडतो आणि तो कधी देशद्रोही ठरत नाही. उत्तरप्रदेशातील हाथरसमध्ये एका दलित मुलीवर बलात्कार होतो. त्यात ती मरण पावते. पोलिस तिचा मृतदेह घेऊन येतात आणि नातेवाईकांना न दाखविता त्यांना घरात कोंडून ठेवून अंधाऱ्या रात्री काट्याकुट्या गोळा करुन त्यात तिला जाळून टाकतात. या घटनेचा वृत्तांत लिहिण्यासाठी केरळमधील एका वेबपोर्टलचा पत्रकार सिद्दीक कप्पन हाथरसला जाण्याच्या मार्गावर असतो. उत्तरप्रदेशचे पोलिस त्यास अटक करतात. ईडी त्यास ताब्यात घेते. जातीय दंगे भडकाविण्याचा प्रयत्न केला म्हणून देशद्रोहाच्या आरोपाखाली त्याला तुरुंगात टाकले जाते. सलग अठ्ठावीस महिने तो तुरुंगात राहिला. परवा त्याची न्यायालयाने सुटका केली. आणीबाणीपूर्व अराजकता निर्माण करणाऱ्यांना स्वातंत्र्यसेनानींचा दर्जा देऊन मानधन सुरू करण्यात येते. त्या परिस्थितीला अराजकता याच्यासाठीच म्हणायचे कारण राजकीय लढाई लढताना पोलिस आणि लष्कराला बंड करण्याचे आवाहन करण्यात आले होते. पत्रकाराने वार्तांकन करण्यापूर्वीच त्याला देशद्रोही कसे ठरविण्यात आले?

भारतीय रिझर्व्ह बँक आता जागी झाली आहे. कोणकोणत्या बँकांनी अदानी ग्रुपला किती कर्जपुरवठा केला आहे, याची माहिती द्यावी, असे सांगितले आहे. सर्व बँकांनी दिलेली माहिती जाहीर करावी लागते, असा नियम नाही. देशहितासाठी ही माहिती राखून ठेवण्याचा अधिकार भारतीय रिझर्व्ह बँकेला आहे. एका व्यावसायिकाने घेतलेल्या कर्जाची माहिती लपवून देशहीत कसे साधले जाणार आहे कोण जाणे? बोफोर्स खटल्याचा वृत्तांत पानोपानी भरुन येत होता. बाबरी मशीद पाडतानाच्या उन्मादाची छायाचित्रे पान-पानभर छापली जात होती. गुजरात दंगलीत सरकार निक्कम्यासारखे बसले होते. त्याला जबाबदार धरुन लोकशाहीचा चौथा खांब आरडाओरडा करीत नव्हता. आता तर अघोषित आणीबाणीसारखी परिस्थिती आहे. कोणी बोलणार नाही. काँग्रेसवालेही बोलणार नाहीत. समाजवादी स्वकर्तृत्वाने संपून गेले. ईडी, सीबीआय आदी तपास यंत्रणा वेचून शोध घेतात. त्याची भीती आहे. माध्यमे घाबरलेली आहेत.

असा नवा भारत निर्माण करण्यात आलेला आहे. परिणाम दीनका. देखील बदलली आहे. भारत वर्षात कधी रात्र होतच नाही. अंधार होतच नाही, तेव्हा पणती जपून ठेवण्याची गरज निर्माण झालेली नाही. महाराष्ट्रातील सत्तांतर कसे झाले, का झाले, कोणी केले? या प्रश्नांची उत्तरे मिळणार नाहीत? सामान्य जनतेला या प्रश्नांची उत्तरे माहीत नाहीत, असा जर समज असेल, तर जनता पक्षांच्या कडबोळ्या सरकारमुळे देशाचे वाटोळे होण्याच्या मार्गावर आपण चालत आहोत, याची जाणीव तेव्हा पन्नास टक्केदेखील साक्षर नसणाऱ्या भारतीय जनतेला झाली होती. श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर मतदारांनी मतपेटीद्वारे दिलेले उत्तर भावनिक नव्हते. ते भावनिक समजण्याची चूक करू नये. ती फुटीरतावादी शक्तींना दिलेली चपराक होती. त्यातून समजले की, स्वातंत्र्यलढ्यातून जन्माला आलेली राष्ट्रवादाची प्रेरणा किती मजबूत आहे? ती राष्ट्रप्रेमाची होती. धार्मिक उन्मादाची नव्हती. तिला धार्मिक जोड देण्याचा प्रयत्न वारंवार केला गेला, तो यशस्वी होत नव्हता. तरी अंधार फार झाला, असे ढोल बडविले जात होते. आता अंधाराला अंधार म्हणायचे नाही, असे बजावण्यात आलेले आहे. तरीदेखील म्हटलात तर देशाशी द्रोह केल्याचा आरोप ठेवण्यात येईल.

अंधेरे में एक प्रकाश, जयप्रकाश, जयप्रकाश अशा घोषणा देणारी पिढी तेव्हा तरुण होती, ती आजही जिवंत आहे. त्यावेळचे उजवे-डावे, सत्ताधारी-विरोधक राजकारणी आज नसले, तरी सुशीलकुमार मोदी आहेत, नितीशकुमार आहेत, अंबिका सोनी आहेत, शरद पवार, मल्लिकार्जुन खरगे, अशोक गेहलोत, दिग्विजय सिंग, पी. चिदंबरम्, कपिल सिब्बल, डॉ. मुरली मनोहर जोशी, सुब्रम्हण्यम स्वामी, डी. राजा, एम. के. स्टॅलिन, ममता बॅनर्जी, एच. डी. देवेगौडा आदी कितीतरी नावे घेता येतील. त्यांनी हा सारा प्रवास पाहिला आहे. आता समोर अंधार दिसत असतानाही स्वच्छ प्रकाशच पडला आहे, असे जर भीतीपोटी म्हणत राहिलो, तर संपूर्ण अंधार कधी झाला समजणार नाही. शेजारचा पाकिस्तान आणि श्रीलंका पाहतो आहोत. इंडोनेशियामध्ये चारजण जेवायला गेले, तर चार लाख रुपये बिल होते. जेवणावळीवर लाखो रुपये उधळल्याचा आनंद घेता येईल. इतकी वाईट परिस्थिती त्यांच्या चलनाची झाली आहे. श्रीलंकेत सातशे रुपये किलो तांदूळ आहे. आपण ऐंशी कोटी जनतेला फुकट अन्नधान्य देण्याची मतासाठी घोषणा करतो. ही ताकद कोणी दिली?, तोट्यात चालणारी शेती करणाऱ्यांनी दिली आहे. त्यांना विसरुन अदानी ग्रुपला जवळ करणार असाल, तर जयप्रकाश कधीच भेटणार नाहीत.

टॅग्स :Gautam Adaniगौतम अदानी