नंदकिशोर पाटील, संपादक, छत्रपती संभाजीनगर
मुंबईतील मुलांचे ओलीस नाट्य ही फक्त गुन्हेगारी घटना नसून, आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब आहे. रोहित आर्या नावाचा तरुण ‘वेब सिरीज’च्या ऑडिशनच्या बहाण्याने स्टुडिओत लहान मुलांना बोलावतो, ओलीस ठेवतो आणि सरकारकडून पैसे वसूल करण्याचा प्रयत्न करतो. अखेर ‘एन्काउंटर’मध्ये त्याचा शेवट होतो. ‘अ थर्सडे’ या चित्रपटाशी साधर्म्य असलेला हा सगळा प्रकार ‘रील’ आणि ‘रिअल’ लाइफमधील सीमारेषा किती धूसर झालेली आहे, याचे चित्र समोर आणणारा आहे. वास्तव आणि कल्पित यांची गल्लत किती जीवघेणी ठरू शकते, त्याचे हे ताजे उदाहरण.
१७७४ ची घटना. योहान वुल्फगांग फॉन गोथे या जर्मन लेखकाच्या ‘द सॉरोज ऑफ यंग व्हेर्थर’ या कादंबरीनं संपूर्ण युरोपात गदारोळ माजला. या कादंबरीमुळे फ्रान्स, इटली, डेन्मार्क यासह इतर अनेक युरोपीय देशांमध्ये तरुणांच्या आत्महत्येची लाट उसळली ! शेवटी त्यावर बंदी आणली गेली. कादंबरीचे कथानक असं की, व्हेर्थर नावाचा एक तरुण लोटे नावाच्या एका तरुणीवर एकतर्फी प्रेम करत असतो. ती दुसऱ्याशी लग्न करते आणि व्हेर्थर नैराश्येतून आत्महत्या करतो. एका अपूर्ण प्रेमकथेवर आधारित ही कादंबरी वाचून युरोपातील तरुणांवर इतका नकारात्मक प्रभाव पडला की, शेकडो तरुणांनी कादंबरीच्या नायकाप्रमाणे जीवनयात्रा संपवली ! या घटनांमुळे पुढे मानसशास्त्रात ‘व्हेर्थर इफेक्ट’ असा शब्द रूढ झाला. म्हणजेच, साहित्यात, चित्रपटात अथवा माध्यमांत सातत्याने जे दाखवले जाते, त्याचा समाजमनावर परिणाम होतो. आपल्याकडेही कमल हासनच्या ‘एक दुजे के लिए’ सिनेमामुळे प्रेमीयुगुलांच्या आत्महत्येचे सत्र सुरू झाले होते.
हल्लीचा जमाना कथा-कादंबरी अथवा चित्रपटांचा नसून वेब सिरीज आणि सोशल मीडियासारख्या डिजिटल माध्यमांचा आहे. या माध्यमांत दाखवलेली हिंसा, व्यसन आणि वापरलेली असभ्य भाषा या सगळ्यांचा नव्या पिढीवर विपरित प्रभाव पडतो आहे. ‘मिर्झापूर’, ‘सेक्रेड गेम्स’ यासारख्या वेब सिरीजमधील हिंसक दृश्यांची नक्कल करत काही युवकांनी गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे. उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये एका १३ वर्षीय मुलाचा अचानक मृत्यू झाला. डॉक्टरांनी याला ‘सडन गेमर डेथ’ असे म्हटले आहे. अनेक तरुणांनी ‘व्हायरल’ होण्याच्या हव्यासात प्राण गमावले आहेत.
‘लाईक्स’ आणि ‘फॉलोअर्स’च्या नशेने आजचा तरुण वास्तवापासून तुटत चालला आहे. दिवसाला १०० पेक्षा जास्त रील्स पाहून काहीच हाती लागत नाही, पण त्यातून निर्माण होणारा ‘डोपामिनचा जाळ’ मेंदूला सतत पुढचं आकर्षक दृश्य पाहण्यासाठी हुरहूर लावतो आणि याच सवयीमुळे तरुणांच्या विचारक्षमतेवर, एकाग्रतेवर आणि मानसिक संतुलनावर गंभीर परिणाम होतो.
...या जाळ्यातून सुटका कशी?
‘डिजिटल उपवास’ आवश्यक आहे. दिवसातून किमान एक तास मोबाईलपासून दूर राहा. स्वतःबरोबर वेळ घालवा.
आपण काय पाहतो, तेच आपलं
विचारविश्व घडवतं. म्हणून सकारात्मक आणि अर्थपूर्ण कंटेंटकडे वळा. पालकांनी मुलांना ‘व्हायरल’पेक्षा ‘विचारशील’ होणं शिकवावं. शाळा-कॉलेजांत ‘डिजिटल साक्षरता’ हा विषय हवा.
वेदना ‘कंटेंट’ बनतात, परंतु माणुसकी हरवते...
मानसशास्त्रज्ञ सांगतात की, सतत बदलणाऱ्या दृश्यांमुळे मेंदूचा ‘फोकस’ हरवतो. काही सेकंदांनी बदलणाऱ्या फ्रेम्समुळे विचारांची सलगता तुटते; संयम आणि तर्कशक्ती मंदावते. सोशल मीडियावर दिसणाऱ्या ‘परफेक्ट लाईफ’च्या चित्रांमुळे लोक स्वतःच्या वास्तवाकडे न्यूनतेने पाहू लागतात. त्यामुळे नैराश्य, असुरक्षितता आणि स्वतःबद्दल तिरस्कार अशी मानसिक समस्या वाढू लागली आहे. या डिजिटली ॲक्टिव्हनेस आणि ‘रील संस्कृती’ने सामाजिक मूल्यव्यवस्थेलाही तडा दिला आहे. प्रत्येक प्रसंग ‘कॅमेरा’त टिपण्याची सवय संवेदनांना बोथट करत जाते. एखादा अपघात, अन्याय किंवा वेदना पाहिली तरी मदत करण्याऐवजी लोक मोबाईल उघडतात. समाजाच्या वेदना ‘कंटेंट’ बनतात, परंतु माणुसकी हरवते. म्हणूनच, ‘व्हायरल’पेक्षा ‘विचारशील’ होणं आवश्यक आहे.
पुढच्या पिढीच्या भवितव्याचे काय?
सोशल मीडिया आणि वेब सिरीजने संवाद, करमणूक आणि माहिती मिळवणे जरी सुलभ केले असले तरी, त्या अत्यंत वैचारिक, मानसिक आणि सामाजिक जबाबदारीने वापरणे आवश्यक आहे. आता युरोपासह अनेक देशांमध्ये या माध्यमांवर काही निर्बंध येऊ घातले आहेत. नेदरलँड, डेन्मार्क आणि इटलीसारख्या देशांनी बालमनावर अनिष्ट प्रभाव पडेल अशा ‘कंटेन्ट’वर सेन्सॉरशिप आणली आहे. त्यावर तिथेही गदारोळ उठला आहेच. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) हे तर त्या पुढचे पाऊल ! मेंदूला अधिक ताण न देता सगळ्या प्रश्नांची सहजासहजी उत्तरं शोधणारे ‘टूल’ हाती असेल तर पुढच्या पिढीच्या बौद्धिक भवितव्याचे काय? हा प्रश्न संपूर्ण जगाला सतावत आहे.
३ ते ४ तास भारतीय युवक दिवसाला सोशल मीडियावर घालवतो. ९० ते १२० सरासरी रील्स आपण दररोज पाहतो. २० तासांपेक्षा जास्त वेळ आठवड्याला स्क्रीनसमोर असतो.
Web Summary : Mumbai's hostage drama exposes the blurred lines between reel and real life, fueled by social media's impact on youth. The pursuit of likes and viral content leads to mental health issues and a decline in empathy, demanding digital literacy and mindful content consumption.
Web Summary : मुंबई का बंधक नाटक रील और वास्तविक जीवन के बीच धुंधली रेखाओं को उजागर करता है, जो सोशल मीडिया के युवाओं पर प्रभाव से प्रेरित है। लाइक्स और वायरल कंटेंट की खोज मानसिक स्वास्थ्य के मुद्दों और सहानुभूति में गिरावट की ओर ले जाती है, जिसके लिए डिजिटल साक्षरता और विचारशील कंटेंट की खपत की आवश्यकता होती है।