शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
5
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
6
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
7
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
8
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
9
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
10
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
11
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
12
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
13
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
14
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
15
जीएसटी कपातीचा फायदा संपत चालला...! एमजीने पहिली घोषणा केली, जानेवारीपासून कारच्या किंमतीत होणार मोठी वाढ
16
जर्मनी दौऱ्यात राहुल गांधींना Rolls-Royce ची भुरळ; भारतात 'ही' लक्झरी कार कितीला मिळते?
17
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
18
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा
19
"उंच भरारी, पण पाय जमिनीवर!" आजारी असताना एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी केली मदत; अमृता खानविलकर भारावली
20
'३ इडियट्स'च्या सीक्वलचे शीर्षक असेल '४ इडियट्स'! आमिर खानच्या सिनेमासाठी निर्माते चौथ्या अभिनेत्याच्या शोधात
Daily Top 2Weekly Top 5

हा औचित्यभंगच!

By admin | Updated: March 2, 2016 02:49 IST

घटनात्मक नैतिकता पाळायची नाही, असा जणू काही चंगच आपल्या देशातील राजकीय पक्षांनी बांधला आहे काय, हा प्रश्न विचारण्याचे कारण म्हणजे माजी महालेखापाल

घटनात्मक नैतिकता पाळायची नाही, असा जणू काही चंगच आपल्या देशातील राजकीय पक्षांनी बांधला आहे काय, हा प्रश्न विचारण्याचे कारण म्हणजे माजी महालेखापाल विनोद राय यांची सरकारी बँकांसाठी नव्याने स्थापन करण्यात आलेल्या मंडळाच्या अध्यक्षपदी झालेली नेमणूक. भारताच्या राज्यघटनेच्या १४८(१) कलमातील तरतुदीनुसार महालेखापाल या घटनात्मक पदावर काम केलेल्या व्यक्तीची कोणत्याही सरकारी, निमसरकारी वा संलग्न आस्थापनात वा कार्यालयात किंवा मंडळात कोठल्याही पदावर नेमणूक करता येत नाही. परंतु या नव्या मंडळाचे अध्यक्षपद विनावेतन व अर्धवेळ कामाचे व एकप्रकारे ‘मानद पद’ असल्याने राज्यघटनेतील संबंधित तरतुदीचा कोणत्याही प्रकारे भंग झालेला नाही, असा युक्तिवाद सरकार नक्कीच करणार आहे. या तरतुदीचा शब्दश: अर्थ लावला, तर सरकारचा युक्तिवाद योग्य ठरेल. पण राज्यघटनेतील प्रत्येक तरतुदीला त्यातील शब्दांपलीकडे आशय आहे आणि त्याचा संबंध ‘घटनात्मक नैतिकते’शी आहे. ‘ही घटना जितकी उत्तम प्रकारे राबवली जाईल, तितकी ती चांगली ठरेल आणि जर ती योग्य प्रकारे अंमलात आणली गेली नाही, तर ती वाईट असल्याचे मानले जाईल’, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना संमत होण्याआधी घटना समितीसमोर केलेल्या आपल्या अंतिम भाषणात म्हटले होते. त्याचबरोबर ‘ही घटना राबवण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रशासकीय संरचना बदलून नव्याने त्या आखण्यात आल्या, तर राज्यघटनेची चौकट तशीच ठेवूनही ती आतून पोखरता येऊ शकते’, असेही डॉ आंबेडकर यांनी म्हणून ठेवले आहे. बाबासाहेबांच्या या दोन विधानांचा रोख हा ‘घटनात्मक नैतिकते’वर जसा आहे, तसा तो ‘प्रशासकीय औचित्या’वरही आहे. नेमकी हीच ‘घटनात्मक नैतिकता’ व हेच ‘प्रशासकीय औचित्य’ गेल्या काही दशकात सरसहा पायदळी तुडवले जात आले आहे. विनोद राय यांची नेमणूक हे त्याचे ताजे उदाहरण. बंँकिंग क्षेत्रातील सुधारणांचा एक भाग म्हणून अशा मंडळाची स्थापन करावी, ही शिफारस केंद्र सरकारच्या अर्थखात्यातील वित्तसेवा विभागाने केली होती. विनोद राय निवृत्तीपूर्वी या विभागाचे सचिव होते. सचिवपदावरून निवृत्त झाल्यावरच त्यांची महालेखापाल म्हणून नेमणूक झाली होती. हा सारा तपशील राय यांच्या ‘हितसंबंधां’वर प्रकाश टाकत नाही काय? कायद्याच्या कक्षेत राहून करण्यात आलेला हा औचित्यभंग आहे. ‘महालेखापाल’ या घटनात्मक पदाबाबत जेव्हा घटना समितीत चर्चा झाली, तेव्हा डॉ. आंबेडकर यांनी म्हटले होते की, ‘लोकशाही राज्यव्यवस्थेतील राज्यकारभाराच्या दृष्टीने हे पद न्याययंत्रणेपेक्षाही महत्वाचे मानले गेले पाहिजे. सरकारी योजना व कार्यक्र म यांच्यासाठी जी आर्थिक तरतूद केली जाईल, ती योग्यरीत्या खर्च होते की नाही, याचा आढावा घेण्याला लोकशाही राज्यकारभारात अनन्यसाधारण असे महत्व आहे’. लोकशाहीत जनहिताच्या कारभारात कार्यक्रम व योजना यांच्या अंमलबजावणीसाठी जो पैसा कराच्या रूपाने सरकार गोळा करते, त्याचा विनियोग उचितरीत्या होणे अत्यंत आवश्यक आहे, असा बाबासाहेबांच्या या उद्गारांचा मतितार्थ होता. अशा अत्यंत महत्वाच्या पदावरील व्यक्तीला कोणतेही आमिष दाखवले जाऊ नये किंवा तिच्यावर कोणत्याही प्रकारचे दडपण येऊ नये, याच हेतूने महालेखापल या पदाला ‘घटनात्मक’ दर्जा देण्यात आला. परंतु ‘प्रशासकीय औचित्या’चा मुद्दाच आता राज्यकारभारात उरलेला नाही, हेच राय यांची नेमणूक दर्शवते. याच राय यांना यंदाच्या प्रजासत्ताकदिनी पद्म पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. शिवाय त्यांची महालेखापाल म्हणूनची कारकीर्ददेखील वादग्रस्तच ठरली होती. वस्तुत: महालेखापालाने पडद्याआड राहून प्रसिद्धीच्या झोतात न येता राज्यकारभारावर अंकुश ठेवण्याचे आपले काम पार पाडावे, अशीच घटनाकारांची अपेक्षा होती. पण ‘भ्रष्टाचारा’च्या मुद्याभोवती सत्तेसाठीचे साठमारीचे राजकारण फिरू लागल्यावर ‘महालेखापाल’ पदाला ‘महत्व’ येत गेले. ‘टू-जी’, ‘कोळसा’ या घोटाळ्यातील महालेखापालांचे अहवाल हे सत्तेच्या राजकारणातील हत्त्यार बनले. हे अहवाल राय यांनीच दिले होते,व त्याचा भाजपाला फायदा झाला होता. त्यामुळेच त्यांना पद्म पुरस्कार व बँकविषयक मंडळाचे अध्यक्षपद ही बक्षिसी, असा आरोप आता होत आहे. आजचे अर्थमंत्री अरूण जेटली यांनी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते असताना महालेखापाल पद भूषविलेल्या व्यक्तीला सरकारने कोणत्याही कामासाठी नेमू नये, असा आग्रह सभागृहात धरला होता. पण तो ‘बोलाचाच भात...’ होता, हेही तेवढेच खरे. समाजजीवनात आणि साहजिकच राजकारणातही, मूल्यांची इतकी घसरण होत असताना, ‘घटनात्मक नैतिकते’चा आग्रह अनाठायी नाही का, हा प्रश्न आता विचारला जाणे अपरिहार्य ठरू लागणार असेच म्हणायला हवे!