अखेर सिडनीच्या मैदानात मावळत्या सूर्याच्या साक्षीने मायकेल क्लार्कच्या कांगारूंनी महेंद्रसिंग धोनीचा अश्वमेध रोखलाच. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी झालेल्या या उपान्त्य फेरीच्या लढतीकडे डोळे लावून बसलेल्या करोडो भारतीय पाठिराख्यांचा पुरता अपेक्षाभंग झाला. सिडनीत कांगारूंना नमवून भारतीय संघ विश्वचषकावर सलग दुसऱ्यांदा दावा सांगण्यासाठी ब्रॅण्डन मॅकल्लमच्या किवी संघापुढे रविवारी मेलबर्नच्या विशाल मैदानात उभा ठाकेल, ही भारतीय चाहत्यांची आशा जणू वेडी होती, अशा थाटात आॅस्ट्रेलियाने दणदणीत विजय संपादन केला. त्या बरोबरच अंतिम सामन्यात न्यूझीलंड आणि आॅस्ट्रेलिया हे दोन्ही एकाच खंडातील यजमान परस्परांना भिडतील, हे वास्तवही अधोरेखित केले. दर चार वर्षांनी भरणाऱ्या क्रिकेट विश्वचषकाच्या सोहळ्याला चार दशकांच्या वाटचालीनंतर एव्हाना चांगलीच भव्यता प्राप्त झाली आहे. त्याकडे डोळ्यांची निरांजने करून बघणाऱ्यांची संख्या अफाट वाढली आहे. चाहत्यांचे व्यक्त होणे प्रेक्षणीय होत गेले आहे. या पार्श्वभूमीवर यंदा आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये भरविल्या गेलेल्या विश्वचषक स्पर्धेचा ज्वर भारतात वाढत गेला नसता तरच नवल ! वन डे क्रिकेटमधून निवृत्त होणाऱ्या सचिन तेंडुलकरला मानवंदना म्हणून धोनीच्या तरुण संघाने सचिनच्या हाती विश्वचषक ठेवण्याची किमया चार वर्षांपूर्वी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर करून दाखविली होती. योगायोग असा की भारतीय यंगिस्तानींचे सेनापतीपद दीर्घकाळ यशस्वीरीत्या सांभाळलेल्या धोनी उपाख्य ‘माही’ने यंदाच्या विश्वचषक महासंग्रामाच्या उंबरठ्यावर आॅस्ट्रेलियातच कसोटी क्रिकेटमधून अकस्मात निवृत्ती जाहीर करून टाकली. या निर्णयाचा भारतीय पाठिराख्यांनी वेगळा अर्थ काढला. तो असा, की यंदाही म्हणजे लागोपाठ दुसऱ्यांदा वर्ल्डकप जिंकण्याच्या मिशनवर त्याने सारे लक्ष केंद्रित केले आहे. धनुर्धारी पार्थाला जसा फक्त पोपटाचा डोळा दिसत होता, तशीच लक्ष्यवेधी नजर धोनीने विश्वचषकावर केंद्रित केली असावी, या अन्वयार्थाने क्रिकेटवेडे भारतीय सुखावले होते. व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर विश्वचषक स्पर्धेचे पहिले रणशिंग फुंकले गेले आणि कोट्यवधी भारतीयांची आशा नव्याने प्रज्ज्वलित झाली. हा नक्कीच आणखी एक ‘मोका’ आहे, असं कोट्यवधी भारतीयांना गेले चाळीस दिवस मनोमन वाटत राहिले. आशेची ही ज्योत अखंड तेवती ठेवण्याचे काम जाहिरातदार आणि छोट्या पडद्यावरील वाहिन्यांनी चोख बजावले. इतके की भारतातील सर्वसामान्य क्रिकेटशौकिनही ‘वुई वोन्ट गिव्ह इट बॅक’ असे मनोमन ठणकावून सांगू लागले. तशातच सहाही साखळी सामन्यांमध्ये प्रतिस्पर्ध्यांचा पूर्ण संघ गारद करीत निर्विवाद यश मिळविणाऱ्या धोनीच्या संघाने उपान्त्यपूर्व सामन्यात बांगलादेशवर मात करून चाहत्यांच्या आशा आणखी पल्लवित केल्या. हा असा माहोल आणि विश्वचषकापूर्वी झालेल्या आॅस्ट्रेलियाच्या दौऱ्यात एकाही सामन्यात कांगारूंवर मात करता न आल्याचे शल्य याच्या पार्श्वभूमीवर गुरुवारचा सामना झाला. भारतभरात सकाळपासून जणू रस्ते थिजले. टीव्ही विक्रीच्या दुकानांबाहेर काचेतून मॅच बघण्यासाठी टाचा उंचावत गर्दी करणाऱ्यांची संख्या वाढत गेली. पण आॅस्ट्रेलियाने ठेवलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना धोनी ब्रिगेडची दमछाक बघताना आधी इंडिया इंडिया असा जल्लोष करणाऱ्या घशांना कोरड पडली. चेहरे मलूल झाले. या क्रिकेटशौकिनांना त्यासाठी हिणवण्याचे कारण नाही. त्यांच्या या समरसतेच्या बळावरच तर क्रिकेटचा अवघा डोलारा उभा आहे. जागतिकीकरणाच्या रेट्यात चाहत्यांच्या क्रिकेटवेडाला नवे आयाम लाभले आहेत. त्याची लख्ख प्रचिती यंदाच्या स्पर्धेने दिली. केवळ आपल्या संघाला प्रत्यक्ष पाठिंबा देण्यासाठी हजारो मैलांवरच्या देशात जाऊन स्टेडियममध्ये हजेरी लावण्याचा जो उत्साह क्रिकेटप्रेमींनी दाखविला, तो अवर्णनीय आहे. केवळ भारतातूनच नव्हे, तर अमेरिका-कॅनडापासून पौर्वात्य देशांमध्ये स्थायिक झालेले भारतीय या निमित्ताने आॅस्ट्रेलियात दाखल झाले. खुद्द आॅस्ट्रेलियात स्थायिक झालेल्या भारतीयांनी तर स्टेडियमला भारतीय निळाईची आणि जल्लोषाच्या आवाजाची प्रचिती दिली. पाठिराख्यांच्या या वेडाने यजमानांच्या अर्थकारणाला चांगलाच हातभार लागला. त्याची संयोजकांनाही पुरेशी जाणीव आहे. म्हणूनच क्रीडा पर्यटनाच्या या नव्या प्रकाराला दोन्ही यजमानांनी भरपूर प्रोत्साहनही दिले. भारतीयांपुरता एकच प्रश्न होता, तो गुरुवारी जिंकण्याचा. कांगारुंच्या विजयाने तो निकालात निघाला. का रे मातलासी, असा सवाल देवालाही करणाऱ्यांच्या जातकुळीतली मधुराभक्ती जोपासणाऱ्या भारतीय पाठिराख्यांना दु:ख होणे स्वाभाविक आहे. त्याचे कढ सोशल मीडियावर दिसू लागले आहेत. त्यात धोनीच्या सहकाऱ्यांपासून विराटच्या मैत्रिणीपर्यंत अनेकजण पुढील काही दिवस भरडले जातील. पण शेवटी जिंकते ते क्रिकेटच हा अनुभव दशांगुळे उरणारच आहे. म्हणूनच तर रविवारनंतर क्रिकेटशौकिनांना वेध लागतील ते इंग्लंडमध्ये भरणाऱ्या पुढल्या विश्वचषकाचे ! तोवर धोनीच्या पराभूत संघाची ‘घरवापसी’ चघळली जाणे अपरिहार्य आहे. तूर्तास दोन्ही यजमानांनी सर्व पाहुण्या संघांना घरी पाठविले आहेच की !
टीम इंडियाची घरवापसी !
By admin | Updated: March 26, 2015 23:26 IST