शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विवेक हरविल्याचीच लक्षणे...

By किरण अग्रवाल | Updated: December 30, 2021 17:51 IST

Editors view : महापुरुषांबाबत अवमानकारक वक्तव्य करणे ही तशी विकृत मानसिकताच ठरते.

- किरण अग्रवाल

घटनेने दिलेले अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे परधर्माचा अनादर किंवा राष्ट्रपुरुषांवर चिखलफेक करण्याचा परवाना असल्याचा गैरसमज काहींनी करून घेतल्याचे दिसते, त्यातूनच बेतालपणे बरळण्याचे प्रकार वाढले असून, फुकट प्रसिद्धीचा सोस यामागे असल्याचे दिसून येते. रायपूरच्या एका कार्यक्रमात तथाकथित कालीचरण बाबाने महात्मा गांधींबद्दल जे अनुद्गार काढलेत त्याकडेही याचसंदर्भाने बघता यावे. असे प्रकार समाज मान्यतांना धक्का देणारे व भावना दुखावणारे तर आहेतच, शिवाय राष्ट्रद्रोह घडविणारेही असल्याने अशांवर केवळ गुन्हे दाखल करून न थांबता ते फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून त्यांना अद्दल घडेल अशी कारवाई होणे गरजेचे आहे.

 

राष्ट्रपुरुष मग ते कोणीही असोत, कोणत्याही जाती-धर्माचे वा वर्ग विशेषाचे नसतात; समस्त राष्ट्रासाठी ते आदर्श व प्रेरणादायी असतात. त्यामुळे अशा महापुरुषांबाबत अवमानकारक वक्तव्य करणे ही तशी विकृत मानसिकताच ठरते. सन्मानजनक बोलायचे तर त्यासाठी विचार करावा लागतो, संबंधिताचे चरित्र ज्ञात असावे लागते किंवा अभ्यासावे तरी लागते; परंतु विचाराने बोलण्याऐवजी स्वतःच्या प्रचारासाठी जेव्हा कोणी बरळून गेल्याचे पहावयास मिळते तेव्हा अशांची कीव आल्याखेरीज रहात नाही. त्यांना महापुरुषाची थोरवी माहीत नसते अशातला भाग नसतो, परंतु स्वतःला प्रसिद्धीच्या झोतात आणण्यासाठी महनीय व्यक्तीवर चिखलफेकीचा मार्ग त्यांना सोयीचा व सोपा वाटतो, त्यामुळेच अशांच्या तोंडाला वेसण कशी घालता येईल याचा विचार होणे गरजेचे बनले आहे.

 

अकोल्याच्या कुणी कालीचरण बाबाने नुकतेच रायपुरातील एका धर्मसंसदेच्या व्यासपीठावरून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अनुद्गार काढल्याने धर्म प्रांतातील बुवा बाबांच्या राजकीय लालसांचा विषय चर्चेत येऊन जाणे स्वाभाविक ठरले आहे. मुद्दाम येथे राजकीय लालसेचा संदर्भ घेतला कारण त्याखेरीज असा उद्दामपणा घडून येणे शक्य नाही. आपल्या पाठीशी कोणी तरी असल्याचा किंवा उभे राहण्याचा विश्वास असल्याखेरीज अशी मजल गाठली जात नाही. हरिद्वारमध्ये झालेल्या एका कथित धर्मसंसदेतही कुणाकडून धार्मिक विद्वेषाची भाषा केली गेली म्हणे. तेव्हा कालीचरण असो की अन्य कुणी, अशांचा उद्दामपणा रोखणे ही शासनाची व समाजाचीही जबाबदारी आहे; कारण केवळ उद्दामपणाच नव्हे तर राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा मलीन करण्याचा व सर्वधर्मसमभावाच्या तत्वालाच नख लावण्याचा राष्ट्रद्रोह ज्यावेळी घडून येतो तेव्हा अशांना कायद्याच्या चौकटीतुन आवर घालणे गरजेचे बनते

 

दुर्दैव असे, की राष्ट्रपुरुषांचा अवमान करणार्यांना समाजात बहुमान लाभताना दिसतो. कुणी ऊक्तीने तर कुणी कृतीने अधर्म करताना दिसतो. कायदा आपले काम करतो, परंतु संबंधितांना त्याचे भय वाटत नाही. धर्माच्या शाली पांघरून समाजाच्या आस्था आणि श्रद्धांशी खेळणाऱ्या काही बाबांना गंभीर गुन्ह्यांच्या आरोपामुळे गजाआड होतानाही आपण पाहतो आहोत, पण तरीही अंधभक्तांच्या त्यांच्यावरील श्रद्धा दूर होत नाहीत हे आश्चर्याचेच म्हणायला हवे. बाबा गजाआड असतांना त्यांचे भक्त अजूनही मिरवणुका काढतात व त्यांनी वापरलेल्या खडावांवर डोके ठेवताना दिसतात, इतक्या आपल्या श्रद्धा अविवेकी आहेत का? भोंदू व भामट्यांची चिकित्सा करण्याचा विवेकच आपण हरवून बसलोय की काय असा प्रश्न यातून पडावा. ही एक प्रकारची अंधश्रद्धाच म्हणावयास हवी. तेव्हा समाजातील सौहार्दाचे संबंध बिघडविण्यास कारणीभूत ठरणाऱ्या घटकांपासून अंधश्रद्धीयांना दूर ठेवण्यासाठी सुजाण व सदविवेकी नागरिकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.