शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

स्वामी : भाजपाचे अनियंत्रित क्षेपणास्त्र

By admin | Updated: June 25, 2016 02:38 IST

स्फोटक विधाने आणि बेलगाम आरोप ही भारतीय राजकारणातली सुब्रह्मण्यम स्वामी यांची विशेष ख्याती. भाजपाची खासदारकी मिळवल्यावर एक अनियंत्रित क्षेपणास्त्र अशी आता त्यांची नवी ओळख आहे

सुरेश भटेवरा, (राजकीय संपादक, लोकमत)स्फोटक विधाने आणि बेलगाम आरोप ही भारतीय राजकारणातली सुब्रह्मण्यम स्वामी यांची विशेष ख्याती. भाजपाची खासदारकी मिळवल्यावर एक अनियंत्रित क्षेपणास्त्र अशी आता त्यांची नवी ओळख आहे. पण त्यांचे खरे टार्गेट अर्थमंत्री अरूण जेटली आहेत व जेटली विरोधकांचे बळ त्यांच्या पाठीशी आहे. स्वामी आणि अरूण जेटली यांचे पूर्वीपासूनच संबंध चांगले नाहीत. २0१४ च्या लोकसभा निवडणुकीत स्वामींना जेटलींच्या विरोधामुळे दिल्लीतून भाजपाची उमेदवारी मिळू शकली नाही. मोदी सरकारमध्ये अर्थ खात्याचे कॅबिनेट मंत्रिपद मिळेल अशी त्यांना आशा होती. जेटलींच्या विरोधामुळे हा प्रयोगही फसला. तेव्हापासून स्वामींनी एकीकडे पंतप्रधान मोदींची तारीफ तर दुसरीकडे जेटलींच्या अर्थ मंत्रालयावर लागोपाठ हल्ले असे सत्र सुरू केले. पण जेटलींच्या इच्छेविरूध्द राज्यसभेचे सदस्यत्व मिळवण्यात अखेर स्वामी यशस्वी ठरले तेव्हा भाजपाच्या अंतर्गत राजकारणात बदलत्या समीकरणांची चर्चा सुरू झाली. संसदेत सोनिया गांधींवर थेट आरोप करण्यासाठी स्वामींचा वापर होईल, या हेतूने त्यांना राज्यसभेचे सदस्यत्व मोदींनी बहाल केले. तथापि ७६ वर्षांचे स्वामी दुधारी शस्त्रासारखे आहेत. दररोज नवा शत्रू बनवणे हा त्यांचा जुना छंद आहे. त्यांच्या उपद्व्यापी कृत्यांना मोदी सरकारने वेळीच लगाम घातला नाही तर विरोधकांपेक्षाही अधिक तीव्रतेने हे शस्त्र सरकारचा घात करील, या शक्यतेचे पुरेसे पुरावे स्वामींच्या अलीकडच्या हल्ल्यातून स्पष्ट झाले आहेत. भूतकाळातले दाखले द्यायचे तर स्वामी ज्या ज्या पक्षांबरोबर होते, त्या तमाम पक्षांना त्यांनी पुरेपूर खड्ड्यात घातले. उदाहरणेच द्यायची तर १९७७ साली स्वामी मुंबईतून जनता पक्षाचे खासदार होते. अवघ्या २८ महिन्यात हा पक्ष सत्तेतून पायउतार झाला. नांगरधारी शेतकरी हे या पक्षाचे निशाण हाती घेतलेले ते एकटेच भारतात उरले. १९९९ साली वाजपेयींचे सरकार अवघ्या एक मताने सत्तेतून गेले. सरकार पाडण्यासाठी जयललिता आणि सोनियांची भेट घडवणारे मुख्य मध्यस्थ तेच होते. त्यापूर्वी जयललितांवरही स्वामींनी बऱ्याच आरोपांचे कुभांड रचले होते. चंद्रशेखर सरकारमध्ये स्वामींना आयुष्यात प्रथमच केंद्रीय मंत्रिपद मिळाले ते केवळ या सरकारला असलेल्या काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे. अवघे १00 दिवस हे सरकार टिकले. त्यानंतर राज्यसभेत शिरण्यासाठी स्वामींना काँग्रेसचे सहकार्य हवे होते. ते मिळाले नाही म्हणून सोनिया गांधींशी त्यांनी उभा दावा मांडला. काँग्रेसचे त्यामुळे काही बिघडले नाही. राजकीय नेता कसा नसावा, याचे आदर्श उदाहरण म्हणजे सुब्रह्मण्यम स्वामी. विरोधकांवर व्यक्तिगत स्वरूपाचे हल्ले करण्यासाठी सध्या ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग साईटचे माध्यम त्यांनी निवडले आहे. याखेरीज कट्टरपंथी हिंदुत्ववादी असा स्वामींचा नवा अवतार आहे. अयोध्येत राम मंदीर उभारण्याच्या जुन्या मोहिमेचे सध्या ते स्वयंघोषित नेते आहेत. सोशल मीडियावर तासनतास आपल्या विकृतींची भूक भागविणाऱ्या हिंदुत्ववाद्यांना म्हणूनच स्वामी आपले हिरोे वाटतात. स्वामींनी आसारामबापूंच्या समर्थकांचे पाठबळ आपल्याला मिळावे म्हणून अनेक आरोपांचा सामना करणाऱ्या आसारामबापूंचीही यापूर्वी पाठराखण केली आहे. थोडक्यात स्वामी अ‍ॅसेट ऐवजी लायबिलिटी अधिक आहेत.रघुराम राजन यांच्या मुदतवाढीचा विषय संपुष्टात आल्यानंतर स्वामींनी अचानक अरविंद सुब्रह्मण्यम यांच्यावर हल्ला चढवला. रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी सुब्रह्मण्यम यांची अथवा त्यांनी सुचवलेल्या व्यक्तीची नियुक्ती होऊ नये हा बहुदा स्वामींचा त्यामागे हेतू असावा. या पदाच्या स्पर्धेत तूर्त अरूंधती भट्टाचार्याचे नाव पुढे आहे. त्याचे श्रेयही बहुदा स्वामीच घेतील. राजन यांच्या नकारामुळे मोदी सरकारच्या तटबंदीची पहिली वीट ढासळली. नादान की दोस्ती जानका खतरा....! या उक्तीनुसार न जाणो भविष्यात मोदी सरकारला भगदाड पाडण्यातही स्वामींचे अनगाईडेड मिसाईलच कारणीभूत ठरेल.