शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

आटून वाळवंट झालेल्या समुद्राची कहाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2023 07:53 IST

आटून वाळवंट झालेल्या समुद्राकडे एकदा पाहाच.

एखाद्या अरबपतीने आपल्या खिशातून काही हजार कोणाला काढून दिले तर त्याच्या दातृत्वाबद्दल कौतुक वाटण्यापेक्षा ‘समुद्रातले काही थेंब कमी झाल्याने समुद्राला असा काय फरक पडणार आहे?’, अशी हेवामिश्रित प्रतिक्रिया देऊन आपण मोकळे होतो. वाक्यप्रचार, त्यातला अर्थ बाजूला ठेवून समुद्राचाच विचार केला तर काय येईल मनात ? हेच ना की चार थेंब कमी झाल्याने समुद्र कधी आटत नसतो; पण समुद्र खरंच आटत नसतो असं वाटतं तुम्हाला? असं वाटत असेल तर एका आटलेल्या, आटून वाळवंट झालेल्या समुद्राकडे एकदा पाहाच. अरल समुद्र त्याचं नाव.

आज या समुद्राच्या जागी अरलकुम वाळवंट पसरलं आहे. एकेकाळी या समुद्रावरुन समृद्धीचे वारे वाहायचे; मात्र आज येथील समुद्र तळावरुन वाहणारे धूळ आणि विषयुक्त वारे माणसाच्या आरोग्यासाठी घातक बनले आहेत. अरल समुद्राचं आटणं ही केवळ एक पर्यावरणीय घटना नसून पृथ्वीवरील एक पर्यावरणीय अनर्थ आहे. अरल समुद्र हा एक धडा आहे, माणसाने निसर्गाच्या व्यवस्थेत ढवळाढवळ केली तर असे अनर्थ एकदा नाही अनेकदा, सातत्याने होतच राहणार हे शिकवणारा धडा झालाय हा अरल समुद्र.

अरल समुद्र म्हणजे मध्य आशियाचं मुख्य आकर्षण आणि वैभव होतं. कझाकिस्तान आणि उझबेकिस्तान या दोन देशात विस्तारलेला समुद्र म्हणजेच अरल समुद्र. यालाच अरल सरोवर म्हणूनही ओळखलं जायचं. मध्य आशियातील सर्वात मोठा आणि जगातील चौथ्या क्रमांकाचा मोठा खंडांतर्गत समुद्र हीच अरलची ओळख होती. अरलचा ऱ्हास सुरू झाला तो १९६० नंतर. त्या आधी अरल  समुद्रातील पाण्याने ६८,६८० चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापलेलं. उथळ असलेल्या या समुद्राची खोली इतर समुद्राच्या तुलनेने कमी म्हणजे १६ मीटर इतकी. अमूदर्या, सिरदर्या या मुख्य नद्या आणि त्यांच्या उपनद्यांकडून येणारं पाणी पिऊन विशाल झालेला हा समुद्र. १,१०० बेटं असलेला हा समुद्र बेटांचा समुद्र म्हणूनही ओळखला जायचा. या समुद्रातील माशांवर येथील लोकांचं पोट भरायचं. अरल समुद्र म्हणजे मध्य आशियातील मासेमारी उद्योगाचं मुख्य केंद्र. मासेमारी करणाऱ्या बोटींचा ताफा उभा असायचा समुद्रात. मासेमारीच्या जोडीलाच माशांवर प्रक्रिया करणारे उद्योगही जोमात उभे होते; पण अरल आटायला सुरुवात झाली आणि या मासेमारीच्या उद्योग वैभवालाही उतरती कळा लागली.

अरल काही एका दिवसात आटला नाही. ही प्रक्रिया सुरू झाली १९६० नंतर; पण अरल खरंच किती सुकला ते नासाने २०१४ मध्ये काढलेल्या उपग्रह छायाचित्रांवरुन स्पष्ट झालं. १९६० पासून अमूदर्या आणि सिरदर्या या नद्यांच्या पाण्याचा अरलकडे वाहणारा ओघ कमी झाला. याचं कारण कापसाची शेती. तेव्हा सोव्हिएत युनियनने अमूदर्या, सिरदर्या आणि उपनद्यांच्या पाण्याचा प्रवाह शेतीसाठी सिंचनाकडे वळवला. कझाकिस्तान, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि मध्य आशियातील वाळवंट, कुरण आणि फारशी लागवड नसलेल्या फार मोठ्या क्षेत्राचं रुपांतर बागायतीत करण्यासाठी सोव्हिएत युनियनने केलेल्या उपदव्यापाचे भोग अरल समुद्राला भोगावे लागले. अरल समुद्राकडे येणारा पाण्याचा ओघ कमी कमी होत गेला. 

१९८० नंतर तर  अरल समुद्र मागे मागे हटत गेला. ग्रेटर सी आणि लेसर सी असे त्याचे दोन भाग पडले. विसाव्या शतकाच्या अखेरीस तर अरल इतका सुकला की या समुद्राचे दोनाचे तीन भाग झाले. ग्रेटर सीचे पश्चिम आणि पूर्व असे दोन भाग झाले. पाणी आटत गेल्यानं समुद्राच्या पाण्यातला खारटपणा वाढला, खनिज द्रव्यं वाढली. त्यामुळे समुद्रातील मासे कमी कमी होऊ लागले. मासेमारी कमी होत होत बंदच पडली. मासेमारीच्या मोठमोठ्या बोटी अंगावर खेळवणाऱ्या समुद्राच्या लाटा लुप्त झाल्या. मासेमारी करणाऱ्या मोठमोठ्या बोटी आपल्या अंतिम जागी म्हणजे गोदीकडेही जाऊ शकल्या नाहीत. पूर्वी अरल समुद्राच्या आजूबाजूच्या क्षेत्राला आर्थिक समृद्धी दाखवणाऱ्या बोटी आज गंज खात समुद्राच्या तळाशी रुतून बसल्या आहेत. त्यांच्या अंगावरुन पूर्वीचं वैभव तर केव्हाच गळून पडलं आहे. ‘माणसांनो आमच्याकडे पाहून आता तरी जागे व्हा निसर्गाच्या कामात ढवळाढवळ करू नका!’ हेच सांगण्यासाठी या अरलकुम वाळवंटात या बोटी रुतून उभ्या आहेत.

जागतिक बँक आली धावून! 

लेसर सी हा अरल समुद्राचा भाग वाचवण्यासाठी जागतिक बॅंकेने प्रयत्न सुरु केले आहेत. सिरदर्या  नदीवर २००५ मध्ये कोक अरल धरण बांधलं. या धरणामुळे अरल समुद्राच्या उत्तर भागात काही प्रमाणात पाणी वाढलं आहे. तिथली परिसंस्था जीवंत होण्याच्या निदान शक्यता दिसू लागल्या आहेत. त्यामुले समुद्राचं वाळवंट होण्याचं टळलं. अरल समुद्राचा हा उत्तर भाग अरलकुम वाळवंट म्हणून ओळखला जात नाही. 

 

टॅग्स :World Trendingजगातील घडामोडी