हर्ष भटकळ, प्रकाशक - पॉप्युलर
आठवड्यात, बाबा- रामदास भटकळ - वयाच्या नव्वदीत पदार्पण करत असताना, मी त्याच्याबद्दल विचार करतो आहे ते आमच्या कुटुंबाचा कणा असलेली व्यक्ती म्हणून. संपादक, प्रकाशक, लेखक आणि सांस्कृतिक द्रष्टे म्हणून बाबाची सार्वजनिक ओळख सर्वांना आहे; पण आज मी बाबाच्या व्यक्तिमत्त्वाचा अगदी वेगळाच पैलू सांगणार आहे, जो आम्हाला परिचित आहे : एक पिता, पती, आजोबा आणि मित्र.
लहानपणीची बाबाबद्दलची माझी पहिली आठवण ऊटीला घालवलेल्या सुट्टीतली आहे, जेव्हा आम्ही ‘बूम बूम गार्डन’ नावाच्या ठिकाणी धावायचो. मी दोन वर्षांचादेखील नव्हतो, त्यामुळे ही आठवण नक्की खरी आहे की आई-बाबांनी सांगितलेल्या गोष्टी आणि जुन्या छायाचित्रांनी तयार केलेली आहे, याचा मी अजूनही विचार करतो. आणखी एक ठळक आठवण म्हणजे जेव्हा मला पोहायला शिकायचं होतं, तेव्हा बाबाने पोहण्याच्या पद्धती शिकवणारी ढीगभर पुस्तकं घरात आणली होती. दरम्यान, आई - लैला - मला रोज अर्धा तास चालत महात्मा गांधी तलावाकडे नेत असे. फार पुढे कधीतरी जेव्हा बाबाने मला सांगितलं की, मी जन्मलो तो त्यांचा आयुष्यातला सर्वांत आनंदाचा दिवस होता, तो रोमांचित क्षण मला अजूनही आठवतो.
लहानपणी, आई आमची सतत काळजी करणारी व्यक्ती होती, तर बाबा त्याच्या कामात व्यस्त असायचा. त्याचं ब्रीदवाक्य, ‘ऑल वर्क इज प्ले अँड ऑल प्ले इज वर्क’, त्याला ‘उनाडक्या’ (थोडं विचित्रच) करायची मुभा देत होतं. त्याचा हा गुण माझ्यातही पूर्णपणे उतरला आहे.बाबा नेहमीच जीवनाकडे कुतूहलाने आणि शोधक नजरेने पाहत जगत आला. पंचेचाळीसाव्या वर्षी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत शिकणं असो किंवा वयाच्या साठीत पीएच.डी. करणं असो, त्याने जीवन मनमुराद स्वीकारलं. त्याच्या साहसी वृत्तीचा प्रत्यय अगदी साध्या गोष्टींमध्येही येत असे. हॉटेलात जेवायला गेलो की, तो नेहमी मेन्यूमधला सगळ्यात विचित्र पदार्थ चाखण्याचा आग्रह धरायचा. याचा लहानपणी आम्हाला त्रास व्हायचा; पण नंतर लक्षात आलं की, हे त्याच्या नव्या गोष्टी शोधण्याच्या प्रवृत्तीचं प्रतीक होतं.
लहानपणी बाबा कधी ‘मित्र’ नव्हता; पण तो नेहमीच आम्हाला आदराने आणि समानतेने वागवणारा मार्गदर्शक होता. माझा भाऊ सत्यजित आणि मी त्याला नेहमी ‘तू’ असंच म्हणायचो, एरवी वडिलांसाठी वापरलं जाणारं ‘तुम्ही’ हे संबोधन आम्ही कधी वापरलं नाही. ही केवळ भाषेची निवड नव्हती; आमच्या कुटुंबात असलेल्या लिंगसमानतेचा आणि परस्पर आदराचं ते एक प्रतीक होतं. बाबा आणि आई आम्हाला स्वतंत्र विचार करायला नेहमी प्रोत्साहित करायचे. त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं; पण शेवटचा निर्णय आमचाच असायचा. यातून स्वतःचे निर्णय घ्यायला आणि त्याच्या बऱ्यावाईट परिणामांना सामोरं जायला शिकवलं.
आमच्या घरी लिंगसमानता ही फक्त एक कल्पना नव्हती, तर ते आमच्या घरातलं वास्तव होतं. माझ्या आई-वडिलांची कामाची क्षेत्रं वेगवेगळी होती- बाबा प्रकाशन व्यवसायात, तर आई विशेष मुलांच्या शिक्षणक्षेत्रात काम करत होती; पण त्यांनी नेहमी एकमेकांच्या कामाचा आदर केला. हा आदर त्यांच्या पालकत्वातही दिसून येई. पिढीजात व्यवसायाचा वारसदार असूनही बाबाने मला कधीही ‘पॉप्युलर प्रकाशन’मध्ये सामील होण्यास भाग पाडलं गेलं नाही. ‘एमबीए’ केल्यानंतर काही काळ मी कॉर्पोरेट करिअरचा विचार केला; पण शेवटी १९८६ मध्ये कौटुंबिक व्यवसायात सामील झालो. बाबाने माझ्यावर कोणताही दबाव न आणता माझ्या निर्णयाचं स्वागत केलं.
‘पॉप्युलर’मध्ये बाबासोबत पस्तीस वर्षांहून अधिक काळ काम करणं हे एकप्रकारचं शिक्षणच होतं. त्याचा उदार दृष्टिकोन - घरी आणि व्यवसायातही - लक्षणीय आहे. ‘पॉप्युलर प्रकाशना’द्वारे मराठी साहित्य विश्वाला नवे आयाम देतानाही त्याने मला नवीन वाटा शोधायला पूर्ण स्वातंत्र्य दिलं, अगदी इंग्रजी प्रकाशनात लोकप्रिय विषयांमधल्या उत्तम पुस्तकांच्या प्रकाशनांपासून ते डिजिटल, ऑडिओ-व्हिज्युअल प्रकाशनात उतरण्यापर्यंत माझ्या अनेक निर्णयांवर त्याने सदैव विश्वास ठेवला आणि कायम प्रोत्साहन दिलं. सत्यजितच्या ‘द स्पिरीट ऑफ लगान’ या पुस्तकाच्या ‘एनसीपीए’मध्ये झालेल्या प्रकाशन सोहळ्याची आठवण माझ्या मनात अजूनही ताजी आहे. तो एक भव्य कार्यक्रम होता आणि मी व्यासपीठावर असताना बाबा मात्र शांतपणे प्रेक्षकांमध्ये बसला होता- मला प्रकाशझोतात वावरताना पाहून आनंदी आणि समाधानी. कौटुंबिक व्यवसायात फारच कमी पालक दुसऱ्या पिढीला खरोखर सर्वकाही सोपवतात; पण बाबाने माझ्याबाबतीत ते केलं.आताही, ९० व्या वर्षी, बाबाची ऊर्जा विलक्षण आहे. आतापर्यंत दहा पुस्तकं लिहिल्यानंतर अजूनही तो तीन नवीन पुस्तकं लिहितोच आहे. शिकण्याची आणि शिकवण्याची त्याची असमाधानी वृत्ती माझ्यासाठी नेहमीच प्रेरणादायी राहिली आहे.
(लेखक रामदास भटकळ यांचे सुपुत्र आहेत.)