शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

मुक्काम पोस्ट महामुंबई: काेणाची मुलं नशेबाज होण्याची वाट पाहताय?

By अतुल कुलकर्णी | Updated: October 30, 2023 07:21 IST

अंधेरीतील भटारवाडी व्यसनमुक्ती केंद्रात दीडशे तरुण रोज येतात, अशी माहिती समोर आली आहे. हे केवळ एका केंद्राचे आकडे झाले.

अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई

एकट्या मुंबईत गेल्या पाच वर्षांत पाच हजार कोटींचे ड्रग्ज, नवी मुंबईत तीन वर्षांत ४६१ किलो अमली पदार्थ, ठाणे, नवी मुंबई, नालासोपारा, पालघर या भागात मिळून गेल्या दोन वर्षांत ५०० कोटींचा ड्रग्सचा साठा त्या-त्या ठिकाणच्या पोलिसांनी जप्त केला. मात्र पोलिस पोहोचू शकले नाहीत, त्या ठिकाणच्या नशेचा बाजार कल्पनेपलीकडचा आहे. कोणते ड्रग्ज कुठे मिळते? त्या ठिकाणांची नावे सर्रास सगळ्यांना माहिती असतात. नशेचे सामान ऑनलाइन मागविण्यापर्यंत लोकांची मजल गेली आहे. डार्क वेब नेटवर्कच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर नशेचा धंदा केला जातो, हे समोर आले आहे. काहींनी पोस्ट ऑफिसच्या सेवेमार्फत परदेशातून अमली पदार्थ मागविले. इतका सगळा खुला बाजार सुरू असताना, पोलिसांना तो कळत नाही, असे कोणी म्हणत असेल तर तो सगळ्यात मोठा विनोद आहे. मुंबई पोलिसांची तुलना स्कॉटलंड यार्ड पोलिसांची केली जात होती. मुंबई पोलिसांनी अनेक महाकठीण गुन्हे उघडकीस आणले. पोलिस दलात एक से बढकर एक उंचीचे पोलिस अधिकारी होऊन गेले. मात्र पोलिस दलात नव्याने सहभागी होणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना हाच इतिहास किती दिवस सांगायचा..?

‘लोकमत’ने रविवारच्या अंकात ड्रग्ज पुरवठा करणारी केंद्रे कोणकोणत्या भागात आहेत त्याची यादीच छापली आहे. नालासोपारा हा नायजेरियन लोकांच्या गैरकृत्याचा अड्डा बनला आहे. नवी मुंबई पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी तिथे बऱ्यापैकी नियंत्रण आणले. तरीही ज्या गतीने त्या संपूर्ण परिसरात ड्रग्जचा बाजार सुरू आहे, तो पाहिला तर झालेली कारवाई काहीच नाही असे म्हणण्याइतपत भीषण परिस्थिती आहे. 

पोलिसांनी ठरवले तर या सगळ्या ठिकाणांवर दोन दिवसांत धाडी टाकून नशेचा बाजार उद्ध्वस्त करता येईल. मात्र या व्यवहारात खालून वरपर्यंत अनेकांचे हात नशिले झाले आहेत. त्यामुळे हा गोरख धंदा थांबवायचा कोणी आणि कधी? हा प्रश्न केवळ मुंबईकरांना नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला पडला आहे. नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, सोलापूर, सांगली इथपर्यंत अमली पदार्थ बनविण्याचे कारखाने लोकांनी थाटले. राजकीय आणि प्रशासकीय आशीर्वाद असल्याशिवाय एवढ्या बेधडक हे व्यवहार चालूच शकत नाहीत. एकेकाळी मुंबईत दाऊद आणि अरुण गवळी यांचे साम्राज्य होते. या टोळी युद्धात अनेक एन्काउंटर झाले. काही अधिकारी एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून नावारूपाला आले. गुन्हेगारी टोळ्यांनी  काही पोलिस अधिकाऱ्यांना हाताशी धरून आपल्या विरोधी टोळीतल्या लोकांच्या सुपाऱ्या दिल्या. भरदिवसा मुंबईत बिल्डर, व्यापारी, सिनेक्षेत्रातील लोकांचे गोळ्या घालून खून करण्यात आले. त्यातून मोठा पैसाही अनेकांनी गोळा केला. मात्र आता गुन्हेगारीचे स्वरूप बदलले आहे. नशेचा बाजार मोबाइलच्या एका क्लिकवर उपलब्ध आहे. कोण, कुठे, कशी नशेची फॅक्टरी चालवत आहे, याचा कसलाही अंदाज येणार नाही, इतके या धंद्याचे स्वरूप बदलले आहे.

या नशेची लत लागून तरुण पिढी पूर्णपणे बरबादीच्या वाटेवर जाऊ द्यायची की नाही, हे ठरवण्याची वेळ निघून गेल्यात जमा आहे. काही अंधुक आशेचे कवडसे  दिसतात. त्याचा आधार घेऊन वेळीच या जीवघेण्या व्यवहारांवर बंधने आणली नाहीत तर तरुण पिढी पूर्णपणे नशेच्या आहारी गेल्याचे पाहायला मिळेल. कोणाचीही मुलं त्यातून सुटणार नाहीत. मी राजकारणी किंवा आम्ही आयएएस, आयपीएस आहोत. हिंदी इंडस्ट्रीज मी शहेनशाह आहे, मी आघाडीचा सुपरस्टार आहे...आमची मुलं नशा करणार नाहीत किंवा केला तरी त्यांना काही फरक पडणार नाही...असा फुकाचा दावा करणाऱ्यांचीच मुले नशेत वाहवत गेल्याची अनेक उदाहरणे आहेत. मुंबईत रात्री बारा ते पहाटे तीन या वेळात जर डिस्को थेक, पब यामध्ये चक्कर मारली तर हा नशेचा धंदा कोणत्या थराला गेला आहे हे जवळून पाहता येईल. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी किंवा मंत्र्यांनी वेश पालटून अशा ठिकाणी सरप्राइज व्हिजिट केली पाहिजे.

त्यांच्यासमोर त्यांचीच मुलं किंवा त्यांचे मित्र येऊ नयेत म्हणजे मिळवली. आम्ही आणखी किती काळ हे सहन करणार आहोत? कोणाची मुलं नशेच्या दुनियेत स्वतःला हरवून बसण्याची आम्ही वाट पाहत आहोत..?

एखादी इमारत पडली किंवा एखादा पूल पडला तर काही जीव जातील आणि आर्थिक नुकसान होईल. मात्र नशेचा हा धंदा थांबविला नाही तर एक अख्खी पिढी बरबाद होईल. काही देशांमध्ये मुलं जन्माला घालण्यासाठी वेगवेगळ्या सवलती दिल्या जात आहेत. कारण त्यांना त्यांच्या देशाचे भवितव्य अंध:कारमय दिसत आहे. तरुण पिढीच नसेल तर देश आणि देशाचा वारसा पुढे नेणार कोण? हा प्रश्न जगात अशा अनेक देशांना भेडसावत आहे. सुदैवाने भारतात ही परिस्थिती नाही. सगळीच तरुण पिढी नशेच्या दुनियेत मदमस्त झाली, असेही नाही. ही सगळ्यात मोठी आशेची व जमेची बाजू आहे. पण हा मोह भयंकर आहे. सहज गंमत म्हणून मारलेला झुरका आयुष्याचा धूर कधी काढेल कळणारदेखील नाही.

अंधेरीतील भटारवाडी व्यसनमुक्ती केंद्रात दीडशे तरुण रोज येतात, अशी माहिती समोर आली आहे. हे केवळ एका केंद्राचे आकडे झाले. मुंबईसह राज्यभरात अशी अनेक केंद्रे आहेत. राज्यभरात व्यसनमुक्तीसाठी किती तरुण येतात ही आकडेवारी कळाली तर धक्का बसेल, अशी स्थिती आहे. त्याशिवाय जे भीतीपोटी, सामाजिक दडपणाखाली येऊन व्यसनमुक्ती केंद्रात जातच नाहीत. आपल्या मुलाला अमली पदार्थांचे व्यसन लागले आहे, हे सांगायला ज्या आईबापांना लाज वाटते ते आपल्या मुलांना उपचारासाठी नेतच नाहीत. अनेक तरुण आपले व्यसन आई-वडिलांपासून लपवून ठेवतात. व्यसनाला पैसे हवेत म्हणून जन्मदात्या आई-बापाचा खून करण्याच्याही घटना मुंबईत नव्या नाहीत. अशांची संख्या काढली तर आपण कसला समाज घडविण्याच्या गोष्टी करत आहोत, असा प्रश्न पडेल. अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढी बरबाद होण्यापासून वाचवायची असेल तर सरकारला कठोर निर्णय घ्यावे लागतील. नाही तर येणाऱ्या पिढ्या तुम्हाला माफ करणार नाहीत.

टॅग्स :Drugsअमली पदार्थMumbaiमुंबई