शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
3
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
4
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
5
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
6
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
7
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
8
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
9
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
10
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
11
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
12
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
13
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
14
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
15
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
16
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
17
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
18
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
19
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
20
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...

समाजमनच खिन्न झाले...

By admin | Updated: February 16, 2015 23:42 IST

रावसाहेब रामचन्द्र उपाख्य आर.आर. ऊर्फ आबा पाटील यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणातून एक सत्शील व सात्त्विक वृत्तीचे आणि सरळसाध्या मनाचे नेतृत्व हरपले आहे.

रावसाहेब रामचन्द्र उपाख्य आर.आर. ऊर्फ आबा पाटील यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणातून एक सत्शील व सात्त्विक वृत्तीचे आणि सरळसाध्या मनाचे नेतृत्व हरपले आहे. १९८९ मध्ये सांगली जिल्हा परिषदेचे सभासद असताना त्यांच्यात जेवढे साधेपण होते तेवढेच १९९० पासून आतापर्यंत ते आमदार व मंत्री असतानाही त्यांना टिकविता आले आणि दीर्घकाळ राजकारणात राहूनही एखाद्याला अहंकारापासून कसे दूर राहता येते याचा आदर्शच त्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वातून राजकारणासमोर ठेवला. अतिशय प्रतिकूल परिस्थितीला तोंड देऊन जी माणसे आपले आयुष्य घडवितात त्यांच्याच वृत्तीत असे साधेपण कायमचे टिकत असते. तासगाव तालुक्यातील त्यांचे राहते घर व त्यातील त्यांची राहणी ज्यांनी पाहिली त्यांना त्यांच्या आयुष्यातली व व्यक्तिमत्त्वातली ‘गरिबी’ही पाहता आली आहे. आपली ही गरिबी त्यांनी आपल्या सांस्कृतिक वैभवाने दूर केली आणि साऱ्या महाराष्ट्रात एक आदर्श नेता व प्रभावी वक्ता अशी आपली प्रतिमा कायम केली. गांधी ही आबांची पहिली श्रद्धा होती. यशवंतराव व शरदराव यांच्या पावलावर पाऊल टाकून राजकारण करण्यात त्यांची हयात गेली. ते दीर्घकाळ राज्याचे गृहमंत्री होते. काही काळ ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीही राहिले. मात्र एवढे दिवस सत्तेत राहिल्यानंतरही त्यांची प्रतिमा स्वच्छ व बिनडाग राहिली. त्यांना चिकटू शकेल असा कोणताही आरोप त्यांच्या विरोधकांनाही त्यांच्यावर करता आला नाही. आबा हे शांत वृत्तीचे राजकारणी होते. मात्र त्या वृत्तीत एक विलक्षण धाडस दडले होते. गृहमंत्री असताना त्यांनी गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्याचे पालकमंत्रिपद स्वत:कडे घेतले आणि ते नावासाठी राखले नाही. दर महिन्याला ते त्या जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून हजर राहत. त्या जिल्ह्यातील नक्षल्यांच्या बंदोबस्तासाठी त्यांनी केंद्र व राज्य सरकारांतील विविध खात्यांना हलवून जागे केले आणि तब्बल सात हजारांवर सैनिकांना त्या जिल्ह्यात त्यांनी तैनात केले. गडचिरोली जिल्ह्यातील सामान्य माणूस केवळ आबांमुळेच सुरक्षित झाला व आपल्या संरक्षणासाठी सरकार जागे आहे याची जाणीव त्याला झाली. केवळ सुरक्षेवर आबा थांबले नाहीत. गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचा वर्ग अतिशय मागासलेला व दरिद्री आहे. त्यातील अनेकांनी अद्याप रेल्वेगाडीही पाहिली नाही. आबांनी या समाजातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्राचे दर्शन घडविण्याचीच नव्हे तर त्यात राहून ज्ञानार्जन करण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्यांच्या प्रयत्नाने गडचिरोली जिल्ह्यातील शेकडो मुले आज पुण्याच्या व मुंबईच्या शाळांमधून कोणताही खर्च न करता शिक्षण घेऊ शकत आहेत. आबांच्या जाण्याने या शेकडो मुलांवरचे पालकाचे छत्र हरवले आहे. दीर्घकाळ मुंबईत राहूनही आबा त्यांचे तासगावी खेडूतपण विसरले नव्हते. शेतकरी माणसांत दिसतो तो सहजसाधा पण विलक्षण निर्णयक्षम स्वभाव त्यांनी आत्मसात केला होता. तो राखत असताना त्यांनी आपले वाचन व अध्ययन वाढवून आपली भाषणे अद्ययावत संदर्भांनी भरली असतील याची काळजी घेतली. परिणामी अनेक जाहीर सभांत उपस्थित असलेल्या वजनदार वक्त्यांच्या तुलनेत आबांचीच भाषणे अधिक प्रभावी व परिणामकारक होत. दिलेली वेळ पाळणे आणि प्रत्येक कार्यक्रमाला वेळेआधी उपस्थित राहणे हाही त्यांच्या राहणीमानातला विशेष गुण होता. एवढ्या प्रदीर्घ कारकिर्दीत आबांवर एकदाच टीका झाली. मुंबईवर झालेल्या पाकिस्तानी हल्ल्याची एका मोठ्या शहरात घडलेली साधी घटना अशी त्यांनी संभावना केली तेव्हा सारी वृत्तसृष्टी त्यांच्यावर तुटून पडली. त्यातच त्यांना त्यांच्या गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. मात्र त्या घटनेनंतरही त्यांच्याविषयी समाजमनात व वृत्तसृष्टीत असलेला आदर व आत्मीयता यांना कोणताही तडा गेला नाही. लोक पूर्वीसारखेच त्यांच्याविषयी प्रेमाने व जिव्हाळ्याने बोलत राहिले. मृत्यूसमयी आबांचे वय अवघे ५७ वर्षांचे होते. हे वय जाण्याचे नव्हते. त्यांच्याविषयीच्या समाजाच्या अपेक्षा उंचावत जाण्याचे आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर ठेवणारे होते. त्यांना जवळून पाहणाऱ्या व त्यांच्या संबंधात असणाऱ्या कोणालाही आबांचा अंतकाळ एवढा जवळ आहे असे कधी वाटले नाही. मात्र एका तंबाखूच्या व्यसनाने त्यांचा बळी घेतला. आबांना तंबाखू आवडायची आणि त्याविषयीची आपली आवड ते दडवूनही ठेवायचे नाहीत. त्यांच्या तंबाखूची वृत्तपत्रात चर्चा झाली आणि त्यांच्या सहकारी मंत्र्यांनीही त्याविषयी त्यांना वेळोवेळी सांगून पाहिले. मात्र सगळ्या वडीलधाऱ्यांचा सल्ला नम्रपणे ऐकून घेणाऱ्या आबांना तंबाखूविषयीचा त्यांचा सल्ला मनावर घेणे जमले नाही. परिणामी त्यातूनच त्यांना कर्करोगाचा संसर्ग झाला आणि तो वाढत जाऊन त्याने या उमद्या माणसाचा अल्पवयात बळी घेतला. राजकारणातच नव्हे तर साऱ्या आयुष्यात स्वच्छंदपणे पण प्रामाणिकपणे जगणाऱ्या व जगू इच्छिणाऱ्या साऱ्यांनीच आबांच्या या अकाली निधनातून व्यसनमुक्तीचा धडा घ्यावा असा आहे. तंबाखूवर निर्बंध आणण्यासाठी सरकार करीत असलेली धडपड अपुरी असल्याचेच आबांच्या जिवाची किंमत चुकवून महाराष्ट्राला समजले आहे. आबांचे असे जाणे त्यामुळेच सारे समाजमन खिन्न करणारे ठरले आहे. सुरेश द्वादशीवार(संपादक, लोकमत, नागपूर)