- रवी टालेसामाजिक अभिसरणाचा मार्गच प्रगतीचा मार्ग असल्याची खुणगाठ मनाशी बांधली, तरच हे राज्य शाहू-फुले-आंबेडकरांचे असल्याचे अभिमानपूर्वक सांगता येईल; अन्यथा उठता-बसता होणारा त्या महामानवांचा गजर वृथाच सिद्ध होईल! चांगेफळ-पैसाळी आणि सुकळी-पैसाळी. अकोल्यापासून अवघ्या काही किलोमीटरवर, रस्त्याच्या अल्याड-पल्याड वसलेली दोन पुनर्वसित गावे. सुकळीमध्ये शे-दीडशे घरांची संमिश्र वस्ती, तर चांगेफळमध्ये एकाच समाजाची अवघी वीस-बावीस घरं! दसऱ्यानंतरच्या तिसऱ्या दिवसाची पहाट चांगेफळमधील लोकांसाठी कहर घेऊनच उगवली. सुकळीमधील एका विशिष्ट समाजाच्या जमावाने चांगेफळवर भीषण हल्ला चढविला. जी व्यक्ती दिसेल तिला बेदम मारहाण अन् जी वस्तू हाती लागेल तिची तोडफोड, हा एकमेव उद्देश समोर ठेऊन हल्लेखोरांनी मनमुराद धिंगाणा घातला. एवढा की ओल्या बाळंतिणीलाही जीव वाचविण्यासाठी इवलसं बाळ हाती घेऊन शेतात धूम ठोकावी लागली. तोडफोडीसाठी काही शिल्लक उरले नाही, तेव्हा घराबाहेर लागलेले विजेचे मीटरही सुटले नाहीत. चांगेफळवर हा कहर बरसण्यासाठी निमित्त झाले, ते एका शुभेच्छा फलकावरील महापुरुषाच्या प्रतिमेच्या विटंबनेचे! सुकळीतील एका युवकाने चांगेफळच्या बाजूने रस्त्याच्या कडेला मांस विक्रीचे दुकान थाटले होते. त्याला चांगेफळमधील महिलांनी विरोध केला आणि शेवटी स्वत:च ते दुकान हटविले. त्यानंतर विटंबनेचा प्रकार घडला आणि मग विटंबना चांगेफळमधील लोकांनीच केल्याच्या गृहीतकातून घडले पुढील महाभारत! राज्यातील शेकडो गावांमध्ये असे प्रकार यापूर्वी अनेकदा घडले आहेत. चांगेफळ प्रकरणातील वेगळी व सकारात्मक बाजू ही आहे, की हल्ल्यानंतर सुडाची भाषा अजिबात वापरली गेली नाही. उलट सामाजिक सौहार्द कसे जपले जाईल, याची काळजी घेतली गेली. राजकीय नेत्यांनी घटनास्थळी धाव घेतली खरी; पण कुणाचीही भाषा चिथावणीखोर नव्हती. घडलेल्या घटनेचा निषेध धरणे आंदोलनाच्या माध्यमातून जरूर नोंदविला गेला; मात्र तो मूकपणे! गत काही दिवसांपासून राज्यात एक प्रकारची अस्वस्थता आतल्या आत धुमसत आहे. विविध जाती समुदाय मोठ्या संख्येने मोर्चे काढत आहेत. या मोर्चांमधून सवलती, आरक्षणाची मागणी होत आहे. त्यापैकी काही मागण्या इतर जाती समुदायांच्या मागण्यांना छेद देणाऱ्या आहेत. या अस्वस्थतेचा स्फोट होऊन राज्य जातीय हिंसाचाराच्या वणव्यात लोटले जाते की काय, अशी भीती व्यक्त झाली. राज्यात कुठेही थोडे जरी खुट्ट झाले, की हीच शेवटची काडी तर ठरणार नाही ना, अशी आशंका अनेकांच्या मनात डोकावते. चांगेफळ हल्ल्यानंतरही तसेच घडले; पण यापूर्वी क्वचितच दिसलेला समजुतदारपणा यावेळी प्रकर्षाने जाणवला.दलित मतपेढीला अठरापगड जातींची जोड देऊन, सामाजिक अभियांत्रिकीचा यशस्वी प्रयोग राबविणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांनी तर पीडितांसाठी आर्थिक मदतीची घोषणा करून, सामाजिक अभिसरणाच्या दिशेने अणखी एक पाऊल पुढे टाकले. प्रक्षुब्ध पीडितांनी ती मदत नाकारली; पण या निमित्ताने ज्या भावनेचे प्रदर्शन झाले, ती खूप महत्त्वाची आहे. जातीय तणावाच्या घटना गैर समजुतीतून घडल्याचे बहुतांश वेळा पुढे समोर येते; पण तोपर्यंत खूप अनर्थ घडून गेलेला असतो. चांगेफळमध्येही तसेच घडले. महापुरुषांच्या प्रतिमेची विटंबना मांस विक्रेत्यानेच केली होती आणि त्यानेच समाजबांधवांना हल्ल्यासाठी भडकवले, असे आता समोर आले आहे. हल्ल्यानंतर जो समजूतदारपणा उभय समाजांनी दाखवला, तो सत्य उघडकीस येईपर्यंत दाखविला असता, तर जे घडले तेदेखील टळले असते. जे चित्र दाखविले जाते, ते खरेच असते असे नव्हे, हा धडा या निमित्ताने पुन्हा एकदा मिळाला आहे. तो लक्षात ठेवला आणि सामाजिक अभिसरण हाच प्रगतीचा मार्ग असल्याची खुणगाठ मनाशी बांधली, तर हे राज्य शाहू-फुले-आंबेडकरांचे असल्याचे अभिमानपूर्वक सांगता येईल; अन्यथा उठता-बसता होणारा त्या महामानवांचा गजर वृथाच सिद्ध होईल!
तर, महामानवांचा गजर वृथाच!
By admin | Updated: October 25, 2016 04:12 IST