अवघ्या दोन महिन्यांवर सिंहस्थ येऊन ठेपला तरी त्या संबंधीची कामे उरकताना दिसू नये, याचा अर्थ पर्वाची ‘पर्वणी’च साधली जाणार!नाशकात होऊ घातलेल्या सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर कुंभमेळामंत्र्यांनी खास येवला येथे जाऊन पैठणी, सोवळे, महावस्त्रादि खरेदीद्वारे पूजेची तयारी चालविली असली तरी मुळात साधू-महंत तसेच गंगास्नानाकरिता येणाऱ्या कोट्यवधी भाविकांसाठी करावयाची कामे मात्र वेळेत उरकण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे विकासकामांच्या आघाडीवरील तयारीचे काय? या प्रश्नाने समस्त नाशिक व त्र्यंबकवासीयांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत.सिंहस्थ पर्व दोन महिन्यांवर येऊन ठेपला असला तरी त्यासाठी हाती घेण्यात आलेली कामे अद्यापही आटोक्यात वा आवाक्यात आली नसल्याची सार्वत्रिक ओरड आहे. त्र्यंबकेश्वरी व नाशकात १९ आॅगस्टला आखाडा परिषदेचे ध्वजारोहण होईल. यापूर्वी साधारणत: महिना, पंधरा दिवस अगोदरच साधू-महंतांचे नगरागमन सुरू होते. त्र्यंबकच्या जुन्या आखाड्याचा नगरप्रवेश सोहळा तर २८ मे रोजी म्हणजे अवघा आठवडाभराच्याही आतच होऊ घातला आहे. आखाड्याच्या इष्ट देव-देवता, पालखी, शस्त्र, ध्वजा आदिंसह मोठ्या मिरवणुकीने साधू-महंतांचे हे नगरागमन होईल, पण त्र्यंबकच्या खोदून ठेवलेल्या रस्त्यांनी त्यांचे स्वागत घडून येईल. एकाचवेळी शाहीमार्गासह संपूर्ण त्र्यंबकमधील रस्ते उचकटून ठेवले गेले असून, गेल्या काही दिवसांपासून गावकऱ्यांना प्रचंड गैरसोयीस सामोरे जावे लागत आहे. पण त्याची जबाबदारी कुणी घेताना दिसत नाही. अतिशय संथ गतीने सुरू असलेले हे काम कसे व कधी पूर्णत्वास जाणार हा प्रश्नच आहे. दोन दिवसांनी खुद्द मुख्यमंत्री तेथील कामांच्या पाहणी व आढावा बैठकीसाठी येणार असल्याने काही ‘मलमपट्टी’ केली जाईलही, पण अशा कामांच्या गुणवत्तेचा विचार करता येऊ नये.नाशकात पुरोहित संघातर्फे रामकुंडावर ध्वजारोहण केले जाते. त्यासाठी पंतप्रधानांना निमंत्रण द्यायला जाताना महापौरांना व साधू-महंतांना सोबत घेतले नाही म्हणून चर्चा केली गेली व तितकेच नव्हे तर त्या ध्वजारोहणावर बहिष्कार घालण्यापर्यंतची भाषाही केली गेली, पण या गदारोळात साधुग्राम व शहरातील अन्य संबंधित कामे ज्या दिरंगाईने सुरू आहेत, ते पाहता सर्वच पातळीवर चिंतेचेच वातावरण आहे. कारण, एक तर कुठलेही काम पूर्णत्वास गेलेले नाही आणि दुसरे म्हणजे पावसाळा तोंडावर आहे. मान्सून जर ठरल्यावेळीच आला तर गोदेकाठी व विशेषत: शेती परिसरात उभारण्यात येणाऱ्या साधुग्रामच्या कामात मोठे अडथळे येण्याची भीती आहे. सदर कामांना गती देण्यासाठी महापालिका आयुक्तांनी दोनच दिवसांपूर्वी आणखी दहा अभियंत्यांची अतिरिक्त कुमक साधुग्रामची धुरा सांभाळणाऱ्या अधीक्षक अभियंत्यांच्या मदतीला दिली आहे, पण ते उशिराचे शहाणपण म्हणावे अशीच स्थिती आहे. नाशिकरोड रेल्वे स्थानकाच्या अतिरिक्त फलाटाचे कामही रडतखडत सुरू आहे. स्वच्छता, आरोग्य व सुरक्षा आदि बाबतची कामेही दृष्टिपथात दिसत नाहीत. तेव्हा ऐनवेळी आहे त्यात रेटून वा निभावून नेण्याखेरीज गत्यंतर नसेल.विशेष म्हणजे, साधुग्रामच्या कामांबद्दल आता-आतापर्यंत संत-महंतांची ओरड होती, परंतु स्थानिक आखाडे व काही धार्मिक स्थळांवरील सुधारणांसाठी महापालिकेने सुमारे एक कोटीचा निधी मंजूर केल्यानंतर त्यांचा आवाजही क्षीण झाला आहे. खासगी जागेत करावयाच्या कामांना शासकीय निधी देता येत नसतानाही तो दिला जाणार आहे. त्यामुळे आता अगदी ऐनवेळी दिल्या जावयाच्या या लाखोंच्या निधीतून कोणती कामे साकारतील याचा हिशेब न मागितलेलाच बरा. अर्थात सिंहस्थानिमित्तच्या विकासकामांत सर्वांचाच ‘हातभार’ आहे म्हटल्यावर तो कुणी कुणाला मागायचा आणि द्यायचा? जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कुंभमेळामंत्री गिरीश महाजन नाशकात मुक्कामी थांबून या कामांवर देखरेख ठेवणार होते, पण त्यांना साधी त्यांच्या संपर्क कार्यालयासाठी अजून जागा मिळालेली नाही. बिचारे शासकीय विश्रामगृहावर किती दिवस मुक्काम करणार आणि कामांकडे लक्ष देणार? सिंहस्थाच्या कामांतील या दिरंगाईमुळेच नाशिक व त्र्यंबकेश्वरकरांची घालमेल वाढली आहे.- किरण अग्रवाल
सिंहस्थ कामात दिरंगाईच!
By admin | Updated: May 21, 2015 23:22 IST