शहरं
Join us  
Trending Stories
1
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
2
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
3
विश्वास बसला नसता...! युक्रेनने समुद्री ड्रोनद्वारे रशियाचे सुखोई फायटरजेट पाडले; अमेरिकेसह सर्व देशांच्या सैन्यांना धक्का
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा आणखी एक कट उघड; गुप्तचर विभागाची माहिती, अलर्ट जारी
5
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
6
Video - रेस्टॉरंटमध्ये टेबल न मिळाल्याने संतापले मंत्री; रातोरात बोलावली फूड सेफ्टी टीम अन्...
7
धक्कादायक! पुण्यात नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; तरुणाविरोधात गुन्हा दाखल
8
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
9
निवेदिता सराफ यांच्याकडून घडलेली 'ती' चूक, अशोक सराफ यांनी पत्नीला चांगलंच सुनावलं
10
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
11
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल
12
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
13
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी
14
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
15
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
16
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
17
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
18
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
19
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
20
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी

लढाऊ नेतृत्वाचा स्वयंभू आविष्कार

By admin | Updated: February 21, 2017 00:05 IST

जांबुवंतराव धोटे यांच्या निधनाने वेगळ्या विदर्भासाठी सारे आयुष्य वेचणाऱ्या एका झुंझार व लढाऊ नेतृत्वाचा शेवट झाला आहे.

जांबुवंतराव धोटे यांच्या निधनाने वेगळ्या विदर्भासाठी सारे आयुष्य वेचणाऱ्या एका झुंझार व लढाऊ नेतृत्वाचा शेवट झाला आहे. कॉलेज जीवनापासूनच आपल्या नेतृत्वाच्या धारदार बाजूंची ओळख साऱ्यांना करून देत जांबुवंतरावांनी अल्पावधीतच विदर्भाचा फार मोठा प्रदेश आपल्या नेतृत्वाच्या छायेत आणला. विदर्भाच्या मागणीचे नेतृत्व करणारे जुन्या पिढीतील नेते लोकनायक बापूजी अणे व ब्रिजलाल बियाणी यांच्या मागे पडण्याच्या काळात जांबुवंतरावांचे तरुण, करारी व शक्तिशाली नेतृत्व ती मागणी घेऊन बहुजन समाजातून पुढे आले. पहिलवानी ढंगाचे आणि गव्हाळ वर्णाचे व्यक्तिमत्त्व, डोळ्यात समोरच्याच्या मेंदूचा ठाव घेणारी विलक्षण चमक, संन्यस्तासारखे डोक्यावर बांधलेले केस, त्याला साजेशी दाढी, दमदार पावले टाकीत पुढे होणारी वाटचाल, अंगात पांढरा शुभ्र बंगाली सदरा आणि लुंगीवजा पेहरलेले तेवढेच शुभ्र धोतर हे त्यांचे रूप पाहताच छाप पाडणारे होते.बोलण्यातला ठाम आत्मविश्वास ही समोरच्यांना आकृष्ट करणारा आणि मैत्रीएवढाच नेतृत्वाच्या कवेत घेणारा भाग होता. साऱ्या महाराष्ट्रात त्यांचे नाव गाजले ते त्यांनी महाराष्ट्र विधानसभेत सरकार पक्षाच्या दिशेने फेकलेल्या पेपरवेटमुळे. हा पुढारी नुसता बोलत नाही, जे बोलतो त्यासाठी कोणतेही साहस करायला तो सिद्ध असतो अशी त्या घटनेने त्यांची साऱ्या विदर्भात ख्याती झाली. महाराष्ट्रातील अनेक वृत्तपत्रांनी त्यासाठी त्यांच्यावर केलेली आगपाखड विदर्भातील लोकांनी फारशी मनावर घेतली नाही. १९६२ पासूनच त्यांनी सारा विदर्भ त्याच्या स्वतंत्र राज्याच्या मागणीसाठी ढवळून काढायला सुरुवात केली. १९६७च्या निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वातील महाविदर्भ राज्य संघर्ष समितीचे १७ आमदार विदर्भातून निवडून आले. लोकनायक बापूजींचा त्यांना आशीर्वाद होता आणि नागविदर्भ आंदोलन समितीचे आदिवासी नेते राजे विश्वेश्वरराव हे त्यांच्या तीन सहकारी आमदारांसोबत त्यांच्या मागे होते. मुळात १९२१ पासून काँग्रेसने विदर्भाची मागणी उचलून धरली. जेव्हीपी कमिशनपासून राज्य पुनर्रचना आयोगापर्यंतच्या सगळ्या समित्यांनी तिला पाठिंबा दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसह तेव्हाचा जनसंघ व विदर्भातील अन्य पक्ष-संघटना विदर्भाच्या बाजूने होत्या. त्यामुळे त्यासाठी वेगळी वैचारिक मांडणी करण्याची गरज नव्हती. तरीही जांबुवंतरावांनी त्यांना वंदनीय असणाऱ्या नेताजी सुभाषचंद्रांचे नाव घेत त्यांच्या फॉरवर्ड ब्लॉक (या विदर्भात नावालाही नसलेल्या) पक्षात प्रवेश करून त्याला एक प्रतिष्ठित अस्तित्व प्राप्त करून दिले.विदर्भात कृषी विद्यापीठ स्थापन व्हावे, येथील शिक्षण संस्थांचा दर्जा वाढावा, युवकांना रोजगार मिळावा इ. मागण्यांसाठी त्यांनी मोठी आंदोलने उभी केली. त्यात शहीद झालेल्या तरुणांची स्मारके उभारली. या सबंध काळात नागपुरातील विणकर बांधवांनी त्यांना जी निष्ठापूर्वक साथ दिली तिचे स्मरण आजही सारे करतात. एक तरुण व देखणा नेता आपल्या फर्ड्या वक्तृत्वाने काँग्रेसला बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या विदर्भात एक वेगळे व समर्थ व्यासपीठ उभे करतो ही बाबच साऱ्यांच्या कौतुकाची व अभिमानाची होती. मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि जांबुवंतराव हे दोघेही यवतमाळचेच. त्यांच्यातली राजकीय तेढ जेवढी टोकाची तेवढेच त्यांचे व्यक्तिगत मैत्रही सख्ख्या नात्यात जमा होणारे. जांबुवंतरावांच्या नेतृत्वाची कमान १९७५च्या आणीबाणीपर्यंत सतत उंचावत राहिली. त्या काळात त्यांनी आणीबाणीला पाठिंबा दिला आणि त्यांच्याविषयीचे आकर्षणच ओसरू लागले. मग कधी काँग्रेसच्या तिकिटावर खासदार होणे तर कधी नुसत्याच चळवळी उभ्या करणे अशा उद्योगात ते रमताना दिसले. त्यांचे निष्ठावंत अनुयायी या काळात त्यांच्यापासून दूर जाताना दिसले. अगदी अलीकडे विदर्भाच्या चळवळीने पुन्हा एकवार डोके वर काढले तेव्हा तिच्या नेतृत्वाच्या फळीत जांबुवंतराव नव्हते. त्यांच्या स्वयंभूपणाला फळीतला एक होणे मानवणारेही नव्हते. त्याच स्थितीत विदर्भाच्या चळवळीला नक्षलवाद्यांची मदत मिळवू असे म्हणत नागपूरच्या तुरुंगात बंद असलेल्या नक्षली पुढाऱ्यांना ते भेटले. हा सारा त्यांच्या पीछेहाटीचा, अनुयायी गमावण्याचा व त्यांच्याच चळवळीतील इतरांचे त्यांच्याकडे प्रथम दुर्लक्ष होत असल्याचा आणि पुढे त्यांनी त्यांची उपेक्षा चालविल्याचा काळ होता. मात्र आपल्या एकाकी अवस्थेतही त्यांचे करारी देखणेपण, शब्दातले वजन व डोळ्यातली चमक कायम होती आणि त्यांच्याविषयी व्यक्तिगत आदर व स्नेह बाळगणाऱ्यांचा वर्ग शिल्लक होता. त्यांच्या जाण्यामुळे हा वर्ग आज एक पोरकेपण अनुभवत असणार. विदर्भाच्या चळवळीलाही त्यांचे नसणे हा यापुढे मोठा शापच ठरणार. जांबुवंतरावांचे व लोकमत परिवाराचे संबंध एकाच वेळी कडुगोड म्हणावे असे होते. तरी त्यांचे जाणे या परिवाराला धक्का देऊन गेले आहे. त्यांच्या स्मृतींना आमचे विनम्र अभिवादन!सुरेश द्वादशीवार(संपादक, लोकमत, नागपूर)