शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
4
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
5
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
6
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
7
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
8
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
9
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
10
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
11
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
12
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
13
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
14
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
15
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
16
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
17
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
18
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
19
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
20
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

सरसंघचालकांची विज्ञाननिष्ठा

By admin | Updated: September 20, 2015 23:41 IST

अवैज्ञानिक आणि कालबाह्य रुढींचा त्याग करा हा रा.स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी जयपुरात केलेला उपदेश संघ परिवारातील श्रद्धाळूंएवढाच साऱ्या समाजालाही मार्गदर्शक ठरावा असा आहे

अवैज्ञानिक आणि कालबाह्य रुढींचा त्याग करा हा रा.स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी जयपुरात केलेला उपदेश संघ परिवारातील श्रद्धाळूंएवढाच साऱ्या समाजालाही मार्गदर्शक ठरावा असा आहे. कालबाह्यच नव्हे तर समाजाला मागे नेणाऱ्या रुढींचे पालन एकट्या संघजनांकडूनच होते असे समजण्याचे कारण नाही. आपल्या जातीचे शुद्धत्व राखण्यासाठी खून करणाऱ्या आणि आपल्याच मुलींवर बलात्काराचे आदेश देणाऱ्या खाप (जात) पंचायतींकडूनही ते होते. त्यात भाग घेणारी माणसे संघात जाणारी नसतात. दाभोलकर, पानसरे किंवा कलबुर्गी यांची हत्त्या करणारी आणि त्या हत्त्या धर्मरक्षणार्थ करण्यात आल्याचे बेशरमपणे सांगणारी माणसेही समाजात असतात. आपल्या जुनकट आणि बावळट श्रद्धांना उराशी कवटाळून आसाराम बापूपासून श्री श्री पर्यंतच्या बुवाबाबांचे चरणतीर्थ घेणारी आणि त्यांच्या प्रवचनात नाचणारी माणसे सर्वत्र आहेत. आपली गरिबी कायम राखून या बुवाबाबांच्या तिजोऱ्या कोट्यवधींनी भरून देणारेही आपल्यात फार आहेत. अंधश्रद्धेने भारलेल्या निरक्षर व अडाणी वर्गाचाच हा प्रश्न राहिला नसणे हीच यातील खरी आपत्ती आहे. देशाला शैक्षणिक मार्गदर्शन करणाऱ्या समितीचे प्रमुख डॉ. दीनानाथ बात्रांसारखी माणसेही या गावंढळपणात मागे नाहीत. प्राचीन काळी आपल्या देशात पुष्पकसारखी विमाने होती आणि प्रभू रामचंद्र त्यातून प्रवास करीत असत असे अचरट निबंध वैज्ञानिकांच्या जागतिक परिषदात वाचणारे विद्वानही आपल्यात थोडे नाहीत. गोमुत्राच्या प्राशनाने आणि गायीच्या शेणाच्या सेवनाने आजार बरे होतात, मृतांचे आत्मे कावळ्यांच्या रूपाने भूतलावर येतात इथपासून यज्ञ केल्याने पाऊस पडतो आणि गोदेत शाहीस्नान केले की सगळी जुनी पातके धुऊन निघून स्वर्गादिकाचा मार्ग प्रशस्त होतो अशा भाकड कथा पसरविण्यात ही ज्ञानी माणसेही मागे नाहीत. सिनेनटांची देवळे उभारणे, सत्तेवरील पुढाऱ्यांच्या दैवतासारख्या पूजा करणे आणि समाजाच्या जराही कामी न येणाऱ्या गोसावड्यांच्या स्नानासाठी अवर्षणग्रस्त भागातील धरणांचे पाणी सोडणे हा सारा याच आंधळ्या भक्तिभावाचा परिणाम आहे. तो करणाऱ्यात सुशिक्षित नागरिकांएवढेच सरकारांनाही सामील होताना पाहावे लागणे हा यातला सर्वांत मोठा दैवदुर्विलास आहे. प्रत्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही प्राचीन भारतात प्लॅस्टिक सर्जरीची पद्धत होती आणि आजचा सोंडेचा गणपती हे त्याच सर्जरीचे प्रतीक आहे असे सांगून मध्यंतरी एक मोठा विनोद केला होता. सरसंघचालकांचा आताचा संदेश इतर कोणी गंभीरपणे घेतला नाही तरी संघ कार्यकर्त्यांएवढाच सगळ्या विवेकी जनांनी तो तसा घ्यावा ही अपेक्षा येथे चुकीची ठरू नये. देशातील ज्या पाच राज्यात संघ नियंत्रित भाजपाची सरकारे आहेत त्यात तर त्याविषयीचे कठोर कायदे करायलाही हरकत नाही. बुवा, बाबा, बापू आणि महंतांनीच या देशात अंधश्रद्धा पसरविल्या नाहीत, त्यांची पाळेमुळे घट्ट करणाऱ्या परंपराही देशात आहेत. त्या केवळ हिंदू धर्मातच नाहीत मुसलमान, जैन, ख्रिश्चन आणि बौद्ध धर्मातही त्या आहेत. आताचा धोका या परंपरांनी त्यांचे आग्रह साऱ्या समाजावर थोपविण्याचा प्रयत्न करणे हा आहे. कुणाच्या पर्युषण पर्वात मांसाहारावर बंदी, कुणाच्या नवरात्रीत मांसविक्रीवर बंदी, कुणाच्या रोजांखातर दिवसाची भोजनबंदी आणि त्यासोबत या साऱ्या धर्मांच्या उन्नयनावर समाजमनाची बंदी. आपण कोणत्या जगात आणि कितव्या शतकात जगत आहोत याचा प्रश्न पडावा असे हे वर्तमान आहे. त्यातून कोणाच्या धर्मभावना कशाने दुखविल्या जातील याचा आता नेम उरला नाही. आम्हाला यल्लमाच्या जोगतिणी चालतात, हुसेनची चित्रे चालत नाहीत, आमच्या माणसांचे हुडदूस चालतात, त्यांचे हुडदंग खपत नाहीत. स्वधर्मप्रेमाहून परधर्मद्वेष आणि डोळस जगण्याहून अंधश्रद्ध राहण्यातले खोटे सुरक्षित मानस यातला हा संघर्ष आहे. तो संपविणे ही केवळ पुरोगामी विचारवंतांची जबाबदारी नाही. त्यासाठी धर्मावर अधिकार सांगणाऱ्यांनीच आता पुढे आले पाहिजे. मोहन भागवत यांनी या संदर्भात घेतलेला पुढाकार त्याचमुळे महत्त्वाचा व स्वागतार्ह आहे. राजाराम मोहन रॉय यांनी १९व्या शतकाच्या पूर्वार्धात सती बंदीसाठी आंदोलन उभारले. परिणामी तेव्हाच्या ब्रिटिश सरकारने सतीबंदीचा कायदा केला. तरीही अलीकडच्या काळात राजस्थानची रुपकुंवर सती गेली. (वा तिला तसे जायला भाग पाडले गेले.) दुर्दैव हे की १९व्या शतकाच्या आरंभी थांबविली गेलेली ही दुष्ट प्रथा २०व्या शतकाच्या उत्तरार्धात उजागर झाली तेव्हा तिचे स्वागत करायला तेव्हाच्या भाजपाच्या उपाध्यक्ष विजयाराजे शिंदे याच पुढे आल्या. या विजयाराजांच्या कन्या व कमालीचे अत्याधुनिक जीवन जगणाऱ्या वसुंधरा राजेच आता राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदावर आहेत. नेमक्या त्या राज्याच्या राजधानीत त्यांच्याच पक्षाच्या मातृसंस्थेचे प्रमुख असलेल्या मोहन भागवत यांनी विज्ञाननिष्ठा आणि आधुनिकीकरण यांचे सुतोवाच करावे हा योगायोग मोठा आहे. त्याचे नुसते शाब्दिक स्वागत उपयोगाचे नाही, त्याचा सक्रिय स्वीकारच आवश्यक आहे. भागवत यांचा हा संदेश संघाबाबत ‘गैरसमज’ बाळगणाऱ्या विवेकवाद्यांनीही समजून घ्यावा असा आहे.