शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सलाम पाडगावकर!

By admin | Updated: December 29, 2016 03:35 IST

जगण्यावर समरसून प्रेम करणाऱ्या मंगेश पाडगावकर या प्रतिभावंत भावकवीच्या सिद्धहस्त लेखणीने पूर्णविराम घेतला त्याला उद्या, ३० डिसेंबर रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे...

- विजय बाविस्करजगण्यावर समरसून प्रेम करणाऱ्या मंगेश पाडगावकर या प्रतिभावंत भावकवीच्या सिद्धहस्त लेखणीने पूर्णविराम घेतला त्याला उद्या, ३० डिसेंबर रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे...जगण्यावर शतदा प्रेम करायला सांगणारे महाराष्ट्रभूषण मंगेश पाडगावकर हे जीवनगाणे शिकवणारे थोर आनंदयात्री होते. तब्बल सात दशकांहून अधिक काळ त्यांच्या लेखणीवर सरस्वतीचा वरदहस्त कायम होता. जगण्यावर समरसून प्रेम करणाऱ्या या प्रतिभावंत भावकवीच्या सिद्धहस्त लेखणीने पूर्णविराम घेतला त्याला उद्या, शुक्रवारी एक वर्ष पूर्ण होत आहे. आधुनिक कवितांचा प्रवाह सुरू झाला केशवसुत, मर्ढेकरांपासून. पण सर्वाधिक लोकप्रियता वाट्याला आली ती पाडगावकरांच्याच. मराठी कविता ज्या परंपरेच्या समृद्ध वेलीवर विकसित होत गेली, त्याच परंपरेचा आधारही त्यांच्या कवितेत दिसून येत होता. म्हणूनच ‘कवी म्हणून आकार घेताना, बोरकर-कुसुमाग्रजांच्या कवितेचे खोल संस्कार माझ्यावर झाले,’ असे ते अभिमानाने सांगत. आधुनिक कवितेमध्ये मानवतावादाचा जो नवा सूर आला, त्याचा प्रभावी आविष्कार पाडगावकरांच्या कवितेतून अभिव्यक्त होऊ लागला. त्यातूनच त्यांच्या कवितेने पंरपरा व आधुनिकतेची दुहेरी शाल खुबीने पांघरली. मराठी कविता लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी विंदा करंदीकर आणि वसंत बापट यांच्यासोबत त्यांनी महाराष्ट्रातच नव्हे, तर जगभरात कवितांचे कार्यक्रम केले. यातून दोन गोष्टी झाल्या, कविता रसिकांच्या हृदयापर्यंत पोहोचली आणि कवीलाही प्रतिष्ठेचे वलय लाभले. या साऱ्याचे श्रेय नि:संशयपणे पाडगावकरांना द्यावे लागेल. पाडगावकरांच्या कवितेने ‘जगण्यावर‘ प्रेम करण्याचा मंत्र दिला. ‘झोपाळ्यावर झुलायला ‘शिकविले, प्रेमातला चातुर्वर्ण्य मोडून काढताना ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं सेम असतं’ असे प्रेमाचे नवे बोलगाणे देऊन हा कवी प्रेमवीरांच्याही हृदयात घर करून बसला. पाडगावकरांची कविता पुस्तकी-अकॅडेमिक नव्हती. त्यामुळे मराठी कवितेच्या अस्सल परंपरेचा धागा पकडून ती वाढू शकली. त्यामुळे मराठी कवितेवर प्रेम करणारा रसिक वाचक त्यांच्यापासून कधीच दूर गेला नाही. ‘श्रावणात घन निळा बरसला...’सारखं गीत असो किंवा अंतर्मुख करायला लावणारी ‘सलाम’सारखी कविता असो, रसिकांनी त्यांना ‘सलाम’ केला. पुस्तकी प्रयोगशीलतेच्या कोलांटउड्या न मारताही चांगली कविता लिहिता येते, असे ते नेहमी म्हणत. ‘धारानृत्य,’ ‘जिप्सी’पासून कवितांचा प्रवास पाहिला, तर प्रामुख्याने भावकवी ही पाडगावकरांची ठळक ओळख बनली. कवितेपलीकडे पाडगावकरांना लोकप्रिय बनविले ते त्यांच्या भावगीतांनी. श्रीनिवास खळे, यशवंत देव, हृदयनाथ मंगेशकर यांच्यासारखे संगीतकार तर अरुण दाते यांच्यासारख्या ‘शुक्रतारा’ गायकांमुळे पाडगावकर दूरदूरपर्यंत पाहोचले. मराठी भावविश्वात पाडगावकरांचे योगदान अनन्यसाधारण आहे. रसिकप्रिय असले तरी त्यांच्या कवितेत आणि व्यक्तिमत्त्वात बंडखोरीही होती. अभिव्यक्ति स्वातंत्र्याच्या सशक्त उद्गारांचे प्रकटीकरणही त्यांच्या काव्यातून झाले. वृत्तबद्ध काव्यापासून नादवंत बोलगाण्यांपर्यंत कवितेच्या विविध रंगरूपांतून प्रकटणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते. मोहक शब्दकळा, प्रेमाची तरल, भावार्त अनुभूती आणि गेयता या गुणांमुळे पाडगावकरांची कविता वाचकांच्या मनाला भुरळ घालत राहिली. गझल, विदूषक, सलाम या काव्यसंग्रहांतून राजकीय आशयाची व उपरोधिकपणा असलेली समाजातील विसंगतीवर टोकदार प्रहार करणारी कविता रचणारे पाडगावकर, अवीट गोडीची भावगीते लिहिणारे पाडगावकर, कबीर, मीरेच्या काव्यानुवादापर्यंत मुक्त संचार करणारे पाडगावकर ‘सांग सांग भोलानाथ’ असे निरागस बालगीतसुद्धा लिहून जातात आणि त्याच सहजतेने ‘शुक्रतारा मंदवारा, चांदणे पाण्यातुनी’ हेदेखील अलगदपणे सांगतात. ही सहजता, तरलता आणि सरलता हे त्यांचे मोठे बलस्थान होते. माणूस म्हणून जगण्यातली त्यांची उत्कटताही विलक्षण होती. आंतरिक स्वभावमूल्यांना त्यांच्या लेखनातही स्थान असल्याने कवितेइतकेच ते स्वत:वरही प्रेम करणारे आनंदयात्री होते. जन्माला आलेला प्रत्येक जीव एक दिवस जातो, हे त्रिकालाबाधित सत्य आहे तरी भूतलावर काही ‘जिप्सी’ असे असतात, की जे ‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ असा आंतरिक मौलिक सल्ला देतात. मंगेश पाडगावकर हे नक्षत्रांचे देणे लाभलेले प्रतिभेचे लेणे होते. या विलक्षण सारस्वताला त्रिवार सलाम!