- सुरेश भटेवरा(राजकीय संपादक, लोकमत, नवी दिल्ली)संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी राहुल गांधींनी अत्यंत आक्रमक आवेशात पंतप्रधान मोदींना ललकारले. सुब्रमण्यम स्वामींच्या निराधार आरोपांमुळे राहुलना आयतीच ही संधी मिळाली. प्रसंग होता इंदिरा गांधींच्या ९८व्या जयंतीचा. नेहरू आॅडिटोरियममध्ये युवक काँग्रेसने रॅलीचे आयोजन केले होते. त्यात पंतप्रधानांना उद्देशून राहुल म्हणाले, ‘मोदीजी तुम्ही सत्तेवर आहात, सरकार तुमचे आहे. चौकशीच्या साऱ्या यंत्रणा तुमच्या हाती आहेत. माझ्याविरुद्ध एकही आरोप सिद्ध झाला तर मला थेट तुरुंगात टाका. मी यत्किंचितही घाबरलेलो नाही. उलट देशातल्या कमजोर आणि गरीब जनतेसाठी अधिक त्वेषाने लढण्याची ऊर्जाच या हल्ल्यातून मला मिळाली. हिंमत असेल तर आपली ५६ इंचाची छाती दाखवा आणि सहकाऱ्यांमार्फत माझ्यावर चिखलफेक करण्याचा खेळ थांबवा’ स्वामींचा नामोल्लेखही न करता भाजपा आणि रा.स्व. संघावरदेखील या निमित्ताने राहुलनी चौफेर हल्ला चढवला. राहुल म्हणाले, ‘लहान होतो तेव्हापासून आपण पहात आलो की संघ आणि भाजपाने कायम माझी आजी, माझे पिता इतकेच नव्हे, तर माझ्या आईवरही सातत्याने आरोप केले. त्यातला कोणताही आरोप आजवर सिद्ध झाला नाही’. राहुलच्या भाषणात नवे तेज, नवा हुरूप, नवा आत्मविश्वास जाणवत होता. नेहरू आॅडिटोरियममध्ये जमलेल्या काँग्रेसजनांमध्ये त्यामुळे चैतन्य संचारले.सुब्रमण्यम स्वामींना राजकीय विरोधकांवर आरोप करण्याचा छंद आहे. विविध नेत्यांवर सनसनाटी आरोप आजवर सातत्याने त्यांनी केले. केवळ तात्कालिक खळबळ उडवणाऱ्या बातमीखेरीज त्यातून साध्य काय झाले? प्राथमिक चौकशीतच यातले बहुतांश आरोप बाद झाले तर उर्वरित आरोपातली हवा न्यायालयांनी काढून घेतली. आजवर ज्यांच्या विरोधात स्वामींनी चिखलफेक केली, त्या सर्वांचे भाग्य कालांतराने उजळले. मुख्यमंत्री जयललिता हे त्यातले एक वानगीदाखल उदाहण. खरं तर राहुल गांधींनी स्वामींचे आभारच मानले पाहिजेत की ब्रिटिश नागरिक बनवून राहुलची खासदारकीच काढून घेण्याची मागणी करण्यापर्यंत खोटेनाटे कुभांड स्वामींनी रचले. बोफोर्स आणि क्वाट्रोचीचे निमित्त साधून याच स्वामींनी राजीव आणि सोनिया गांधींवरही अशाच प्रकारचे बेछूट आरोप केले होते. वाजपेयींच्या कालखंडात या संदर्भात अनेक चौकशांचे प्रयोग झाले. न्यायालयाची दारेही स्वामींनी ठोठावली. त्यातून निष्पन्न काय झाले? चहुकडून स्वामींना सणसणीत चपराकच खावी लागली. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात आणि केंद्रात मोदी सत्तेवर आल्यानंतर, संघ आणि भाजपाच्या तथाकथित थिंकटँकने राहुल गांधींना ‘पप्पू’ बनवण्याचा घाट घातला. राहुलना अनावश्यक महत्त्व देत, संघ आणि भाजपाच्या काही नेत्यांनी याच काळात त्यांच्यावर इतक्या बालिश पातळीची टीका केली की राहुलच्या राजकीय व्यक्तिमत्त्वाची उंची वाढवण्यास त्यातून अप्रत्यक्ष मदतच होत गेली. राजकारणाचा एक अलिखित नियम आहे की विरोधकांवर हल्ले जरूर चढवा मात्र त्या आरोपात तथ्य असले पाहिजे. खोट्यानाट्या व वाह्यात पद्धतीने आरोपांचा भडिमार केला की हेच हत्यार बुमरँगसारखे उलटते. मोदींना चायवाला संबोधून मणिशंकर अय्यरांनी हिणवले. लोकसभा निवडणुकीत त्याचा सर्वाधिक फायदा मोदींना झाला. स्वामींनी राहुलवर केलेल्या ताज्या आरोपांची जातकुळी त्याच प्रकारची आहे.लोकसभेतल्या दिग्विजयानंतर मोदींचे सारे सवंगडी काँग्रेसमुक्त भारताचे स्वप्न जणू प्रत्यक्षात साकार झाल्याच्या थाटात वावरत होते. भारतीय राजकारणात सोनिया आणि राहुल गांधींचे अस्तित्व जणू संपले आहे, असा त्यांचा दावा होता. प्रत्यक्षात विरोधकांवर हल्ला चढवताना भाजपाच्या तमाम प्रवक्त्यांनी सर्वाधिक प्रहार सोनिया आणि राहुल गांधींवरच केले. गांधी घराण्यासह काँग्रेसला नवसंजीवनी देण्याचाच हा प्रकार होता. काँग्रेसची प्रगती असो की पतन देशातल्या तमाम राजकीय पक्षांना दोन्हीही घटना अनुकूल वाटतात. आपल्या पतनाचा रस्ता काँग्रेसने आजवर स्वत:च तयार केला तर त्याला पुनश्च प्रगतिपथावर नेण्याचा मार्ग तमाम विरोधकांनी प्रशस्त केला. खोट्यानाट्या आरोपांनी घायाळ झाल्यावर, काँग्रेसच्या जखमेतला रक्ताचा एक थेंब जरी मातीत मिसळला तरी त्याचे बीज तरारून फुटते. जे काँग्रेसला वारंवार नवसंजीवनी देते. सोनिया गांधींचा जन्म इटलीतला. विदेशी मुळाच्या मुद्द्यावरून सुषमा स्वराजांपासून शरद पवारांपर्यंत सर्वांनी त्यांच्यावर कडवट प्रहार केले. त्याचे काय झाले? मनमोहनसिंगांना कमजोर पंतप्रधान म्हणून हिणवणाऱ्या लोहपुरुष अडवाणींची सध्याची अवस्था काय? हा इतिहास सर्वांनाच ठाऊक आहे. कोणतीही अतिरंजित टीका देशातल्या जनतेला पसंत पडत नाही, हेच या मातीचे शाश्वत सत्य आहे. त्यात भारतात जन्मलेल्या राहुल गांधींना ब्रिटिश नागरिक ठरवण्याचा स्वामींचा अट्टहास कोणाला पटेल? येत्या सहा महिन्यात रॉबर्ट वाड्रा तुरुंगात असतील असा निष्कर्ष चौकशी पूर्ण होण्याआधीच, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर घोषित करून मोकळे झाले आहेत. वाड्रा खरोखर गुन्हेगार असतील तर कायदा त्यांना जरूर शिक्षा देईल. मग चौकशीआधीच निकाल घोषित करण्याचा उतावळेपणा कशासाठी? या साऱ्या घटनांमधून भाजपाच्या सूडयात्रेचा दर्पच जाणवतो.यूपीए २ च्या राजवटीत घोटाळ्ययांचा महापूर आला. सरकारचे नेतृत्व त्यावेळी मनमोहनसिंगांकडे होते. त्याचे परिणाम काँग्रेसला भोगावे लागले. सत्तेवर येण्यासाठी ज्या अफाट घोषणांचा विक्रम भाजपाने केला त्याचे दुष्परिणाम भाजपलाही यापुढे सहन करावेच लागणार आहेत. बिहार निवडणुकीचे ताजे निकाल त्याची सुरुवात आहे. बिहारमध्ये सत्तेवर येण्याची आकांक्षा गृहीत धरणाऱ्या भाजपाला अवघ्या ५३ जागा मिळाल्या. त्यातही महाआघाडीच्या विजयात खोडा घालण्याची कामगिरी समाजवादी, राष्ट्रवादी, ओवेसी, पप्पू यादव, बसप यांनी बजावल्यामुळे २६ जागा भाजपाच्या पदरात पडल्या. महाआघाडीला राजदच्या बंडखोरांमुळे आणखी ९ जागा अत्यंत थोड्या फरकाने गमवाव्या लागल्या. त्याचा बोनसही भाजपालाच मिळाला. या ३५ जागा महाआघाडीला मिळाल्या असत्या तर भाजपाचे संख्याबळ अवघ्या १८ जागांवर आटोपले असते. सारांश, भाजपसाठी बिहारचा निकाल दिल्लीच्या निकालापेक्षा वेगळा नाही. दाळीचे भाव २00 रूपये, तांदूळ आणि भाज्यांचे दररोज कडाडणारे चढे भाव मोदींच्या ‘अच्छे दिन’चे सध्या प्रतीक बनले आहेत. भारतीय वास्तव नाकारून परदेशात स्वत:चे मार्केटिंग मोदी ज्या प्रकारे करीत सुटले आहेत, तो फुगवलेला फुगा कधीतरी फुटणारच आहे. आपण संघाचे प्रचारक नाही तर पंतप्रधान आहोत, ही बाब मोदींना समजावून घ्यावीच लागेल. राज्यकर्त्यांना सत्तेच्या अहंकारात राजकारणाच्या मूलभूत सिद्धांताचा विसर पडला की जनतेच्या संतापाला सामोरे जावे लागते. हा अहंकार उतरवण्यासाठी लोक पुन्हा त्यांना संधी देतात, ज्यांना लोकांनीच पूर्वी कठोरपणे हटवले आहे. भारताच्या राजकीय इतिहासात अशा घटनांची कमतरता नाही.
राहुलजी... स्वामींचे तुम्ही आभार मानायला हवेत!
By admin | Updated: November 21, 2015 04:20 IST