मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी सरचिटणीस प्रकाश करात आणि त्यांचे विद्यमान उत्तराधिकारी सीताराम येचुरी यांच्या दरम्यान एक छुपा संघर्ष असल्याची बाब नवी नाही. ढोबळमानाने करात परंपरावादी तर येचुरी समन्वयवादी असल्याचेही म्हणता येईल. पण तूर्तास येचुरी एकप्रकारे पक्षप्रभारी असूनही करात यांची भूमिका पक्षाच्या पोलिट ब्युरोने स्वीकारली असल्याने त्यांची सरशी झाली असल्याचे दिसते. अर्थात त्याला कारणीभूत आहे पश्चिम बंगाल विधानसभेची नुकतीच पार पडलेली निवडणूक. या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने काँग्रेसबरोबर समझोता केला होता. मुळात दक्षिणेकडील केरळात काँग्रेसच्या विरोधात आणि बंगालात मात्र त्याच काँग्रेसच्या खांद्याला खांदा हा प्रकार मतदारांना गृहीत धरणारा होता. वर्षानुवर्षे तृणमूल आणि काँग्रेससह अन्य पक्षदेखील जो आरोप बंगालात प्रदीर्घकाळ सत्तेत राहिलेल्या डाव्या आघाडीच्या विरोधात करीत आले तोच दहशतवादाचा आरोप तृणमूलच्या विरुद्ध करुन त्याचा मुकाबला करण्यासाठी कम्युनिस्टांनी काँग्रेसशी मैत्री केली. पण तरीही या दोहोंना ममतांची सत्तेकडील वाट रोखता आली नाही. ती रोखता आली असती आणि डावे अधिक काँग्रेस यांची सरशी झाली असती तर कदाचित पोलिट ब्युरोमध्ये येचुरींचा सत्कारच केला गेला असता. पण तसे झाले नाही. साहजिकच येचुरींच्या भूमिकेचे विरोधक आणि करातांचे पाठीराखे यांनी पक्षाच्या चुकीच्या भूमिकेबद्दल वादळी चर्चा घडवून आणली. प्रकाश करात हे मूलत: अत्यंत कर्मठ म्हणून ओळखले जातात आणि काँग्रेससह कोणत्याही अन्य राजकीय पक्षासोबतचा प्रवास त्यांना मान्य नाही. येचुरी यांना मात्र तथाकथित जातीयवादी पक्षांना नामोहरम करण्यासाठी सर्व निधर्मी पक्षांनी एकत्रित व्हावे असे वाटत असते. पण त्यांचे असे वाटणे निदान आज तरी पक्षाने अस्वीकृत केले आहे. त्याचमुळे पोलिट ब्युरोच्या दोन दिवसीय बैठकीनंतर पक्षाने जे निवेदन प्रसिद्ध केले आहे त्यात असे स्वच्छपणे म्हटले आहे की काँग्रेससह कोणत्याही पक्षाबरोबर समझोता न करण्याचा जो निर्णय पक्षाच्या केन्द्रीय समितीने अगोदरच घेऊन ठेवला आहे त्या निर्णयाशी अलीकडच्या निवडणुकांबाबत पक्षाने घेतलेला निर्णय अजिबातच सुसंगत नव्हता. पक्षाच्या बंगाल शाखेने निवडणूक लढविताना साऱ्या मर्यादा पार केल्या अशी टीका करताना सुहासिनी अली यांनी तर असेही म्हटले की पक्षाने स्वबळ अजमावणे योग्य झाले असते.