- डॉ. शुभांगी पारकर इच्छाशक्तीचा अति उपयोग करता येणे शक्य होत नाही. तिचा वापर आयुष्यातील दैनंदिन गोष्टींसाठी करणे केव्हाही उचित नाही, पण ज्या गोष्टी नियंत्रणात ठेवून आयुष्यात मोठे बदल घडविणे शक्य आहे तिथे इच्छाशक्तीचा उपयोग समर्थनीय आहे. काही लोक आयुष्यात योग्यवेळी उचित निर्णय घेऊ शकतात. त्यांचे हे बिनचूक निर्णय सर्वसामान्य माणसांना अनेकदा स्तंभित करतात. आपण त्यांचे दैव त्यांना साथ देते आहे असे समजून आपल्या आळशी, कुचकी दैवाला दोष देतो. पण ना त्यांचे दैव बलवत्तर असते ना आपले दैव खडतर असते. त्यांच्याकडे बुद्धी आपल्याएवढीच असते पण प्रबळ इच्छाशक्ती जबरदस्त असते. आयुष्यात आशावाद हा याच दुर्दम्य इच्छाशक्तीतून निर्माण होतो.एखाद्या गोष्टीची हाव आपल्याला सुटते तेव्हा मनातून पटकन एक आवाज येतो, नाही. कितीही हाव वाटली तरी मला ही गोष्ट अजिबात करायची नाही. हीच असते प्रचंड इच्छाशक्ती. ही इच्छाशक्ती किंवा विलपॉवर मनातून येणाऱ्या घंटानादासारखी असते. आपल्या मनाला, तनाला आणि पूर्ण अस्तित्वाला व्यापून उरणारी. ठणठणाणरा घंटानाद. आतून-बाहेरून घुमणारा घंटानाद. आपल्याभोवती वक्राकार लहरीनी वेढा घातलेला घंटानाद. तो थांबला तरी त्याचा ध्वनिनाद आपल्याला सोडत नाही. प्रबळ विचाराची ताकद अशीच असते. एखादी गोष्ट ठरवली की तिचा ध्यास ती पूर्णत्वाला नेईपर्यंत माणूस सोडत नाही. जगातल्या अपरिमित यश मिळविणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या यशाचे रहस्य विचारले तर प्रामाणिकपणा, दयाळूपणा, शौर्य, विधायकता आणि माणुसकी यांसारख्या गुणांबद्दल ते प्रामुख्याने सांगतात. पण दुर्दम्य इच्छाशक्ती हा त्यांच्या यशाचा एक्का असतो. याउलट आपण लोकांना त्यांच्या पराजयाबद्दल विचारले तर इच्छाशक्तीचा अभाव हे एक प्रमुख कारण समोर येते. आयुष्यात कुठल्याही गोष्टीचा मोह व लोभ प्रत्येकाला असतो. हा मोह मूलभूत गोष्टींसाठी असू शकतो. खाण्यापिण्याचा मोह, कपड्यालत्याचा मोह, पैशाचा मोह, प्रॉपर्टीचा मोह.. अशा अनेक गोष्टी आपल्याला दैनंदिन जीवनात दिसतात. काही मोह खास असू शकतात. पण मोहाबरोबर आत्मनियंत्रण माणसांमध्ये नसेल तर त्यांचे चारित्र्य बदलून जाते. पैशाचा मोह असला तरी प्रत्येक व्यक्ती लाच घेत नाही. लैंगिक आकर्षण तर नैसर्गिक गरजच असते म्हणून प्रत्येक जण निलाजरेपणे हपापलेला दिसून येत नाही. याचं कारण मनावर असलेलं प्रचंड नियंत्रण जे फक्त प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावरच येऊ शकतं. अर्थात दुर्दम्य इच्छाशक्ती ही केवळ सकारात्मक किंवा विधायक प्रसंगापुरती मर्यादित नसते. अनेक नकारात्मक किंवा विघातक गोष्टींचा प्रतिबंध करण्यासाठीसुद्धा प्रबळ विलपॉवर लागते. त्यातूनच माणसाची माणुसकी निरंतर राहते. सामान्यपणे आपल्या सगळ्यांना सतत काही ना काही इच्छा होत असते. अनेक स्वप्नं मनात रमत असतात. पण त्या इच्छांत शक्ती नसते. त्या स्वप्नांत दम नसतो. म्हणून ती स्वप्नं आणि त्या इच्छा सर्वसाधारण गोष्टी बनून जातात. दुर्दम्य इच्छाशक्ती त्या स्वप्नांना ऊर्जा देणार नसेल तर ती स्वप्नं कधी काळी आपण पाहिली होती का हेसुद्धा माणसाला आठवत नाही. बऱ्याच वेळा अशा स्वप्नांना आपण ऊर्जेचा आधार देत नाही. फक्त पाहिले आणि सोडून दिले अशी स्वप्ने अनेक जण पाहतात; पण त्यांना ती जगता येत नाहीत. ज्या माणसांना स्वत:च्या स्वप्नातसुद्धा जगता येते त्या माणसांकडे महत्त्वाची कवचकुंडले असतात; ती म्हणजे त्यांची खडतर इच्छाशक्ती. त्यांच्यात सातत्य येते. अविरत श्रम करण्याची ताकद येते ती त्यांच्या सशक्त इच्छाशक्तीमुळे. याच इच्छाशक्तीच्या सामर्थ्यावर आपण केवळ आपले आयुष्य एका उत्तम दिशेने तर बदलतोच; पण त्याचबरोबर जगामध्ये उत्तम बदलही घडवून आणतो. व्यसनाधिनता, हिंसकता, जीवनशैलीशी निगडित अनेक रोग या सगळ्या गोष्टी आपल्या विचारात एक स्वनियंत्रण नसल्याने होत असतात. आपण जुगार खेळणारी माणसे, सतत इंटरनेटवर बसणारी माणसे, खादाड माणसे, रात्र रात्र उगाचच मोबाइल घेऊन बसणारी माणसे, उगाचच दिवसभर टीव्हीसमोर बसून अनेक तास फुकट घालविणारी माणसे या सगळ्यांना आपल्या आयुष्यातील वाया गेलेली वेळ व विधायकता याबाबत जाणीव असूनही काही करू शकत नाही. कारण त्यांच्यातल्या इच्छाशक्तीचा अभाव. बुद्धी व्यवस्थित त्यांना जाणीव करून देत असते की, काय बरोबर आणि काय चूक आहे याची, पण इच्छाशक्तीचा अभाव त्यांना या गोष्टीवर मात करू देत नाही.वडापाव खाताना एक खायचा किंवा चार खायचे हे ठरविताना बुद्धी जरी चार खाणे आरोग्यदृष्ट्या बरोबर नाही हे आपल्याला सांगत असते; पण मनाची तयारी नसते. ही तर रोजची गोष्ट; पण अतिशय उत्तम बुद्धिमत्ता असून आयुष्यात मात्र काही साध्य केले नाही अशी माणसे ठोकर खातात ती केवळ इच्छाशक्ती कमी पडते म्हणून. स्वत:ला सातत्याने शिस्त लावून एखाद्या दुर्गुणावर मात करणे किंवा एखादी नवी कला आत्मसात करणे, एखाद्या ध्येयाची पूर्तता करणे या गोष्टी इच्छाशक्तीच्या आधाराशिवाय घडूच शकत नाहीत. मी करेनच, मला हे करायचे नाहीच, मला हे मिळवायचे आहेच या तीन घोषवाक्यांत माणसाचे यश दडलेले आहे. यामुळेच आपले स्वातंत्र्यवीर स्वातंत्र्याचा लढा लढले. यामुळेच भिकारीसुद्धा पुढे जाऊन करोडपती झाले. यामुळेच आयुष्यात काहीही नसताना काही लोकांनी खूप काही मिळविले. ‘मी करेनच’ हे ब्रीदवाक्य आपल्याला कितीही अडथळे आले तरी आपल्या मार्गावरून सहिसलामत घेऊन जाते. आधुनिक सायन्सच्या दृष्टिकोनातून मेंदूच्या काही भागाच्या उदा. प्रिफ्रेटल कॉम्लेस्कवर इच्छाशक्ती अवलंबून असते; शिवाय आपला मूड किंवा भावना जेव्हा सकारात्मक असतात तेव्हा एखादी गोष्ट आपल्या इच्छेनुसार आपण मिळवतो. कारण त्या सकारात्मक भावनेमुळे आपल्या इच्छाशक्तीचे सामर्थ्यही वाढत जाते. त्यासाठीच आपण आपले विचार सकारात्मक ठेवाल तर जे पाहिजे ते साध्य कराल असे म्हटले जाते.
इच्छाशक्तीचे सामर्थ्य
By admin | Updated: November 13, 2016 03:50 IST