शैलेश माळोदे
स्पेनची राजधानी मॅड्रिडमध्ये नुकतीच संपन्न झालेली कॉप-२५ (कॉन्फरन्स आॅफ पार्टीज) या नावाने ओळखली जाणारी हवामान बदलाविषयी उपाययोजना सुचविणारी आणि जमल्यास सर्वांना यासाठी भाग पाडणारी परिषद कोणत्याही साध्याशिवाय नुकतीच संपन्न झाली. गेल्या पंचवीस वर्षांच्या परिषदेच्या इतिहासात बऱ्यापैकी न करू शकलेली ही परिषद हवामान बदलविषयक वाटाघाटीविषयीचा विचार करता माध्यमातूनही फारशी प्रभावी ठरू शकलेली नाही. मानवजात स्वत:च्या भविष्याबाबतही किती बेफिकीर आहे हेच यातून अधोरेखित झाले.
चीन आणि भारताने स्वाभाविकपणे पुढील वर्षासाठी अधिक मोठ्या प्रमाणात उद्दिष्ट निश्चित करण्याच्या कामी पुढे आलेल्या सूचनांचा विरोध केला. परिणामी यंदाच्या वर्षी काही निर्णय न होऊन पुढच्या परिषदेतील वाटाघाटीवर त्याचा दबाव येणार आहे. ही परिषद ग्लासगो (ब्रिटन) येथे डिसेंबर २०२० मध्ये भरणार आहे. अमेरिकन राष्टÑाध्यक्षांच्या निवडणुकीनंतर लगेचच अमेरिकेने नवीन राष्टÑाध्यक्षांची निवड केल्यास त्या देशाला पॅरिस करारात पुन्हा सहभागी होण्याची संधी जानेवारी २०२१ मध्ये पद स्वीकारल्यानंतर प्राप्त होईल. मग त्या देशाला पुन्हा नव्याने उत्सर्जन घटविण्याची उद्दिष्टे निश्चित करावी लागतील. चीन हा सध्याचा सर्वाधिक उत्सर्जन करणारा देश असून तज्ज्ञांच्या मते तो अमेरिकेच्या धोरणांकडे लक्ष ठेवून असल्यामुळे स्वत:ची नवीन उद्दिष्टे ठरविण्यापूर्वी तो याविषयी सावधानता बाळगणार असल्याचे दिसते. संयुक्त राष्टÑ संघटनेचे सरचिटणीस अॅन्नानिसो गटेरेस यांनी स्पष्ट शब्दांतून टिष्ट्वटवर आपली नाराजी व्यक्त केलीय. हवामान संकटाशी जुळवून घेत त्यावर मात करण्याची संधी आंतरराष्टÑीय समुदायाने गमावलीय हे निश्चित. १३ डिसेंबरला संपणारी परिषद दोन दिवसांनी वाढवूनही फलनिष्पत्ती शून्य असावी ही खरोखरच चिंताजनक बाब आहे. गरीब राष्टÑांना हवामान बदलविषयक संकटांबाबत मदत करण्याबाबत एकमताचा सूर असला तरी भविष्यातील हवामान नुकसानीसाठी प्रमुख प्रदूषकांना जबाबदार धरावे की नाही याबाबत मात्र एकमत नव्हते. कार्बन व्यापाराविषयीचा निर्णयही पुढच्या परिषदेपर्यंत पुढे ढकलण्यात आलाय. छोट्या राष्टÑांनाही महत्त्वाच्या मुद्द्यांबाबतच्या दृष्टिशून्यतेविषयी धक्का बसलाय.