शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

सणासुदीच्या तोंडावर बळीराजा सापडलाय संकटात!

By किरण अग्रवाल | Updated: October 29, 2023 11:27 IST

Farmers is in trouble : बळीराजाला दुहेरी फटका सहन करावा लागत आहे.

- किरण अग्रवाल

सणासुदीचे दिवस तोंडावर आहेत; परंतु शेतकऱ्यांच्या कापूस व सोयाबीनसारख्या पिकांना भाव नसल्याने बळीराजा चिंतित आहे. विम्याची तकलादू रक्कम व निसर्गाचा फटका अशा संकटात दिवाळी गोड कशी होणार?

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय रण माजले आहे. नुकत्याच होऊन गेलेल्या विजयादशमीला विविध राजकीय पक्ष व नेत्यांच्या मेळाव्यांमध्ये आरोप- प्रत्यारोपांच्या फैरीही झडल्या; पण या साऱ्या गदारोळात आमच्या बळीराजाचे हबकलेपण किंवा त्याची विवंचना काही दूर होऊ शकलेली नाही.

मुळात या हंगामात पावसाची खफा मर्जी राहिली, पावसाच्या तुटीमुळे अनेकांना दुबार पेरणी करावी लागली. ती करूनही म्हणावे तसे पीक आलेच नाही. सोयाबीनवर यलो मोझॅकचे आक्रमण झाल्याने फटका बसला, तर कापूस फारसा समाधानकारक झाला नाही. उडीद, मुगाची स्थिती यापेक्षा वेगळी नाही. म्हणजे एकीकडे उत्पादनाला फटका बसला तर दुसरीकडे उत्पादन खर्च निघेल एवढाही दर मिळेनासे झाला आहे. आपल्याकडे अल्पभूधारकांचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे सोयाबीन असो की कापूस; जे काही उत्पादन आले ते घरात साठवण्याची सोय नसल्याने व गोडाऊनमध्ये नेऊन घालणे खिशाला परवडणारे नसल्याने बाजारात मिळेल त्या भावात विकण्याखेरीज पर्याय उरलेला नाही. तात्पर्य, बळीराजाला दुहेरी फटका सहन करावा लागत आहे.

महत्त्वाचे म्हणजे, महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाचा गतवर्षी सीसीआयसोबत करार झाला नसल्याने ‘पणन’ने कापूस खरेदी केंद्र सुरू केले नव्हते. यावर्षीही सीसीआयने त्यांचे खरेदी केंद्र उघडण्याची घाेषणा केली आहे़ परंतु, पणन महासंघासाेबत अद्याप करार झाला नाही. या दाेेन्ही संस्थांनी कापूस खरेदी सुरू केली नसल्याने शेतकऱ्यांना कमी दरात कापसाची विक्री करावी लागत आहे. नाफेडनेही सोयाबीनची खरेदी सुरू केलेली नाही. त्यामुळे त्याचीही पडत्या भावात विक्री करावी लागत आहे.

बरे, शेतकऱ्यांनी पीकविमा उतरविला; राज्यात एक रुपयात विमा या योजनेपोटी शासनाने कोट्यवधी रुपये विमा कंपन्यांना दिले. परंतु मोठे नुकसान होऊनही शेतकऱ्यांच्या हाती विम्याची नुकसान भरपाई येताना दिसत नाही. शेतकऱ्यांनी व विरोधी पक्षांनी खूप आरडाओरड केली; परंतु विमा कंपन्यांच्या कार्यालयावरील माशी उडाली नाही. आताचा हंगाम तर गेला आहेच; परंतु कमी पावसामुळे जमिनीत ओल नसल्याने यापुढील रब्बी हंगामही नीट होईल याची शाश्वती नाही. पण शेतकऱ्यांच्या या समस्येकडे कुणी लक्ष देताना दिसत नाही. आपापल्या राजकीय चिंतेत सारेच मग्न असल्याने बळीराजा विवंचनेत सापडला आहे.

दिवाळी तोंडावर आली, दिवाळी पाठोपाठ लग्नसराई सुरू होईल; पण सण साजरा करायला किंवा लग्नसराईसाठी बळीराजाच्या हाती पैसा आहे कुठे? परिस्थिती अशी आहे की, शेतशिवारातील चटका जाणवतो आहे. कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे. काँग्रेसने बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उचल खाल्ली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनाही आंदोलन उभारते आहे. म्हणजे सणासुदीचा आनंद व्यक्त करीत पोराबाळांना घेऊन बाजारात खरेदीला जाण्याऐवजी बळीराजाला रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ आली आहे.

सारांशात, निसर्गाने दिलेला फटका बघता बळीराजाची दिवाळी गोड होईल अशी चिन्हे नाहीत. सरकार त्यांच्या राजकारणाच्या विवंचनेत आहे हे खरे, पण शेतकऱ्यांना त्यांच्या समस्यांच्या गर्तेतून बाहेर काढायचे तर किमान कापूस, सोयाबीनच्या हमीभावाची खरेदी केंद्रे तरी तातडीने सुरू होणे अपेक्षित आहे.