शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

वेध - पोलिसांना आधी सौजन्याचे धडे द्या

By admin | Updated: March 27, 2017 00:11 IST

मंत्रालयाच्या सहाव्या माळ्यावर परवा पोलिसांनी एका शेतकऱ्याला मारले. सगळीकडून नाकारलेली अशी माणसे मंत्रालयात दाद मागायला येत असतात

मंत्रालयातील सहावा माळा हा महाराष्ट्राच्या इच्छा-आकांक्षांचे प्रतिबिंब आहे कारण या राज्याचे मुख्यमंत्री त्या माळ्यावर बसून कारभार हाकतात. त्या ठिकाणी आलेल्या एखाद्या शेतकऱ्याला मारहाण करण्याचा अधिकार पोलिसांना कोणी दिला? मंत्रालयाच्या सहाव्या माळ्यावर परवा पोलिसांनी एका शेतकऱ्याला मारले. सगळीकडून नाकारलेली अशी माणसे मंत्रालयात दाद मागायला येत असतात. त्यांच्याशी सौजन्याने वागायला पोलिसांना शिकविले पाहिजे. निदान मंत्रालयात तरी सौजन्य असलेल्या पोलिसांची ड्यूटी लावा! पोलीस हे विसरतात की ते महादेवाच्या मंदिरातील नंदी आहेत. ते स्वत:ला महादेव समजून वागतात आणि तिथेच गडबड होते. आपले सहकारी मंत्री रामदास कदम यांना जाहीर सभेत मुख्यमंत्र्यांनी एकदा सुनावले होते की भाई! तुमचा पगार किती आणि तुम्ही बोलता किती? हेच सूत्र स्वत:ला लागू करून राज्यातील प्रत्येक जण आपल्या पगारापुरता (कुवतीइतका) बोलला आणि वागला तर अर्धे प्रश्न संपून जातील. आपल्या अधिकारात नसलेल्या गोष्टींचा केवळ वर्दीच्या दादागिरीवर ताबा घ्यायचा आणि सामान्य शेतकऱ्यावर हात उचलायचा अधिकार पोलिसांना दिला कोणी? ज्यांनी शेतकऱ्याला मारलं त्या पोलिसांना आधी निलंबित केलं पाहिजे. मुख्यमंत्री कार्यालयात सध्या एक महिला दररोज येते आणि मला अकोल्याचे थेट नगराध्यक्ष करा, यासाठी अडून बसते. अकोल्यात महापौरपद आहे आणि ते भाजपाकडे आहे हेही तिला माहिती नाही. एखाद महिन्यापूर्वी एक माणूस २८८ आमदारांच्या बोगस सह्या घेऊन आला आणि मला मुख्यमंत्री करा म्हणाला. नावच राष्ट्रपती असलेला एक साधुवेशातील माणूस त्याला राज्यसभेचा खासदार करा म्हणून नेहमी चकरा मारत असतो. अशा विक्षिप्त लोकांनाही मुख्यमंत्री कार्यालयात सुमित वानखेडे, श्रीकांत भारतीय यांनी सौजन्याची वागणूक दिली. ज्या मुख्यमंत्री कार्यालयात असा संयम आणि माणुसकी दाखविली जाते त्या कार्यालयात मुजोर पोलीस का नेमले जावेत? त्यांना हटवूनच शेतकरी मारहाणीची चौकशी झाली पाहिजे. पोलीस आयुक्त पडसलगीकर साहेब! मंत्रालयात माणसे नेमण्यापूर्वी त्यांना माणुसकीचे, सौजन्याचे धडे शिकवा. एक-दोन पोलिसांच्या मारहाणीने आख्खे सरकार असंवेदनशील ठरते याचे भान असले पाहिजे. विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपायला आता आठ दिवस उरलेत. राज्याच्या कोणत्याही महत्त्वाच्या प्रश्नावर या अधिवेशनात अद्याप चर्चा होऊ शकलेली नाही. उर्वरित दिवसात ती होण्याची शक्यता कमीच आहे. चार-दोन मुद्द्यांना वरवर स्पर्श केला जाईल आणि अधिवेशनाचे सूप वाजेल. कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी कामकाज होऊ दिले नाही आणि नंतर निलंबनाच्या मुद्द्यावरून कामकाजावर बहिष्कार टाकला. विधान परिषदेत बहुमत असलेल्या विरोधकांनी सत्तापक्षाची पुरती कोंडी केली आहे. सांसदीय राजकारणाची ५० वर्षे पूर्ण केल्याबद्दल ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा आणि दिवंगत इंदिराजींच्या कार्याचा गौरव करणारा ठरावदेखील चर्चेला येऊ शकलेला नाही. सरकारचे ‘फ्लोअर मॅनेजमेंट’ फसले आहे. अर्थसंकल्प मांडून मंजूर करवून घेण्यापुरते शिवसेनेचे सहकार्य मिळविण्याचे कौशल्य मुख्यमंत्री फडणवीस यांनी साधले पण अनेक मुद्द्यांवर भाजपा-शिवसेनेतील दुरावा कायम असून, त्याचा सरकारला फटका बसत आहे. राज्याची आर्थिक स्थिती बिकट आहे. गेल्या दहा वर्षांतील पीकपाण्याची सर्वात चांगली स्थिती यंदा आहे आणि सामान्य शेतकऱ्यांकडून कर्जमाफीची मागणी नाही हे विरोधी पक्षांना ठामपणे सुनावण्यात, माध्यमांचे या मुद्द्यावर समाधान करण्यात सत्तापक्ष कमी पडला आहे. जाता जाता : अर्थसंकल्प मांडला जात असताना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांनी शिवसेनेची प्रचंड खिल्ली उडविली. त्यांचा पेंग्विन, पोपट, मांजर केला. अशी चेष्टा करणाऱ्यांपैकी काही आमदार निलंबित होताच ते लोकशाहीविरोधी असल्याचे सांगत निलंबन मागे घेण्यासाठी शिवसेनेचे तीन मंत्री मुख्यमंत्र्यांना भेटले. नारायण राणे, छगन भुजबळ आज शिवसेनेत असते तर? ...एक तर सेनेचा पेंग्विन करण्याची कोणाची हिंमत झाली नसती अन् झालीही असती तर मुॅँहतोड जवाब मिळाला असता. सेनेचे ते दिवस आता कुठे? शिवसेनेची अर्धी शक्ती सध्या भाजपाशी लढण्यात आणि अर्धी शक्ती स्वत:शीच लढण्यात वाया जात आहे. एकनाथ शिंदे यांनी मात्र निलंबन योग्यच होते असे सांगत स्वपक्षीयांना बैठकीतच सुनावले पण बुजुर्गांसमोर त्यांचे काय चालणार? आणि हो, तसेही ते या बुजुर्गांइतके ‘मातोश्री’चे निकटवर्ती कुठे आहेत?- यदु जोशी